Wednesday 11 March 2015



वाचनकौशल्य जोपासा 

गायत्री गाडगीळ  gayatri.gadgil@gmail.com

वाचन ही नुसती आवड नसून कामाच्या ठिकाणी अतिशय आवश्यक असे कौशल्य आहे. कार्यक्षम वाचक दिवसभरात समोर येणारी अनेक ई-मेल्स, अहवाल व पत्रव्यवहार पटकन समजून घेऊन कार्यान्वित करू शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा- विशेषत: कला शाखेमध्ये शिकणारे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी वाचनकौशल्य संपादन करून कमी वेळात अधिक प्रभावी रीतीने अभ्यास करू शकतात. वाचनप्रक्रियेत येणाऱ्या सामान्य अडचणी म्हणजे वाचनाचा कंटाळा येतो, काही पाने वाचली की लक्ष विचलित होते, एकाग्र मनाने वाचता येत नाही, कठीण शब्द सतत अडतात, लांबलचक वाक्ये पटकन समजत नाहीत. उत्तम वाचनकौशल्ये ही काही ईश्वरी किंवा नसíगक देणगी नव्हे. योग्य मार्गाने सतत सराव करून कोणीही कार्यक्षम वाचक बनू शकतो. वाचनकौशल्ये आत्मसात केल्यास वरील अडचणींवरही सहज मात करता येईल. वाचनक्षमता वाढवण्यासाठी तसेच कार्यक्षम वाचक बनण्यासाठी 'सक्रिय वाचन' किंवा 'सहभागात्मक वाचना'चे तंत्र वापरून पाहा. कसे कराल सक्रिय अथवा सहभागात्मक वाचन?
पूर्वावलोकन
आपण वाचणार असलेल्या साहित्याचे पूर्वावलोकन करा अर्थात प्रीव्ह्य़ू घ्या. आपण काय वाचणार आहोत याची एक साधारण कल्पना अगोदरच मनात ठेवा. उदा. लेखाचे शीर्षक वाचा. पहिल्या व शेवटच्या परिच्छेदावरून नजर फिरवा. लेखासोबत दिलेली छायाचित्रे, नकाशे किंवा तक्ते लक्षपूर्वक पाहा. यावरून लेखाच्या मुख्य विषयाचा अंदाज करता येईल.
माइंड मॅपिंग
कल्पनाचित्र व मार्गदर्शक शब्दांच्या मदतीने संपूर्ण लेखाचा माइंड मॅप तयार करा. मुख्य विचार व कळीचे शब्द आकृतीच्या स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण वाक्ये किंवा तपशील मात्र 'माइंड मॅप'मध्ये दर्शवू नका. वाचत असलेल्या साहित्याच्या प्रकारानुसार तक्ता, Table, Flowchart, फॅमिली ट्री, ट्री डायग्राम असे योग्य आकृतिबंध वापरा. उदा. एखाद्या विषयाची साधकबाधक चर्चा वाचताना स्र्१२ व ूल्ल२ चा तक्ता तयार करा. किंवा शेक्सपीयरचे 'अ‍ॅज यू लाइक इट' वाचताना त्यातील विविध पात्रांची एकमेकांशी असलेली नाती, त्यांनी केलेली वेषांतरे, त्यातून उद्भवलेले गरसमज 'ट्री डायग्राम'च्या स्वरूपात मांडले तर ते गुंतागुंतीचे वाटणार नाही.
कल्पनाचित्र बनवा
वाक्ये वाचताना मनात त्यांचे कल्पनाचित्र उभे करण्याचा प्रयत्न करा. सर्व तपशील तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर हे चित्र पूर्ण व सुस्पष्ट असेल. चित्र धूसर असल्यास ते अधिक सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न करा.
