Monday, 16 March 2015

इंजिनीअरिंग प्रवेशाची गुरुकिल्ली


इंजिनीअरिंग प्रवेशाची गुरुकिल्ली

अॅप्लिकेशन फॉर्म भरताना अडचणी आल्यास काय करावे? कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर कसा मोजावा? ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेज कसं निवडावं? प्राधान्यक्रम काय असावा? असे अनेक प्रश्न इंजिनीअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्यांचंच समाधान करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'इंजिनीअरिंग प्रवेशाची गुरुकिल्ली' या सेमिनारचं आयोजन केलं होतं.

इंजिनीअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील प्रसिद्ध कौन्सिलर प्रा. केदार टाकळकर यांनी इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजून सांगत त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. तर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आत्मविश्वास वाढवणं कसं शक्य आहे, याचं मार्गदर्शन वालिया कॉलेजचे प्राचार्य, प्रा. विनायक परळीकर यांनी केलं. या कार्यक्रमाला कॉस्मोपॉलिटन्स एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट हर्सदजी वालिया, जॉइंट सेक्रेटरी दर्शना कोठारी, मेंबर ऑफ गव्हर्निंग कौन्सिल अजित बालन आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे जाणं महत्त्वाचं...

दहावी आणि बारावी हे अभ्यासाचे दोन टप्पे पार पाडून विद्यार्थी जेव्हा इंजिनीअरिंगकडे वळतो, तेव्हा त्याला ही प्रवेश प्रक्रिया किचकट जाणवते. नेमक काय करणं अपेक्षित आहे, याचा गोंधळ मनात असतो. इंजिनीअरिंगचं शिक्षण म्हणजे काही तरी फार वेगळी गोष्ट आहे, अशी त्यांची सामान्य समजूत तयार होते. कॉलेज, कॉलेजची वेळ, तेथील वातावरण, अभ्यासक्रम हा इतरांपेक्षा फार वेगळा आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांची मनस्थिती स्थिर असावी. स्पर्धा सर्वच क्षेत्रांत आहे. प्रत्येक वेळी आपण ठरवतो, तसंच होईल असं नाही. मात्र विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींमधून पुढे जाण्याचा मार्ग शोधून काढणं गरजेचं आहे. आई किंवा वडील सांगतात म्हणून नव्हे, तर स्वतःसाठी शिकायचं, हे सदैव मनात असू द्या. आपल्या मध्ये अमर्याद कार्यक्षमता आहे. ती योग्य प्रकारे वापरात आणता आली पाहिजे. तेव्हा विचार करण्याच्या कक्षा वाढवा. आत्मविश्वास स्वत:हून निर्माण होईल. प्रत्येक वाक्याला जर तुम्ही पाच वेळा का? असा प्रश्न विचारला, तर त्याचे योग्य उत्तर मिळते. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. एखादी गोष्ट तुमच्या कानावर आली, तर त्या गोष्टीची सत्यता पडताळून पहा. ती गोष्ट चांगली आहे की वाईट हे तपासा. त्याचा तुम्हाला उपयोग आहे का, हे पहा. या तीन गोष्टींची सकारात्मक उत्तरं मिळाली, तरच त्यावर चर्चा करा. आत्मविश्वास वाढवा म्हणून काही वेगळे करण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी आपल्याकडे उपजत आहेत. केवळ आपला दृष्टीकोन बदलला तर प्रत्येक अडचणींवर सहज मात करता येईल. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल, तर यशस्वी होणं सहज शक्य आहे.

कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर इंजिनीअरिंगला प्रवेश हवा असेल तर कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर मोजताना विद्यार्थ्याला बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांत मिळालेल्या गुणांना आणि जेईई-मेन मध्ये मिळालेल्या गुणांना समान म्हणजेच पन्नास-पन्नास टक्के महत्त्व दिलं गेलं आहे. दोन्ही परीक्षांतील प्राप्त गुणांनुसार आठ डेसिमल पर्यंत मिळालेला कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लक्षात घेतला जातो. कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर विचारात घेऊनच मेरिट लिस्ट लावली जाणार आहे.

स्टेट मेरिट लिस्ट अप्लिकेशन फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर विद्यार्थ्यांच्या कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोरनुसार स्टेट मेरिट लिस्ट लावण्यात येते. या मेरिट लिस्ट मधील तुमच्या एसएमएल क्रमांकानुसार तुम्हाला कॅप राऊंडमध्ये कॉलेज उपलब्ध होतं. स्टेट मेरिट लिस्ट जाहीर होताच विद्यार्थ्यांना एसएमएल क्रमांकासह त्यांचे लिंग, जात, विद्यापीठ या गोष्टी विचारात घेऊन विविध प्रवर्गातील क्रमांक दिले जातात.

