Tuesday, 17 March 2015

माय बनलेलं कॉलेज

माय बनलेलं कॉलेज  - (उत्तम कांबळे)
- उत्तम कांबळे (uttamkamble56@gmail.com)
काही मुला-माणसांना परिस्थितीमुळं म्हणा किंवा आणखी कशामुळं म्हणा, अनाथ आयुष्य जगावं लागतं; पण या अनाथांची स्वप्नं कधीच अनाथ नसतात...भरारी घेण्यासाठी त्या स्वप्नांना पंखांचा भरभक्कम आधार द्यायला कुणीतरी, कुठंतरी उभं राहतंच. मग अशा स्वप्नांची पाखरं आभाळभर व्हायला उशीर तो काय? अशाच काही जित्याजागत्या स्वप्नांची माय बनून त्यांच्या जगण्याला नवी दिशा देत आहेत एक प्राचार्य...

राजगुरुनगरमध्ये तुम्ही कधीही जा...वाहतुकीचा एक मोठा चक्रव्यूह तयार होतो... ‘बळी तो कान पिळी’ हाच न्याय तिथं चालतो... वर्दीवाला हताश होऊन पाहत असतो, की लोकांनी वाहतूक-नियम मोडण्याचे किती मार्ग तयार केले आहेत...! एकतर बळ किंवा एकतर नसलेल्या दैववादावर भरोसा ठेवून वाहतुकीतून बाहेर पडावं लागतं... पुढं आळे फाट्याचा रस्ता रुंद होऊनही तिथंही वाहतुकीची प्रचंड कोंडी होते...कारणं कोणतीही असतात. परवा तर नवरदेवाची मिरवणूक निघाली होती...मिरवणूक तर अशी की जुनी राजेशाही अवतरावी...भल्या मोठ्या हत्तीवर अंबारीत नवरदेव बसला होता... त्याच्या पुढं सजवलेले चार उंट...त्यांवर सजलेली चार माणसं; मग पुढं युद्धावर निघाल्याप्रमाणे सजवलेले चार घोडे, त्यांच्यावर तलवार घेऊन बसलेले चार मावळे... मग डान्स करणारी पार्टी... त्यात हातात नोटा घेऊन... मदिरेच्या आहारी जाऊन बेधुंद नाचणारा एक... त्याच्या मागं बॅंडची मोठीच्या मोठी गाडी... गाडीत झटक्‍याची गाणी म्हणणारी युवती... आजूबाजूला आणि पुढं-मागं माणसांची म्हणजे लग्नात सहभागी होणाऱ्यांची गर्दी... बाप रे बाप..! लग्नसंस्कार असतो की वैभवाचं प्रदर्शन, लग्न दोन मनांचं मीलन असतं की शक्तिप्रदर्शन..? असाच काहीसा प्रश्न पडला... कुणा एका शेतकऱ्यानं हेलिकॉप्टरमधून नवरदेव आणला तर इथं हत्ती, घोडे, उंटांवरून...लोकशाहीत स्वातंत्र्य असल्यानं लग्नात कुणी किती खर्च करावा याला काही मर्यादा नाही... लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना लग्नातल्या सभांना, समारंभांतल्या भोजनावळींना चाप लावण्यात आला... नंतर चाप सुटला आणि लग्नात कोटीच्या कोटी उड्डाणं होऊ लागली...

आम्हाला तर वाहतुकीतून लवकर बाहेर पडून नाशिक आणि तिथून नामपूरला पोचायचं होतं... झालंच तर सिन्नरमधल्या वाहतुकीचा चक्रव्यूह भेदायचा होता...मग सटाण्याला आणि मग नामपूरला पोचायचं होतं...

नामपूर तसं १८-२० हजार लोकवस्तीचं गाव... या गावाला स्वतःची तशी फार मोठी ओळख नाही... खुटाडे नावाच्या एका स्वातंत्र्यसैनिकानं शंभरेक वर्षांपूर्वी सुरू केलेलं वाचनालय. पाठीमागं मांगीतुंगी हे जैन तीर्थक्षेत्र आणि तीसेक वर्षांपूर्वी गांधी विद्यामंदिर या भाऊसाहेब हिरे यांच्या संस्थेचं कॉलेज...तसं मी यापूर्वीही इथं येऊन गेलो होतो; पण आत्ताचं कारण चटका लावणारं जसं होतं, तसंच मानवी मूल्यांचा जागर करत दिलासा देणारंही होतं...

या महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मनात सामाजिक जाणिवा निर्माण करून कॉलेजचं सामाजिकीकरण करायला सुरवात केलीय... आपल्याकडं विद्यापीठ आणि महाविद्यालयं लोकांपर्यंत पोचण्याच्या घोषणा होतात; पण घोषणा कधी अमलात येत नाहीत... अपवादानंच कुठं तरी काहीतरी आगळंवेगळं घडतं... तर दिनेश शिरोडे (९०११०२७६०३) यांनी सहकारी-प्राध्यापकांची एक विचार-टीम तयार केली आणि एकेक उपक्रम घ्यायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी कोणत्या कायद्याची, जीआरची वाट पाहिली नाही...स्वतःच्या संवेदनांचा जीआर बनवला आणि पहिला उपक्रम घेतला तो कारगिलच्या युद्धात आणि नंतरही सीमेवर रक्षण करता करता हुतात्मा बनलेल्या जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या सत्काराचा... पंचक्रोशीतले लोक आणि सारे विद्यार्थी जमवून हा सत्कार घडवला. खरं तर सत्काराला फार महत्त्व नव्हतं; पण यानिमित्तानं समाजाला एक संदेश देण्यात आला. मला वाटतं, हा संदेश खूप महत्त्वाचा होता...जवानांच्या कुटुंबीयांच्या मागं समाज उभा आहे...त्यांच्या देशभक्तीला तो सलाम करतो आहे...नव्या पिढीत देशभक्ती रुजवतो आहे, असा तो संदेश होता. वडील भारत-चीन युद्धात जखमी होऊन परतले होते...मला आठवतंय... आमची किंवा त्यांची साधी चौकशीही कुणी केली नव्हती... नंतर त्यांच्या मरणाच्या वेळीही कुणी त्यांच्यातला जवान पाहिला नाही... असंच अनेकांच्या बाबतीत घडत राहतं... ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं आता आपण केवळ मनोरंजनासाठी ऐकत आहोत. शिरोडे यांनी सत्कार केला...रूपाली नावाची एक वीरपत्नी बारावीच्या वर्गात याच महाविद्यालयात शिकत होती...पती हुतात्मा झाल्यावर येणाऱ्या वैधव्यातून तिला बाहेर काढलं... कॉलेजमधल्या अध्यापक-कर्मचाऱ्यांचे आशीर्वादाचे आणि मदतीचे हात पुढं आले. या साऱ्यांनी रूपालीला धीर दिला. भविष्यात ती स्वावलंबी व्हावी, जगण्यासाठी तिच्यातला आत्मविश्वास वाढावा, यासाठी तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून घेतलं. वर्गणी काढून प्रत्येक वेळेला तिची फी भरण्यात आली...

एक दिवस शिरोडे यांना काय वाटलं कुणास ठाऊक ! दोन-अडीच हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्गात ते स्वतः गेले... कुणी अनाथ आहे का, याची चौकशी केली. अनाथ म्हणजे ज्याला आई आणि वडील दोघंही नाहीत. शोध घेता घेता असं निदर्शनास आलं की कॉलेजमध्ये असे दहा विद्यार्थी (आठ मुली आणि दोन मुलगे) आढळून आले, की ज्यांना आई-वडील नाहीत. वेगवेगळ्या कारणांनी ते दगावले होते. अपघात, विकार आणि कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं ते दगावले आणि ही मुलं अनाथ होऊन कोणत्या तरी नातेवाइकाच्या आश्रयानं जगत आहेत. बहुतेकांच्या ओंजळीत दारिद्य्र चकाकतं आहे. उपजीविकेची आणि शिक्षणाची फी भरण्याची साधनं त्यांच्याकडं नाहीत. वरिष्ठ महाविद्यालयात आणि तेही खासगी महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही... मागं युतीचे सरकार असताना ‘मुलींना पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत’ अशी घोषणा झाली होती. त्यालाही २०-३० वर्षं झाली. सरकारं आली आणि गेली आणि घोषणा तशीच पडून राहिली. हृदय आणि श्‍वास बंद पडल्यासारखी... सरकार जिवंत आणि घोषणा मृत असं काहीतरी घडतंय... तर या दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. शिरोडे यांनी या साऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावलं. त्यांना सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट सांगितली ती म्हणजे ः ‘आजपासून तुम्ही मला आणि तुमच्या कॉलेजला आई-वडील समजा...आम्हीच तुमचे पालक होऊ आणि तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू. तुमच्यासाठी ग्रंथालय सदैव उघडं ठेवू. तुमच्या कलागुणांना वाव देऊ. तुमच्या अन्य अडचणीही सोडवू... खचू नका. लढत राहा...’

