तयारी जेईईची
जेईईसारख्या परीक्षा म्हणजे अनेकांच्या काळजात धडकीच भरते. पण या परीक्षांना घाबरुन कसं चालेल? त्यावर अभ्यासाचं नियोजन करून कष्टाने मात करायला हवी. मग भरघोस यश तर मिळेलच.विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या वर्षाचे जेईई(मेन)चे निकाल आपण पाहिले असतील त्यातील ११५ आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी जेईई(अॅडव्हान्स)साठी पात्र ठरले आहेत. अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण ४ टक्के भरतं. हे पाहून आपल्याला दडपण आलं असेल. आपल्या हातून या परीक्षेची तयारी होईल का नाही, परीक्षा खरोखरच एवढी अवघड असेल तर ती दयावी का नाही. दयायची ठरवली तर तयारी कशी करावी ? कधी सुरवात करावी ? किती वेळ यासाठी द्यावा? इ. १२ वी च्या अभ्यासाबरोबरच जेईई चा अभ्यास करावा का ? या आणि अशा अनेक प्रश्नांनी आपल्या मनात थैमान घातले असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात असतील त्याचीच उत्तरं देण्यासाठी हा लेख.
सायन्सला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी जेईई किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षा द्यावीच, असं मी नेहमी सुचवतो याचं मुख्य कारण म्हणजे या परीक्षामध्ये तुमची ज्ञानाची, ज्ञानाच्या उपयोजनाची (अॅप्लिकेशन ऑफ नॉलेज) परीक्षा होते, जी आजवर कधीही झालेली नसते. आजवर तुम्ही दिलेल्या परीक्षा या स्मरणशक्तीच्या किंवा स्मरणशक्तीवर आधारित (मेमरी बेस्ड) होत्या. एखादा विषय न समजतासुद्धा केवळ घोका आणि ओका पद्धतीने अशा परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळविणं शक्य असतं, तुम्ही पुस्तकातील 'माहितीचे' ज्ञानात रुपांतर करू शकता की नाही, असलेल्या / मिळविलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करू शकता की नाही याचे परीक्षण आजवर झालेलंच नाही. या प्रवेश परीक्षांच्या निमित्ताने ते होईल, म्हणून या परीक्षा द्यायच्याच.
मग एकदा प्रवेश परीक्षा द्यायचा निश्चय झाल्यावर मात्र मनापासून तयारी करणं आवश्यक आहे, असं म्हणतात की 'To become successful, you ought to be either intelligent or systematic' तुम्ही खरोखरच हुशार असाल, इ. चौथी, सातवीची शिष्यवृत्ती, एनटीएस आणि दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून तुम्ही तुमची हुशारी सिद्ध केली असेल तर तुम्हाला या प्रवेश परीक्षांचं दडपण घेण्याची गरज नाही. इतरांच्या तुलनेने तुम्हाला या परीक्षांचा अभ्यास सोपा जाईल. शिवाय प्रत्यक्ष परीक्षेतही चांगले यश मिळू शकेल, पण तुम्ही कमी हुशार असाल तरी परीक्षा द्यायची नाही असा टोकाचा विचार करू नका, सर्व प्रथम स्वत:च्या मनाशी हे मान्य करा की, मी अभ्यास न करता किंवा कमी अभ्यास करून या परीक्षेत यश मिळविण्याइतका हुशार नाही, मग माझ्याकडे कोणता मार्ग उरतो, तर तो कष्टाचा, पण हे कष्टसुद्धा नियोजनपूर्वक, पद्धतशीरपणे घेतले तरच यश मिळेल अन्यथा नुसती ढोरमेहनत उपयोगाची नाही.
या लेखात मी केवळ तुमच्या मनातील या परीक्षांविषयीची भीती घालवून तुम्हाला पॉझिटीव्ह विचार करायला लावणार आहे. माझ्या हातून अभ्यास होईल की नाही, ही आणखी एक चुकीची कल्पना मुलांच्या डोक्यात असते. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही केलात तर होईल असंच आहे. म्हणून वरील प्रश्नाऐवजी स्वत:च्या मनाला मी अभ्यास करणार आहे की नाही असा प्रश्न विचारा, प्रेशर कुकर जसा गॅस पेटवून त्यावर ठेवला की थोड्या वेळात होतो. तसा अभ्यास पुस्तक उघडं ठेऊन आपण झोपून राहिलो तर होत नाही, अभ्यास करावा लागतो. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ही उक्ती ध्यानात ठेवा.
या परीक्षा अवघड आहेत का? तर खरं उत्तर आहे, हो! अवघड आहेत. किंबहुना अवघड आहेत म्हणून तर त्या परीक्षा आहेत. एका शाळेत एक वाक्य सर्व विद्यार्थ्यांना येता जाता नजरेस पडेल अशा ठिकाणी रंगवून ठेवलयं ते आहे, 'Never say that the problem is difficult, had it been simple, it would have not called a problem' तात्पर्य या परीक्षा आहेत म्हणजेच त्या अवघड आहेत पण म्हणून त्या द्यायच्याच नाहीत असं नव्हे. प्रत्येक लहान मुलाला तो तीन महिन्याचा असताना पालथं पडणं, किंवा पुन्हा उताणं होणं, सहाव्या महिन्यात हाता पायांचा समन्वय साधून रांगणं, एक वर्षाचा होताना उभं राहाणं, चालणंसुद्धा वयाच्या मानानं प्रचंड अवघड असतं तरी आपल्या पैकी प्रत्येकानं त्या परीक्षा दिल्यात आणि थोडं मागे पुढे झालं तरी यशस्वी झालो आहोत. तशाच याही परीक्षा आहेत, न कंटाळता नेटानं, जिद्दीनं प्रयत्न करीत राहिलो तर यशस्वी होणारच!
या परीक्षांचा अभ्यासक्रम इ. ११ वी, १२ वीचाच आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं पाठ्यपुस्तकातून मिळतील असेच प्रश्न या परीक्षांमध्ये विचारणं बंधनकारक आहे. अभ्यासक्रमात नसलेल्या भागावर प्रश्न येत नाहीत. फरक एवढाच असतो बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दीर्घोत्तरी प्रश्न येतात, ४ गुणांच्या प्रश्नासाठी आकृती आवश्यक असते, तिला गुणदेखील असतात, प्रत्येक महत्त्वाच्या मुद्याला गुण असतात किंवा गणितात पायऱ्यांना गुण असतात, यामुळे एखाद्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर तुम्ही लिहू शकला नाहीत किंवा गणिताचे शेवटचे उत्तर चुकले तरी पूर्ण गुण जात नाहीत, अगदी ४ पैकी ३ गुणसुद्धा मिळू शकतात. प्रवेश परीक्षेत मात्र फक्त अचूक पर्यायाला गुण असतात. काही कारणाने अंतिम उत्तर चुकले तर ४ गुण तर जातातच पण चुकीचं उत्तर नोंदवलं म्हणून १ गुण कमी होतो, थोडक्यात, या परीक्षेत अचूकता साधणं, सर्वात महत्त्वाचं आहे.
- प्रा. शिरीष आपटे
0 comments:
Post a Comment