Tuesday, 31 March 2015

हे जीवन सुंदर आहे!


हे जीवन सुंदर आहे!


सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनीच सांगितलेला एक किस्सा. मित्राच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याचा मुलगा अत्रे यांच्याकडे आला. त्या मुलाने वडिलांच्या नावाने लाखोली वाहण्यास सुरुवात केली. कारण वडिलांनी त्याच्या नावे कोणतीच मोठी मिळकतीची रक्कम ठेवलेली नव्हती. वारसाहक्काने फारसे काही न मिळाल्याने हताश झालेला तो अत्रे यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी आला होता. एवढा मोठा पत्रकार, लेखक मित्र असताना त्याच्या वडिलांचे असे का झाले, अत्रे यांनी मित्राला भविष्याच्या तरतुदीसाठी काही सुनावले का नाही, असाही त्याचा सवाल होता. वडिलांनी आपल्यासाठी काहीच पैसे ठेवलेले नाहीत, ही खंत तो वेळोवेळी सारखा बोलून दाखवत होता. अखेरीस तो थांबल्यानंतर अत्रे म्हणाले, ''अरे, तुझ्या वडिलांनी दिलेल्या लाखमोलाच्या गोष्टींच्या बदल्यात तुला पैसे हवे असतील तर तू मला सांग. कारण त्या गोष्टी तू दिल्यास की, त्या बदल्यात तुला पैसे मिळतील, हे मी नक्कीच पाहू शकतो..'' हे ऐकल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या. कारण आपल्या वडिलांनी असे किमती काही ठेवले आहे, याची कल्पनाच त्याला नव्हती. त्याने मोठय़ा आशेने अत्रे यांना विचारले की, साधारण किती पैसे मिळू शकतील, त्यावर ते म्हणाले की, १० लाखांच्या आसपास तर नक्कीच मिळतील. (ही अत्रे यांच्या कालखंडातील गोष्ट आहे, तेव्हा १० लाख ही रक्कम आताच्या एक कोटीच्या मूल्याची असावी) खूश होऊन त्याने विचारले, ''मग बाबांनी काय ठेवले आहे, जे मी तुम्हाला देऊ?'' अत्रे यांनी त्याच्यासमोर गणितच मांडले. ते म्हणाले की, ''तू डोळे दिलेस दोन्ही तर त्यातच दोन ते तीन लाख रुपये मिळतील, मूत्रपिंड दिलेस तर त्याचे पाच लाख सहज होतील.. एकेका अवयवाची किंमत सांगत आचार्य अत्रे पुढे सरकत असतानाच, त्या मित्राच्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भावही बदलत गेले. त्याच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणा येऊ लागला. अखेरीस थांबून आचार्य म्हणाले, ''बोल, आता यातले काय काय देतोस, मी पैसे देणारी माणसे तुझ्यासमोर उभी करतो.'' त्याच्या तोंडून शब्दही फुटेना. मग आचार्यानी पुन्हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तुला माझ्या मित्राने चांगल्या शाळेत घातले की, साध्या? तुला दिलेली वह्या- पुस्तके, कपडे वाईट दर्जाचे होते का? तुला खेळायला दिलेली खेळणी कचकडय़ाची होती का? शिक्षणासाठी कधीही त्याने कोणत्याही गोष्टीला एकदा तरी नाही म्हटले का? आणि या साऱ्याचे उत्तर 'नाही' असेल तर मग तुला आणखी काय हवे होते? या सर्व गोष्टी वाईट दर्जाच्या देऊन त्याने तुझ्यासाठी पैसे ठेवणे तुला अपेक्षित होते का? मित्राचा मुलगा समोर तसाच उभा होता..आचार्य अत्रे म्हणाले, ''अरे, धडधाकट आयुष्य हाच सर्वात मोठा अमूल्य असा दागिना आहे, तो जपला पाहिजे. शरीर आहे, तर सर्व काही आहे. ते व्यवस्थित असेल तर माणसाला काहीही करता येते. एव्हरेस्टही चढता येते आणि मेहनतीने गडगंज श्रीमंतही होता येते. शरीर असेल तर सारे काही आहे. तेच नसेल तर मात्र आयुष्य जगणे ही अडचण असते.''
नागपूरमध्ये एका तलावात होडीतून सैर करणाऱ्या ७ मित्रांनी मोबाइलवर सेल्फी टिपण्याच्या नादात होडीच्या एकाच बाजूला होत, होडीच्या असमतोलामुळे जीव गमावण्याची घटना सोमवारी घडली. मुंबई शहरात कानाला हेडफोन लावलेल्या अवस्थेमुळे रेल्वेचा किंवा गाडय़ांचा हॉर्नच ऐकू न आल्याने किंवा आपण कसे चालतो आहोत, याचेच भान न राहिल्याने अनेक महाविद्यालयीन युवक-युवती दररोज स्वत:चा जीव गमावतात. आपण किती साहसी आहोत, हे दाखविण्यासाठी सेल्फी टिपण्याच्या नादात अनेकदा आपला जीवही आपण गमावू शकतो, याचे भान या तरुणाईला राहात नाही.. हे सारे पाहिल्यानंतर आचार्य अत्रे यांनी सांगितलेला त्यांच्याच मित्राच्या मुलाचा हा किस्सा आजच्या तरुणाईला नव्याने सांगावा, असे खूप मनापासून वाटले!