ट्युशन फी वीव्हर स्कीम (टीएफडब्ल्यूएस) शासनाच्या इतर सवलतींसोबतच इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीएफडब्ल्यूएस ही अधिक सवलत देण्यात आली आहे. ही सवलत हवी असल्यास विद्यार्थ्याने अप्लिकेशन फॉर्म भरतानाच टीएफडब्ल्यूएस हवी का? या प्रश्नासमोर 'हो' असे नमूद करणं गरजेचं असेल. संविधानिक आरक्षण प्राप्त झालेल्या सर्व प्रवर्गांना फीमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदतीसह शिक्षण घ्यायचं असल्यास त्याच्यासाठी टीएफडब्ल्यूएस हा पर्याय निर्माण केला आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडे चार लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास विद्यार्थ्याला ही सवलत मिळू शकते. प्रत्येक कॉलेजांमधील पाच टक्के जागांसाठी ही सवलत उपलब्ध आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑप्शन फॉर्म भरताना या जागांसाठी विशेष कोड देण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांनी या सवलतीचा निश्चितपणे विचार करावा.

चुका करणं टाळा. अप्लिकेशन फॉर्म भरताना काही चूक झाल्यास विद्यार्थ्यांना ती चूक एआरसी येथे जाऊन दुरूस्त करण्याची सोय आहे. मात्र ऑप्शन फॉर्म भरताना चूक झाल्यास ती दुरुस्त करता येणार नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म फार काळजीपूर्वक भरावा. एका कागदावर विद्यार्थ्यांनी सर्व चॉइस कोड प्राधान्य क्रमाने लिहून काढावे आणि ऑप्शन फॉर्म भरताना ते जसेच्या तसे उतरवावे. असं केल्यास चुक टाळणं सहज शक्य आहे.

प्राधान्यक्रम बदलू नका. इंजिनीअरिंग प्रवेशातील तीनही कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे चॉइस कोड भरू नयेत. प्राधान्यक्रम विचारपूर्वक तयार केलेला असल्याने पुढील कॅप राऊंडसाठी सुद्धा तोच प्राधान्यक्रम वापरा. त्यामुळे प्रत्येक कॅप राऊंडमध्ये अधिक चांगलं कॉलेज उपलब्ध होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा एकदा तयार केलेला प्राधान्य क्रम कोणत्याही कारणामुळे बदलू नका.

नामांकित कॉलेजांना प्राधान्य द्या. आपला एसएमएल क्रमांक, मागील वर्षाची कट ऑफ, कॉलेजने केलेले जागा वाटप पाहून विद्यार्थ्यांनी आपले प्राधान्यक्रम ठरवावेत. आपला एसएमएल क्रमांक चांगला असेल तर विद्यार्थ्यांनी नामांकित कॉलेजांना प्राधान्य द्यावं. चांगले पर्याय समोर ठेवल्यास चांगले कॉलेज उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. मात्र विद्यार्थ्यांनी स्वत:हून कमी दर्जाच्या कॉलेजांचे पर्याय देऊ नयेत.

कॅप राऊंड

इंजिनीअरिंग प्रवेशातील टप्प्यांना कॅप राऊंड म्हणतात. असे चार टप्पे इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत. पहिल्या तीन टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं असतं. विद्यार्थी कमीत कमी एक ते जास्तीत जास्त शंभर पर्याय या ऑप्शन फॉर्ममध्ये देऊ शकतात. पहिल्या कॅप राऊंडमध्ये दिलेल्या प्राधान्य क्रमातील पहिले कॉलेज उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं, बंधनकारक आहे. दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये दिलेल्या प्राधान्य क्रमातील पहिल्या तीन कॉलेजांपैकी एखादं कॉलेज उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या कॉलेज मध्ये प्रवेश घेणं, बंधनकारक आहे. तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये दिलेल्या प्राधान्य क्रमातील पहिल्या सात कॉलेजांपैकी एखादे कॉलेज उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या कॉलेज मध्ये प्रवेश घेणं, बंधनकारक आहे. कॅप राऊंडमध्ये उपलब्ध झालेल्या कॉलेजमध्ये दिलेल्या वेळेत प्रवेश निश्चित केल्यास विद्यार्थी पुढील कॅप राऊंडसाठी विचारात घेतला जातो. तीनही कॅप राऊंडनंतर मनासारखं कॉलेज उपलब्ध न झाल्यास रिक्त जागांसाठी चौथा टप्पा औरंगाबाद इथे घेतला जातो. या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणतंही आरक्षण विचारात घेतलं जात नाही.

