कल्पक इंजिनीअर व्हा
डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सेलरमी बारावी सायन्स ५३ टक्क्यांनी पूर्ण झाल्यावर मेकॅनिकलच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला आहे. किती टक्के मार्क मिळविल्यास मला चांगली नोकरी मिळेल? मी बीई करणं गरजेचं आहे काय? कोणत्या स्वरूपाचा जॉब मला शोधावा लागेल ?
- पराग परमार
डिप्लोमाला किती टक्के मार्क हा प्रश्न मुख्यतः बीईला प्रवेशासाठी महत्त्वाचा आहे, नोकरीसाठी नक्कीच नाही. बीई मेकॅनिकलला चांगले कॉलेज हवे असेल, तर डिप्लोमाला ऐंशी टक्क्यांहून अधिक मार्क हवेत. मेकॅनिकल डिप्लोमानंतर अनेक स्वरूपाची कामे तुला मिळू शकतात. मुख्यतः फॅब्रिकेशन, हेवी इंजिनीअरिंग कंपन्या व ऑटोक्षेत्राला सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये तुला मागणी असू शकते. सहा महिने प्रशिक्षणात घालवून मगच पुढची प्रगती सुरू होते. या खेरीज प्रत्येक मोठ्या कारखान्यात मेंटेनन्स इंजिनीअर म्हणून काम असतेच. थोडक्यात हाताने काम करणारे, हात काळे करण्याची तयारी असलेले व कल्पकता वापरून काम करणारे मेकॅनिकल इंजिनीअर सर्वांनाच हवेसे वाटतात, हे पक्के लक्षात ठेवावे.मी बीसीएसच्या शेवटच्या वर्षाला आहे. कॉम्प्युटरमध्येच मी नोकरी करावी असे घरच्यांना वाटते. मला मात्र अभिनय क्षेत्रात जावे, असे वाटते. एन्व्हायर्न्मेंट सायन्समध्ये शिकायला मला आवडेल. सोशिओलॉजीमध्येही मला रस आहे. माझ्या भविष्यासाठी कोणता रस्ता निवडावा?
- पूनम पगारे
तुला अभिनय आवडतो, अॅक्ट्रेस बनावे वाटते हा रस्ता खडतर आहे. घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला तरीही खडतरच आहे, हे प्रथम लक्षात घे. मात्र त्या रस्त्याला जायचे असेल, तर रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण घ्यावे. ही सुरुवात असेल. तीन महिने ते एक वर्षाचे अनेक कोर्सेस अनेक खासगी संस्था चालवतात. त्याचा विचार पदवी पूर्ण झाल्यावर करू शकतेस. सोशिओलॉजी आवडत असली तरीही त्यातील पदवी पुन्हा नव्याने घ्यावी लागेल. वाटल्यास 'मास्टर्स इन सोशलवर्क'ला तुला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर त्या क्षेत्रात काम, नोकरी शक्य आहे. पर्यावरणासाठी मास्टर्सला प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. तरीही तो अभ्यासक्रम तुला कठीण जाईल. तीन वर्षात कॉम्प्युटरसोडून अन्य विषयांचा तुझा संबंध राहिलेला नाही, हे लक्षात घ्यावेस. सध्यातरी बीसीएसनंतर एखादी नोकरी मिळाली तर ती करताना या साऱ्याचा विचार करून २०१६ साली तू निर्णयाप्रत येऊ शकतेस.मी बारावी सायन्सची विद्यार्थिनी आहे. मला डाएटिशियन व्हायचे आहे. त्यासाठीच्या सर्व गोष्टी व संधी यांची माहिती द्यावी.
- पूर्वा देशपांडे
एसएनडीटी कॉलेजमध्ये बी.एस्सी. होम सायन्सची पदवी घेताना डाएट व न्युट्रिशन या दोन्हीची तोंडओळख तुला होईल. नंतर पदव्युत्तर पदवीत न्युट्रिशनचा परीपूर्ण अभ्यास असेल. हा झाला एक महत्त्वाचा रस्ता. बी. एस्सी बायोलॉजी घेऊन पूर्ण झाल्यावर एक ते दोन वर्षांचे डाएटिशिन, न्युट्रिशनिस्ट असेही कोर्सेस आहेत. ते अनेक खासगी संस्थांमध्ये चालविले जातात. मुक्त विद्यापीठाद्वारेसुद्धा हा अभ्यासक्रम तुला पूर्ण करता येऊ शकतो.
विविध प्रकारच्या रुग्णांना जेवणाबद्दल मार्गदर्शन करणे, वजन नियंत्रण, डायबेटिससारख्या आजारात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या बरोबर काम करणे असे थोडक्यात कामाचे स्वरूप असते. या क्षेत्रात नोकऱ्या फार नाहीत. मात्र एकदा तुमचे नाव झाले की वैयक्तिक सल्लागार म्हणून काम सुरू होते. खऱ्या अर्थाने या क्षेत्रात करिअर करायची असेल तर बराच काळ देणे, बरीच वर्षे वाट पाहणे याची मूलभूत गरज असते. डाएटला योगोपचार, फिटनेस, व्यायाम अशी जोड दिलेली मंडळी जास्त मागणीत राहतात.
0 comments:
Post a Comment