lp07आजची तरुणाई ही काळासोबत त्याच वेगाने पुढे जाणारी आहे. खरे तर असे प्रत्येक कालखंडात होत असते. त्या त्या कालखंडातील तरुणाई ही नेहमीच काळाच्या पुढे राहण्याचा प्रयत्न करते. फक्त ते करताना तारुण्यसुलभ भावनांसोबत, काळाचेही भान असणे गरजेचे आहे. मोबाइल हा तर आताच्या तरुणाईचा जणू शरीराचा विस्तारित अवयवच झाला आहे. त्यांचे अध्र्याहून अधिक जीवन हे मोबाइलमय झाले आहे. चॅटिंग, मेसेजिंग हेच आयुष्य होऊ पाहत आहे. ज्येष्ठांच्या पिढीची याबाबत नेहमीच तक्रार असते. मोबाइल बाजूला ठेवला, तर काय बिघडणार आहे, असे ज्येष्ठांना सारखे वाटत असते. आमच्या तरुणपणी मोबाइल नव्हता, पण म्हणून आम्ही जगलो नाही का, असा युक्तिवादही ज्येष्ठांकडून केला जातो. मात्र या युक्तिवादात टोकाची भूमिका अधिक असते. या ज्येष्ठांनी एकदा स्वत:चे तारुण्य आठवून पाहिले तर त्यांनाही सहज लक्षात येईल की, त्या वेळेस जे काही अत्याधुनिक होते; मग कदाचित तो वॉकमन असेल, कॅमेरा असेल किंवा मग इतर काही ते त्यांच्या पिढीच्या हाती होते. त्यामुळे आताच्या पिढीच्या हाती असलेला मोबाइल त्यांनी सोडून द्यावा, अशी भूमिका घेणे योग्य नाही. पण तो वापरताना त्यांनी आजूबाजूचे आणि काळाचे भान राखणे मात्र नक्कीच आवश्यक आहे. मोबाइलवरच्या गेमिंगला टाइमपास म्हणून सुरुवात होते, पण नंतर त्यामध्येच तासन्तास निघून जातात. आजची तरुणाई दिवसातील कमीत कमी सरासरी चार ते पाच तास गेमिंगमध्ये व्यतीत करते, असे अलीकडेच एका पाहणी अहवालात लक्षात आले. हे धक्कादायक आहे. मैदानी खेळ कमी होणे हे आरोग्यासाठी हितकारक नाही. (यात चॅटिंगचा वेळ गृहीत धरलेला नाही) शिवाय बसमध्ये, प्रवासात, घरी, रस्त्यावरून चालताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर कुठेही असताना कानात हेडफोन असतात आणि भान सुटलेले असते. बाजूने जाणाऱ्या गाडीचा हॉर्नही त्यांना हेडफोनमुळे ऐकू येत नाही. हे त्यांच्याच स्वत:च्या जिवावर बेतणारे आहे, हेही लक्षात येऊ नये, हे अधिक भीतीदायक आहे.मध्यंतरी हेडफोन कानात असलेल्या तरुणांचे बळी अधिक संख्येने जात असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आणि रस्ते वाहतूक विभागानेही महाविद्यालयांतील तरुणाईला सोबत घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक जाणीवजागृती मोहीम राबवली. अशी विशेष मोहीम राबविण्याची वेळ यावी, ही तरुणाईसाठी धोक्याची घंटा आहे.
मोबाइलच्या या वेडामध्ये हल्ली भर पडली आहे ती सेल्फीची. दर तासाला हे सेल्फी प्रोफाइल फोटो म्हणून अपडेट होतात, त्यासाठी जणू स्पर्धाच सुरू असते. यालाही हरकत नाही. पण त्या नादापायी आपल्या जिवावरच बेतेल असे करताना मात्र दहा वेळा विचार करायला हवा. ट्रेकला गेल्यानंतर अगदी कडय़ावर उभे राहायचे आणि पाठी तोल जात असलेल्या अवस्थेतील सेल्फी काढायचा.. हा सेल्फी आणि त्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा, त्यासाठी लाखमोलाचा जीव पणाला लावावा, एवढी नक्कीच मोठी नाही.
गेल्या काही वर्षांत तरुणाईला आणखी वेड लागले आहे ते मोटरबाइकवरून सुसाट वेगात 'धूम' जाण्याचे. धूम, फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअससारख्या चित्रपटांनी तर त्यात भरच घातली. ते चित्रपट आहेत, त्यातील सर्व गोष्टी या आभासी असतात, याचेही भान सुटते.. राज्यातील महामार्गावर असे सुसाट बळी वाढले आहेत. मुंबईत तर महामार्गावर अशा बळींच्या संख्येने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. मध्यंतरी एकदा सरकारी रुग्णालयातील प्लास्टिक सर्जनची भेट झाली, त्या वेळेस त्याने या अपघातांनंतर विद्रूप झालेल्या चेहऱ्यांची तरुणाई ऑपरेशनसाठी येते तेव्हा जीव तुटतो, असे भाष्य केले होते.
पूर्वी लाखमोलाचा जीव असे म्हटले जायचे. आता त्या पूर्वीच्या लाखांना अब्जाची किंमत आहे. पण खरे तर मानवी शरीर किंवा जिवाच्या बाबतीत बोलायचे तर तो अनमोल आहे. त्याचे मोल पैशांत नाही करता येणार. विविध अवयवरोपणासाठी प्रतीक्षा यादीवर असलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये एकदा फेरफटका मारलात तर अवयवांचे मोल काय असते, ते सहज लक्षात येऊ शकते. आजचे 'मथितार्थ' हे या समस्त तरुणाईला साद घालण्यासाठी लिहिले आहे. मित्रहो, कोणतीही धोकादायक कृती करताना लक्षात असू द्या, हे जीवन सुंदर आहे!

विनायक परब

0 comments:

Post a Comment