Monday, 16 March 2015

गुगलचा नवीन अभिनव कॅम्पस

गुगलचा नवीन अभिनव कॅम्पस
- वैभव पुराणिक, लॉस एंजलीस
गुगल कंपनी सध्या एक नवीन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. सहजपणे इमारतीचे मजले, त्यांच्या भिंती बदलता येईल, अशा अनोख्या पद्धतीचे हलक्‍या वजनाचे बांधकाम करण्याच्या प्रयत्नात गुगल कंपनी आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर बांधकाम क्षेत्रासाठी ती मोठी देणगी ठरेल. 
गुगलने अलीकडेच माउंटन व्ह्यूमध्ये एका नवीन मोठ्या कॅम्पसची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. खरंतर गुगलने ही घोषणा करणे हीच बातमीची गोष्ट असली तरीही प्रत्यक्ष कॅम्प्‌सचा आराखड्याने लोकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारच्या इमारती प्रत्यक्षात उभारणे शक्‍य आहे, की नाही यावरही लोक शंका घेत आहेत.

डेव्हिड रॅडक्‍लिफ गुगलमध्ये रिअल इस्टेट विभाग सांभाळतात. त्यांनी 27 फेब्रुवारीला गुगलच्या ब्लॉगवर गुगलने एका नवीन कॅम्पसची निर्मिती करण्यासाठीचा अर्ज स्थानिक "सिटी‘ला (महानगरपालिकेला) केला असल्याचे जाहीर केले. या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे गुगल सॅन फ्रान्सिस्कोजवळील माउंटन व्ह्यू शहरामध्ये चार वेगवेगळ्या जागा विकसित करणार आहे. या जागांमध्ये नेहमीप्रमाणे ऑफिसला लागणाऱ्या कॉंक्रीटच्या इमारती बनवण्याऐवजी एक वेगळ्या प्रकारच्या खास हलक्‍या असलेल्या इमारती बनवल्या जाणार आहेत. गुगल सतत नवीन निर्मिती करत असते. गुगल स्वनियंत्रित कारपासून सर्च इंजिनप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत असते. स्वनियंत्रित कार बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या जागेची आवश्‍यकता असते आणि सर्च इंजिनवर काम करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या जागेची आवश्‍यकता लागते. त्यामुळे ज्या जागेत सर्च इंजिन बनवले जाते, त्याच जागेचा भविष्यात स्वनियंत्रित कार बनवण्यासाठी वापर कसा करता येईल, याचा गुगलने विचार केला आहे. कॉंक्रीटच्या इमारतीऐवजी या जागेत स्टीलच्या फ्रेम बनवल्या जातील. या स्टीलच्या फ्रेमला सहज बदलता येणाऱ्या भिंती लावल्या जातील. मजला आणि छतही सहज काढता येतील. मजला, छत आणि भिंती काढून या स्टीलच्या फ्रेम काही तासांतच रोबोटिक क्रेनच्या (क्रॅबॉटच्या) सहायाने बदलून त्यामधून संपूर्णपणे वेगळा आकार साकार करणे शक्‍य होईल. अशा अनेक स्टीलच्या फ्रेमच्या इमारतींवर एक मोठी पारदर्शक कॅनॉपी घालण्यात येणार आहे. या कॅनॉपीतून हवा व सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. हवा आणि सूर्यप्रकाश आत आला तरी या कॅनॉपीमुळे गुगलला आतील हवामानाचे नियंत्रण करणे शक्‍य होईल. तसेच या कॅनॉपीमधील काच ही सर्वसाधारण काच नसून सौर ऊर्जा निर्मिती करू शकणारी काच असेल. त्यामुळे या इमारतीच्या सौंदर्याला बाधा न येता सौर ऊर्जेची निर्मिती शक्‍य होईल. या कॅनोपी लांबून एखाद्या प्रचंड तंबूप्रमाणे भासतील. या तंबूतील इमारती झाडे, कॅफे आणि सायकलीसाठी राखून ठेवलेल्या रस्त्यांबरोबर गुंफण्यात येणार आहेत. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात काम करण्याचा अनुभव येथे काम करणाऱ्यांना मिळेल.