दहा विद्यार्थ्यांमध्ये असे काही जण आहेत, की लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. कुणी आईचं, कुणी बापाचं, तर कुणी दोघांचंही तोंड पाहिलेलं नाही. एकाची आई आजारात गेली, मग तिच्या वडिलानं आत्महत्या केली. दर्शनाची आई ती अकरा महिन्यांची असताना गेली. वडील किडनीच्या विकारानं गेले. डोक्‍यावरचं आभाळ कोसळावं आणि पायाखालची जमीन दुभंगावी अशी अवस्था निर्माण झाली. यातले बहुतेक विद्यार्थी विज्ञान शाखेत; तर काही कला शाखेत आहेत. मीनल आणि स्वाती सख्ख्या बहिणी आहेत. स्वाती जोरदार कविता लिहिते. या भागातली बहिणाबाई वाटावी अशा तिच्या कविता आहेत. तिला आयएएस उत्तीर्ण व्हायचंय; तर दर्शनाला लष्करात जायचं आहे. कोमलला फौजदार व्हायचं आहे. तिचे वडील अगोदरच गेले. पाठोपाठ आई गेली. ही मनानं आणि शरीरानंही दुबळी बनली; पण आता प्राचार्य शिरोडे यांच्या मदतीनं नव्या जगण्याची, नव्या स्वप्नांची पेरणी ती करते आहे. कोमलला आयपीएस व्हायचं आहे. ती आता एसवायबीएस्सीत आहे. काय काय स्वप्नं आहेत पोरांची ! प्राचार्यांच्या प्रेरणेमुळं ती रुजायला लागली आहेत.

या सर्व अनाथ विद्यार्थ्यांच्या मनातली ‘अनाथ’ ही भावना सर्वप्रथम काढून टाकण्यात आली. प्राचार्यांनी त्यांना सांगून ठेवलंय ः ‘तुम्ही कधीही, कोणत्याही कारणासाठी माझ्याकडं येत जा...’सर्वांची फी भरण्याची आणि त्यांना पुढील शिक्षण घेता येईल, अशी व्यवस्था तयार करण्याचा एक सामुदायिक निर्णय प्राचार्य शिरोडे यांच्या नेतृत्वाखाली झाला. सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारीही पुढं आले. १०० ते ५०० रुपयांपर्यंत आपापल्या कुवतीनुसार वर्गणी देण्याचा निर्णय झाला. बॅंकेत जॉईंट खातं निघालं. महिन्याला पाच-दहा हजार रुपये तरी त्यात जमा होणार आहेत. बाहेरच्यांकडून कसलीही मदतीची अपेक्षा ठेवण्यात आलेली नाही. ‘आमची पोरं, आम्हीच त्यांचे आई-बाप, आम्हीच त्यांना शिकवू,’ या न्यायानं हे सारं सुरू राहणार आहे. स्वातीनं एक डायरी भरून कविता लिहिलेल्या आहेत. वेदना आणि प्रतिभा यांचा मोडका-तोडका का असेना; पण संगम आहे. विनोद गोरवाडकर कविता तपासतोय. काव्यसंग्रह कसा काढायचा यावर विचार सुरू आहे.

