Monday 16 March 2015

‘आयआयटी’चं लक्ष सॉफ्ट स्किल्सवर


‘आयआयटी’चं लक्ष सॉफ्ट स्किल्सवर

चांगले इंजिनीअर्स तयार करण्यासोबतच 'आयआयटी' आता विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किलवरही लक्ष देणार आहेत. यासाठी 'आयआयटी'ने विविध संस्थांशी करारही केले असून, लवकरच विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही सुरू होणार आहे.

चांगली नोकरी करण्यासाठी चांगला इंजिनीअर असण्याबरोबरच, चांगला कम्युनिकेटर असणेही महत्त्वाचे आहे. अशा कौशल्यांचा अभाव काही जणांच्या प्रगतीला बाधक ठरतो. त्यामुळेच देशातील सर्व १६ 'आयआयटी'मध्ये या संदर्भातील क्रॅश कोर्स सुरू केला आहे. या कोर्समध्ये कम्युनिकेशनच्या पद्धती, बॉडी लँग्वेज आणि लेखनकौशल्ये शिकविली जाणार आहेत.

विविध संस्थांशी करार

विद्यार्थ्यांमधील सॉफ्ट स्किल विकसित करण्यासाठी 'आयआयटी' विविध संस्थांसोबत करार करत आहेत. आयआयटी-हैदराबादने आपल्या एक हजार ५०० इंजिनीअर्ससाठी आयटी स्किलिंग फर्मसोबत करार केला आहे. ही फर्म येथील बीटेक, एमटेक आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना संवाद, लेखन आणि वाचन कौशल्ये शिकविणार आहे. त्यानंतर ३६ तासांचे रेमिडियल कोचिंग दिले जाणार आहे. पुढील वर्षापासून प्रथम वर्षाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे प्रशिक्षण बंधनकार असणार आहे.

आयआयटी-कानपूरने या वर्षी ब्रिटिश कौन्सिलसोबत टाय-अप केले आहे. ही संस्था इंग्रजीची चाचणी घेणार आहे. संवाद, वाचन आणि लेखन यांचा सफाईदारपणा वाढविण्यावर यात भर राहणार आहे. आयआयटी-कानपूर आणखी संस्थांशीही या संदर्भात करार करणार आहे. आयआयटी-गुवाहाटी मॉक टेस्ट घेण्यासाठी काही बिझनेस स्कूल्सशी चर्चा करत आहे.

माजी विद्यार्थी शिकविणार

आयआयटी-खरगपूरमध्ये संस्थेचे माजी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने आपल्या ज्युनिअर्सना कौशल्य विकासाचे शिक्षण देणार आहेत. या उपक्रमात केवळ कम्युनिकेशन स्किल्सच नव्हे, तर प्रोग्रामिंगही शिकविले जाणार आहे.

सीडीसी स्थापन करणार

आयआयटी-कानपूर विद्यार्थ्यांसाठी करिअर डेव्हलपमेंट सेंटर (सीडीसी) स्थापन करणार आहे. नोकरीच्या संधींबद्दल निर्णय घेण्यासाठी हे सेंटर विद्यार्थ्यांना मदत करणार आहे. याशिवाय नोकरीच्या संधींची माहितीही येथे दिली जाणार आहे.

0 comments:

Post a Comment