सहज बदल करता येणाऱ्या इमारती ही काही नवीन संकल्पना नाही. 1940 मध्ये न्यूजर्सीमधील बेल लॅब्सने पहिल्यांदा सरकवता येणारी भिंत बनवली. त्यामुळे एखाद्या जागेचा आकार कमी जास्त करता येऊ लागला. 1960 मध्ये ऑफिसेसमध्ये क्‍युबिकलची संकल्पना आली. क्‍युबिकलमुळे कर्मचारी जास्त वाढल्यास जागा असेल, तर त्यांच्यासाठी पटकन अधिक क्‍युबिकल टाकता यायला लागले. हेच कर्मचारी कमी झाले तर क्‍युबिकल कमी करून ती जागा सहजपणे मोकळी करता येऊ लागली. हीच संकल्पना मोठी करून इमारतींच्या मजल्याच्या बाबत वापरायचा गुगलचा विचार आहे. त्यामुळे क्रेन रोबॉट वापरून अख्ख्या खोल्याच कमी अधिक करता येतील.

डॅनिश आर्किटेक्‍ट जार्के इंगेल्स आणि लंडनस्थित थॉमस हेदरविक स्टुडिओच्या सहायाने गुगलने या कॅम्पसचा आराखडा बनवला आहे. लॅंडस्केपिंगचे काम सॅन फ्रान्सिस्कोच्या सीएमजी लॅंडस्केप आर्किटेक्‍चर या कंपनीला देण्यात आले आहे. एक वर्ष शोधाशोध करून या आर्किटेक्‍टना निवडण्यात आले. जार्के इंगेल्सनी सुप्रसिद्ध स्मिथसोनियनचा दक्षिण कॅम्पस डिझाइन केला आहे. हेदरविकनी 2012 च्या लंडन ऑलिंपिकसाठीचे स्टेडियम आणि थेम्स नदीवरील लक्षणीय पूल डिझाइन केलेला आहे. अक्षरश: शेकडो वेगवेगळ्या डिझाइनमधून हे डिझाइन निवडण्यात आले आहे.

या प्रकल्पाचा आवाका लक्षात येण्यासाठी प्रथम काही आकडे समजून घेणे आवश्‍यक आहे. 31 डिसेंबर 2014 रोजी गुगलमध्ये जगभरात मिळून 53,600 कर्मचारी काम करत होते. त्यापैकी गुगलच्या माउंटन व्ह्यूमधील मुख्यालयात तब्बल 19,000 लोक काम करतात. गुगलने वेगवगेळ्या मिळून तब्बल 500 एकर जागा माउंटन व्ह्यू मध्ये गोळा केलेली आहे. ही जागा 101 हायवेच्या उत्तरेला सॅन फ्रान्सिस्को खाडीच्या काठावर वसलेली आहे. गुगलने माउंटन व्ह्यू मधील ही जागा निवडण्याच्या अनेक कारणापैकी येथील खाडीचं सौंदर्यही आहे. माउंटन व्ह्यू शहराच्या नॉर्थ बे शोअर या संपूर्ण भागाचा कायापालट करण्याचा विचार गुगलचा आहे. या नवीन प्रकल्पाने तब्बल 3.4 दशलक्ष स्क्वेअर फूट एवढी जागा तयार करण्यात येईल. चार वेगवेगळ्या जागांचा टप्प्याटप्याने विकास करण्यात येईल. पहिल्या भागाचा विकास 2020 मध्ये पूर्ण होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा प्रकल्प आजमितीला कुठल्याही कंपनीने हाती घेतलेला नाही. बरं हे सर्व करायला गुगलकडे पैशाची चणचण अजिबात नाही. 31 डिसेंबर 2014 रोजी गुगलकडे तब्बल 64 अब्ज डॉलर्स पडून होते!