कॉलेज निवडताना... इंजिनीअरिंग कॉलेजची वेळ साधारणतः ९ ते ४:३० अशी असते. तेव्हा येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीचं कॉलेज विद्यार्थ्यांनी निवडावं. जेणेकरून प्रवासाचा वेळ वाचेल आणि अभ्यासासाठी मुबलक वेळ उपलब्ध होईल. गेल्या वर्षी किती विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट सेलच्या सहाय्याने नोकरी उपलब्ध झाली, हे पाहून विद्यार्थ्याने कॉलेज निवडावे. हे पाहताना कंपनी, मिळालेल्या नोकरीचे स्वरूप, मिळालेले पॅकेज यांचा विचार करावा. आपण निवडत असलेल्या कॉलेजमधील स्टाफ किती चांगला आहे, यावर तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडून मत घेऊ शकतो. शिवाय त्यांचं शिक्षण, शिकवण्याची पद्धत हे तपासून आपण कॉलेज निवडू शकतो.

शाखा निवडताना... इंजिनीअरिंगची शाखा निवडताना आपल्याला त्या शाखेत आयुष्यभर काम करायचं आहे, हे विसरता कामा नये. शाखा निवडताना आपल्या आवडत्या शाखेची सविस्तर माहिती घ्या. अनेक घरांत वडिलोपार्जित व्यवसाय असतात. वडीलांच्या व्यवसायाला हातभार लागावा. म्हणून अनेक विद्यार्थी आपल्या व्यवसायाशी संबंधित शाखा निवडतात. इंजिनीअरिंगकडे वळताना अनेक विद्यार्थी अमुक एखाद्या आवडत्या शाखेत प्रवेश हवा, म्हणूनच इंजिनीअरिंग शिकण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लोकांकडून त्या शाखेची माहिती घ्यावी. पण स्वतःची आवड जपत योग्य शाखेची निवड करावी.

मेकॅनिकल कोणी घ्यावं? इंजिनीअरिंगकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा मेकॅनिकल हीच शाखा हवी असते. टीम वर्क करताना तुम्ही सर्वांमध्ये मिळून मिसळून राहू शकत असाल. तरच मेकॅनिकल शाखा निवडा. जर 'मी बरा आणि माझं काम बरं' असा तुमचा दृष्टीकोन असेल, तर मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेऊ नका. कम्प्युटर आणि आयटी शाखेत जाणारे विद्यार्थी एका ठिकाणी एकटं बसून आपलं काम करू शकतात. खूप अभ्यास करू शकत असाल, स्वतःला अपडेटेड ठेवू शकत असाल, कम्प्युटर आणि आयटी उत्तम पर्याय आहे. कोणत्याही शाखेचा वेडा हट्ट धरू नका. तुमच्या अभ्यासानुसार, स्वभावानुसार तुम्हाला झेपेल, अशीच शाखा निवडा.

एकसारखी नावं असलेल्या शाखा प्रत्येक पारंपरिक शाखेसह अनेक समान नावं तसेच समान अभ्यासक्रम असलेल्या शाखा आहेत. इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक शाखांकडे असतो. विद्यार्थ्यांनी या पारंपरिक शाखांसाठी अडून न राहता समान अभ्यासक्रम असलेल्या इतर शाखांचाही विचार करावा.

ऑप्शन फॉर्म भरताना... चॉइस कोड समजून घ्या. ऑप्शन फॉर्ममध्ये चॉइस कोड भरण्यापूर्वी चॉइस कोड म्हणजे नक्की काय भानगड आहे, हे नीट समजून घ्या. चॉइस कोड कसा तयार होतो, हे समजून घेतल्यास विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका सहज टाळू शकतात. चॉइस कोड आठ अंकी असतो. आठ अंकी चॉइस कोड मधील पहिले चार अंक म्हणजे तुम्ही निवडलेल्या कॉलेजचा कॉलेज कोड असतो. प्रत्येक कॉलेजचा कॉलेजकोड वेगळा असतो. कॉलेजकोड नंतरचे तीन अंक तुम्ही निवडलेली शाखा दर्शवितात. प्रत्येक शाखेसाठी हा तीन अंकी कोड वेगळा असतो. चार अंकी कॉलेजकोड आणि तीन अंकी शाखेचा कोड यानंतर चॉइस कोडमधील उर्वरित एक अंक तुम्ही निवडत असलेल्या शाखेची शिफ्ट दर्शवितात. साधारणतः इंजिनीअरिंगचं शिक्षण दोन शिफ्टमध्ये चालतं. मुंबईमध्ये मात्र अनेक कॉलेजांमध्ये एकच शिफ्ट चालते. एखाद्या कॉलेजच्या एखाद्या शाखेसाठी टीएफडब्ल्यूएस चा पर्याय उपलब्ध असल्यास आठ अंकी चॉइस कोड नंतर (T) हे इंग्रजी अक्षर लावलं जातं. टीएफडब्ल्यूएस चा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी (T) हे इंग्रजी अक्षर असलेले चॉइस कोड ऑप्शन फॉर्म मध्ये भरावेत. असे चॉइस कोड ऑप्शन फॉर्ममध्ये भरले असल्यास विद्यार्थ्यांना टीएफडब्ल्यूएसचा लाभ घेता येईल. ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळता याव्या यासाठी चॉइस कोड कसा तयार होतो, हे वर सांगितलं आहे. मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःचे चॉइस कोड तयार न करता उपलब्ध चॉइस कोडचा वापर करावा. (चॉइस कोड....61793721T, 69813362)