कथा किंवा घटनाक्रम वाचताना तर चक्क काल्पनिक चित्रपट तयार करा. यामुळे वाचन नीरस किंवा कंटाळवाणे न होता जिवंत व चित्तवेधक होते. वाचताना अशी दृश्यकल्पना तयार केल्यास वाचलेल्या गोष्टी अधिक काळ लक्षात राहतात.
मार्गदर्शक शब्द
वैचारिक लेख वाचणे अनेकदा कथा वाचण्यापेक्षा अधिक कठीण वाटते. कारण कथेमध्ये स्पष्ट घटनाक्रम असतो आणि पुढे काय घडेल याविषयी वाचकाला उत्कंठा असते. थोडय़ा वेगळ्या दृष्टीने वाचल्यास लक्षात येईल की, वैचारिक लेखांमध्येही विचारांची मांडणी विशिष्ट क्रमाने केलेली असते. हा क्रम समजून घेतला तर लेखातील विचार समजून घेणे सोपे होऊन जाते. यासाठी मार्गदर्शक शब्दांकडे बारीक लक्ष द्या. उदा. Firstly, secondly हे शब्द क्रमवार विचार दर्शवतात. Consequently, as a result, therefore कार्यकारणभाव दाखवतात तर on the contrary, conversely विरुद्ध विचार
सूचित करतात.
पूर्वज्ञान
प्रीव्ह्य़ू केल्यानंतर त्या विषयासंबंधी आवश्यकता असल्यास थोडी प्राथमिक माहिती शोधा. उदा. स्थानिक कर म्हणजे काय याची माहिती नसताना त्या कराबद्दलची मतमतांतरे जोखणारा अग्रलेख वाचणे अतिशय कठीण वाटेल. कथा / कादंबरी वाचण्यापूर्वी तिच्या पाश्र्वभूमीची ओळख करून घ्या.
प्रश्न विचारा
या लेखातून आपल्याला काय अपेक्षित आहे, त्यानुसार प्रश्नांची यादी तयार करा. उदा. एखाद्या घटनेचे वृत्त वाचताना Wh- Questions (Who, What, When, Where, Why, How) लक्षात घ्या. प्रत्यक्ष लेख वाचताना नुसतेच शब्द किंवा वाक्ये न वाचता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचा.
सारांश लिहा
वाचलेल्या लेखाचा एका परिच्छेदात सारांश लिहा. लेखातील मूळ मुद्दे थोडक्यात लिहिता आले तर वाचन यशस्वी झाले असे समजता येईल. शक्य असल्यास आपल्याला हा लेख आवडला का? त्यातील विचार/ मते पटली का हेसुद्धा दोन-तीन वाक्यांत लिहून काढा. म्हणजे लेखाचे एक प्रकारे छोटेखानी परीक्षणच तयार होईल.
ग्रूप रीडिंग
वाचन कंटाळवाणे होण्याचे पहिले मुख्य कारण म्हणजे वाचकाचे औदासिन्य वागविणारा दृष्टिकोन . वाचताना आपण नुसतेच लेखकाचे विचार ऐकत आहोत असे समजू नका तर आपण लेखकाशी प्रत्यक्ष संवाद साधत आहोत. प्रश्न विचारत आहोत व चर्चा करत आहोत अशी कल्पना करा. वाचनप्रक्रियेत सक्रिय सहभागी झालो किंवा सहभागात्मक दृष्टिकोन ठेवला तर वाचन कधीच जड किंवा कंटाळवाणे वाटत नाही. वाचन हे एकटय़ाने, एके ठिकाणी बसून करायचे असते अशा समजुतीमुळेही ते कंटाळवाणे वाटते. समविचारी मित्र-मैत्रिणी किंवा सहकारी असले तर गटाने केलेले वाचन रंजक बनते. प्रत्येकाने आळीपाळीने मोठय़ाने वाचलेले इतरांनी ऐकायचे असे या 'ग्रूप रीडिंग'चे स्वरूप असते. विविध मते ऐकून, चर्चा करून साहित्य अधिक चांगले