माउंटन व्ह्यूच्या सिटी काउन्सिलला हा प्रकल्प मंजूर करण्याचे अधिकार आहेत; परंतु सिटी काउन्सिल हा प्रकल्प मंजूर करेल, की नाही हे लगेचच सांगता येत नाही. "माउंटन व्ह्यू‘च्या रहिवाशांना या प्रकल्पामुळे वाढलेल्या ट्रॅफिकचा सामना करावा लागेल. त्याशिवाय गुगलच्या या प्रकल्पामुळे येथील घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढतील, अशीही भीती काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामध्ये लोकांच्या राहण्यासाठी गुगलने किती जागा राखून ठेवली आहे, हे ही सिटी काउन्सिलला तपासून पाहावे लागेल. उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या मानाने माउंटन व्ह्यू मध्ये राहण्याच्या जागा अगदी कमी आहेत, अशी भीती काही काउन्सिल सदस्यांनी व्यक्त केली आहे; परंतु महानगरपालिकेला लालूच म्हणून की काय गुगलने आपल्या प्रकल्पामध्ये अनेक लोकोपयोगी गोष्टी घातल्या आहेत. फ्रिवेवरील सायकलस्वारांसाठीचा पूल, एक नवीन सायन्स सेंटर, अनेक उद्याने आणि चालण्यासाठी व सायकल चालवण्यासाठी मार्गांची योजना गुगलने आपल्या प्रकल्पात केली आहे.

प्रचंड पैसे खर्च करून नवीन ऑफिस बनवण्याचा प्रयत्न तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांही करत आहेत. फेसबुक सिलिकॉन व्हॅलीच्या मेनलो पार्कमध्ये फ्रॅंक गॅरी या जगप्रसिद्ध आर्किटेक्‍टने डिझाइन केलेली इमारत बनवत आहे. फेसबुक वेस्ट नावाचा हा 4.3 लाख स्क्वेअर फुटाचा कॅम्पस इको फ्रेंडली असणार आहे. पाणी आणि ऊर्जा वाचवण्याचे अभिनव मार्ग यात वापरण्यात येणार आहेत. बाहेरून पाहिलं असता एखाद्या निसर्गरम्य टेकडीकडे पाहत आहोत, असे तुम्हाला वाटेल, असे या कॅम्पसचे वर्णन खुद्द मार्क झुकरबर्गने केले आहे. ऍपल कंपनी आपले नवीन मुख्यालय सिलिकॉन व्हॅलीतल्या क्‍युपर्टीनो शहरातील तब्बल 176 एकर परिसरात बनवत आहे. हे मुख्यालय "स्पेसशिप‘च्या आकाराचे असून ते नॉर्मन फोस्टर या प्रसिद्ध आर्किटेक्‍टने डिझाइन केलेले आहे. या मुख्यालयात 14,000 लोकांना काम करता येईल. या मुख्यालयावर ऍपल तब्बल 3.5 ते 5 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे! या दोघांशिवाय लिंकड्‌ इन कंपनीचीही माउंटन व्ह्यू मध्ये अजून इमारती उभारायचा प्रस्ताव आहे. तसेच सिलिकॉन व्हॅलीच्या बाहेर सिएटल शहरामध्ये ऍमेझॉन तब्बल 3.3 दशलक्ष स्क्वेअर फुटाच्या इमारती बनवत आहे. यात तीन 37 किंवा 38 माळ्याच्या इमारती आणि तीन लहान इमारतींचा समावेश आहे. तीन लहान इमारतीपैकी एकाचा आकार गोळ्याच्या आकाराचा असणार आहे. या गोळ्याच्या आकाराच्या इमारतीत जगातील वेगवेगळ्या भागातील उंचावर वाढणारी झाडे लावण्यात येणार आहेत. गोळ्याच्या आतील भागाचे तापमान आणि आर्द्रता खास झाडांचा विचार करून ठरवण्यात येणार आहे. परंतु, या सर्व इमारतींमधे गुगलचा आराखडा तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त अभिनव आहे. किंबहुना हा आराखडा प्रत्यक्षात आणण्यासाठीचे तंत्रज्ञान अजूनही विकसित झालेले नाही, गुगल त्यावर काम करत आहे.

अनेक वेळा तंत्रज्ञान कंपन्या खूप मोठा गाजावाजा करून अशा प्रकारचा अभिनव प्रकल्प जाहीर करतात. परंतु, काही कारणाने तो प्रकल्प बारगळतो. गुगलच्या ह्या प्रकल्पाची अशी गत होऊ नये एवढीच माझी प्रार्थना!


0 comments:

Post a Comment