मी बहुतेक विद्यार्थ्यांना भेटलो... त्यांच्या मनात लढण्याची आणि लढून विजयी होण्याची स्वप्नं दिसत होती. आयुष्य सुंदर घडवण्याचं स्वप्न दिसत होतं. काळजातून डोक्‍यात आणि डोक्‍यातून चेहऱ्यावर उतरलेला आत्मविश्वास दिसत होता. शिक्षणाचा हब बनत असल्याच्या काळात एक महाविद्यालय आई-वडिलाची सच्ची भूमिका घेऊन उभं राहतं, याचं मला खूप अप्रूप वाटायला लागलं. अन्य काही कॉलेजांमध्येही हे असे काही उपक्रम होतात; पण ते अपवादानंच. टोकदार आणि जीवघेण्या स्पर्धेच्या उभ्या असलेल्या जगात अशी महाविद्यालयं दुर्मिळ आहेत; म्हणून त्यांचं मोलही अधिक आहे. हरणाऱ्यांना -जिंकणाऱ्यांना मैदानावर न्यायचं असेल, कोसळलेल्या आभाळाखाली चिरडल्या जाणाऱ्यांसाठी नवं जग तयार करायचं असेल, तर

साथी हाथ बढाना, साथी रे
एक अकेला थक जायेगा
मिलकर बोझ उठाना
साथी हाथ बढाना...
 
‘नया दौर’ या चित्रपटातलं हे गाणं नामपूर सोडताना आठवायला लागलं...अनाथांच्या जीवनातही ‘नया दौर’ सुरू झाला होता. प्राचार्य शिरोडे यांना खूप खूप धन्यवाद दिले. माझी आणि लढून आयुष्य घडवणाऱ्या या नव्या नायकांची त्यांनी भेट घडवून आणली. ज्याला आयएएस व्हायचं होतं त्याला म्हणालो ः ‘उद्या लाल दिव्याच्या गाडीतून जाताना मी जर रस्त्यावर तुला दिसलो, तर काच खाली करून मला पाहा. लिफ्ट देऊ नको. यानिमित्तानं मला नवा नायक पाहता येईल.’ अशाच शुभेच्छा कवितेत गुंतलेल्या स्वातीला दिल्या. म्हणालो ः ‘इतकी मोठी कवयित्री हो, की तुझ्या मुलाखतीसाठी सारी माध्यमं (अर्थात माझ्यासह) तुझ्या मागं धावतील...’शेवटी असंही वाटायला लागलं, की जे पूर्णपणे अनाथ आहेत, त्यांच्या सर्वच शिक्षणाची जबाबदारी शासनानं ‘का घेऊ नये..?’ सुरवातीला लग्नाचा आणि चक्रव्यूहाचा उल्लेख मुद्दामच केला आहे. जगाला विषमतेच्या भेगा कशा पडत आहेत, हे सहजच कळावं म्हणून... एकीकडं अंबारीत बसलेली आणि दुसरीकडं डोक्‍यावरचं छप्पर शोधण्यात असलेली एक पिढी... कसं पचवायचं होतं हे दृश्‍य...!

Related Posts:

  • शिव खेड़ा के अनमोल विचार जीतने वाले अलग चीजें नहीं करते, वो चीजों को  अलग तरह से करते हैं.  -शिव खेड़ा जीतने वाले लाभ देखते हैं, हारने वाले नुकसान  . -शिव खेड़ा "यदि आपको लगता है कि आप क… Read More
  • सफलता की कुंजी "एक विचार लें. उस विचार को अपनी जिंदगी बना लें. उसके बारे में सोचिये, उसके सपने देखिये, उस विचार को जिए. आपका मन, आपकी मांसपेशिया, आपके शरीर का हर एक अंग, सभी उस विचार से भरपूर हो. और दुसरे सभी विचारों को छोड़ दे. यही स… Read More
  • स्वामी विवेकानन्द उठो, जागो और तब तक रुको नही जब तक मंजिल प्राप्त न हो जाये । -स्वामी विवेकानन्द §  जो सत्य है, उसे साहसपूर्वक निर्भीक होकर लोगों से कहो–उससे किसी को कष्ट होता है या नहीं, इस ओर ध्यान मत दो। दुर्बलत… Read More
  • Five most Beautiful Motivational and Inspirational Quotes said by Barack Obama Five most Beautiful Motivational and Inspirational Quotes said by Barack Obama Quote 1:-Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we've been waiting for. We are t… Read More
  • -स्वामी विवेकानन्द किसी बात से तुम उत्साहहीन न होओ; जब तक ईश्वर की कृपा हमारे ऊपर है, कौन इस पृथ्वी पर हमारी उपेक्षा कर सकता है? यदि तुम अपनी अन्तिम साँस भी ले रहे हो तो भी न डरना। सिंह की शूरता और पुष्प की कोमलता के साथ काम कर… Read More

0 comments:

Post a Comment