आरक्षण समजून घ्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत, हे ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी तपासून घेतल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश कुठे मिळू शकतो, आणि कुठे नाही, याचा अंदाज येईल. तेव्हा विद्यार्थ्यांनी आरक्षण समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखाद्या कॉलेजमधील, एखाद्या शाखेत, एखाद्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत, याची तपशीलवार यादी डीटीईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ही यादी पाहून त्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडे चार लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास विद्यार्थ्याला टीएफडब्ल्यूएस ही सवलत मिळू शकते. प्रत्येक कॉलेजांमधील पाच टक्के जागांसाठी ही सवलत उपलब्ध आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑप्शन फॉर्म भरताना या जागांसाठी विशेष कोड देण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांनी या सवलतीचा निश्चितपणे विचार करावा. जेईईमध्ये पॉझिटीव्ह स्कोअर केलेल्या (शुन्याहून अधिक गुण मिळवलेल्या) प्रत्येक विद्यार्थ्याने अप्लिकेशन फॉर्म भरताना ऑल इंडिया कोटा (AIR) यासाठी अर्ज करायचा आहे का? असे विचारले असता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी 'हो' हेच उत्तर द्यावं. या कोट्यासाठी सर्व कॉलेजांमध्ये १५ टक्के जागा आरक्षित आहेत. अल्पसंख्यांक समूहाच्या कॉलेजमध्ये ५१ टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी, २० टक्के मॅनेजमेंट कोट्यासाठी तर उर्वरित २९ टक्के इतरांसाठी आरक्षित असतात. इथे इतर कोणतंही आरक्षण लागू होत नाही. होम युनिव्हर्सिटी (HU) म्हणजेच मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील ७० टक्के जागा आरक्षित आहेत. तर उर्वरित ३० टक्के जागा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी (OHU) म्हणजेच मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील ३० टक्के जागा मुलींसाठी आरक्षित आहेत.

ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना याच प्रवेश प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. मात्र ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये वरील कोणतंही आरक्षण लागू होत नाही. तिथे प्रवेश फक्त मेरिटनुसार दिला जातो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजमधील जागा वाटप पाहूनच ऑप्शन फॉर्म भरावा. संविधानिक आरक्षणासह वरील आरक्षित जागांसाठी प्रत्येक शाखेतील उपलब्ध जागांचे वाटप दाखवणारा तक्ता

Related Posts:

  • Happiness Is Homemade Happiness Is Homemade Regardless of whether we live in the US, India or anywhere else, family is the building block of any society, and our greatest fulfillment lies there. Of course, one needs to give due … Read More
  • Wonderful Life Wonderful Life Realize that you are magnificence in human form and that your potential is unlimited. You truly are unique and there is no one in the universe with the exact same experiences and perspectives… Read More
  • सोपी सीईटी खोटा कॉन्फिडन्स प्रा. डॉ. सुनील कुटे ,चेअरमन, बोर्ड ऑफ स्टडीज्, सिनेट मेंबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे  ( शब्दांकन -प्रतिनिधी) -   बारावीनंतर बीए-बीकॉम करायचं असेल तर द्याव्या लागतात का प्रवेश परीक्षा? मग इंजिनिअरिंगच… Read More
  • Its Time to Quit Smoking Its Time to Quit Smoking "I am going to quit smoking tomorrow..." How many times have you said this and how many more times have you heard it? Smokers, like alcoholics, make this pledge many times in their … Read More
  • The Power of Positive Thinking The Power of Positive Thinking Positive thinking is a mental attitude that admits into the mind thoughts, words and images that are conductive to growth, expansion and success. It is a mental attitude that … Read More

0 comments:

Post a Comment