समजून घेता येते व मोठय़ाने वाचन केल्याचे इतर फायदेही मिळतात. उच्चार सुधारतात व आत्मविश्वासही वाढतो. एके ठिकाणी जमून वाचन करणे शक्य नसल्यास बुक क्लब तयार करता येईल. क्लबच्या सर्व सदस्यांना दर आठवडय़ाला ठरावीक साहित्य वाचून त्यावर चर्चा करता येईल. ब्लॉग्ज व सोशल मीडियाचा वापर करून असा बुक क्लब ऑनलाइनही चालवता येईल. यशस्वी विद्यार्थी व प्रभावी व्यावसायिक होण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग पद्धतीने वाचनाचा नियमित सराव तुमच्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल.
इंग्रजी वाचन वाढविण्यासाठी..
केवळ अक्षरे व शब्द वाचता येणे म्हणजे वाचन नव्हे. तसे असते तर इंग्रजी लेख किंवा पुस्तक पाहताच 'छे, इतके लांबलचक इंग्रजीमध्ये कसे वाचणार? अशी आपली प्रतिक्रिया झाली नसती. आपण अनेकदा उत्तम इंग्रजी पुस्तके विकत घेतो; शेक्सपीयर, शॉ, वर्ड्सवर्थ मूळ इंग्रजीतून वाचायची इच्छा असते, पण प्रत्यक्षात मात्र काही पानांपलीकडे वाचन होत नाही. इंटरनेट क्रांतीमुळे वाचनासाठी जगभरातील उत्तम साहित्य आणि भरपूर माहिती सहज उपलब्ध झाली आहे. त्याच वेळी वाचनाची सवय मात्र कमी होताना दिसते.
'मला इंग्रजी वाचन वाढवायला हवे, मी काय वाचू?' असा प्रश्न अनेकांना पडतो. वाचनाची सुरुवात आपल्या आवडीच्या विषयावरील सोप्या लेखनाने करा. थेट शेक्सपीयर वाचण्यापूर्वी 'चार्ल्स अ‍ॅण्ड मेरी लॅम्ब'ने लिहिलेले 'टेल्स फ्रॉम शेक्सपीअर' वाचा. इंग्रजी वृत्तपत्रे, ब्लॉग्स किंवा नियतकालिके नियमित वाचा. काही दिवसांनी वाचनाची सवय जडेल आणि गोडी निर्माण होईल. मग मात्र अधिकाधिक क्रमाने कठीण वाटणारे साहित्य वाचायला सुरुवात करा. सहज समजेल अशी भाषा वाचण्याऐवजी समजून घ्यायला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल असे साहित्य निवडा. अशा प्रकारे वाचनाची श्रेणी हळूहळू पण सतत वाढविल्यास तुम्ही लवकरच उत्तम इंग्रजी सहज वाचू लागाल.
संदर्भातून शब्दार्थ ओळखा. इंग्रजी वाचताना अनेकदा आपल्याला नवीन शब्द अडतात. अर्थ शोधण्यासाठी वारंवार शब्दकोश उघडावा तर वाचनात खंड पडतो. वाचताना अनोळखी शब्द आढळल्यास मागील व पुढील वाक्याचा संदर्भ घेऊन अर्थाचा अंदाज बांधा. उदा. The debris on the floor included empty bottles, old newspapers and chocolate wrappers. हे वाक्य वाचून kdebrisl चा अर्थ 'कचरा' किंवा 'टाकाऊ वस्तू' आहे असा अंदाज बांधता येईल.
Being short of cash, he ate a frugal meal. frugal चा अर्थ 'स्वस्तातले' किंवा 'कमी खर्चीक' असा गृहीत धरायला हरकत नाही. संपूर्ण लेख वाचून झाल्यावर शब्दकोश वापरून आपले अंदाज पडताळून पाहायला मात्र विसरू नका.

0 comments:

Post a Comment