Friday, 13 March 2015

सोपी सीईटी खोटा कॉन्फिडन्स

प्रा. डॉ. सुनील कुटे ,चेअरमन, बोर्ड ऑफ स्टडीज्, सिनेट मेंबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 
( शब्दांकन -प्रतिनिधी) -
 
बारावीनंतर बीए-बीकॉम करायचं असेल तर द्याव्या लागतात का प्रवेश परीक्षा? मग इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठीच का घेतल्या जातात या अवघड प्रवेश परीक्षा?
- इंजिनिअर व्हायचं असं ठरवणार्‍या कुणाही मुलानं किंवा त्याच्या पालकांनी हा एक साधा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा!
त्याचं उत्तर अगदी साधं आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. पारंपरिक शिक्षणासाठी ज्या गोष्टी लागत नाही, त्या या शिक्षणासाठी लागतात. एक वेगळ्या पद्धतीची बुद्धिमत्ता लागते. आकलन क्षमता (ग्रास्पिंग पॉवर) उत्तमच असावी लागते आणि तिसरं म्हणजे तार्किक विचार क्षमता (लॉजिकल थिंकिंग) असायलाच पाहिजे आणि यासह गणितीय (मॅथॅमॅटिकल), संख्याशास्त्रीय (न्युमरिकल) क्षमताही उत्तम हव्यात!
हे सारं आपल्याकडे आहे का? या प्रश्नाचं उत्तर इंजिनिअरिंग करायचंच म्हणणार्‍या कुणीही सर्वप्रथम स्वत:ला द्यायला हवं!
एक साधं सिव्हिल इंजिनिअरिंगचं उदाहरण घ्या. ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं त्यांना किमान आपल्या अवतीभोवतीचं बदलतं जग तरी दिसायलाच हवं. ते दिसतंय का? आडवी वाढणारी शहरं, उंचच उंच वाढू लागली आहेत. आपल्याकडचे जागेचे प्रश्न गंभीर होत आहेत. अनेक वर्षे आपल्याकडे बैठी घरं होती, मग त्यावर एक मजला चढला. थोडं शहरीकरण झालं तशा तीन मजली इमारती उभ्या राहू लागल्या आणि आता तर मोठय़ा होत जाणार्‍या शहरातही आठ-बारा मजली उभ्या राहू लागल्या. देशातला पहिला दुमजली फ्लायओव्हर पुण्याजवळ नाशिक फाट्याला उभा राहिला. म्हणजेच काय तर लोकांना निवासासाठी घरं, चालायला आणि वाहनांना रस्ते कमी पडत आहेत. बहुमजली उंचच उंच इमारती, बहुमजली फ्लायओव्हर्स आता परदेशासारखे आपल्याकडेही उभे राहू लागलेत. गृहनिर्माण आणि वाहतूक या दोन क्षेत्रातली बांधकामं आता बदलत आहेत. कुठल्याही मोठय़ा ( हायराइज) इमारतींचं बांधकाम  छोट्या इमारती  (लोराइज)आणि घरांपेक्षा वेगळंच असतं. एक दोन मजली घरं बांधण्याचा एक ठराविक प्रकार होता, जो तुलनेनं सोपं होतं. ते बांधताना गावठी, पारंपरिक साच्यातलं विनातंत्रज्ञान काम चालत असे.  दोन-बाराचे, तीन-सोळाचे बार टाक रे असं म्हणत काम धकवून नेण्याचाच दृष्टिकोन होता. त्यातून जे काही बरंवाईट बांधकाम व्हायचं ते भूकंपासारख्या आपत्तीत अनेकदा कोसळायचं. पूल पडणं तर आपल्याकडे काही नवीन नाही.
आता मात्र बारा-सोळा मजली इमारती उभ्या राहणार असतील तर तिथे बांधकामाचे चोख आराखडे, हार्डकोअर डिझाइन्स लागतील. गगनचूंबी इमारती, बहुमजली उड्डाणपूल सामान्य ज्ञानाच्या आधारे बांधता येऊ शकत नाहीत. त्याची गणितीय रचना, त्यातले बारकावे हे सारंच वेगळं असेल.
आणि म्हणून इथून पुढचं इंजिनिअरिंग वेगळं असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग करणार्‍या कुणाही इंजिनिअर पुढची आव्हानं वेगळी असतील. गणित, तार्किक विचार आणि सॉफ्टवेअर अँप्लिकेशन या तिन्हींचा उत्तम मेळ घालावा लागेल आणि हे झालं सिव्हिल इंजिनिअरिंगचं उदाहरण, सर्वच इंजिनिअरिंग प्रकारात आता असे बदल वेगानं होत आहेत.
आता सांगा, बारावीला ४0 टक्के मार्क मिळवणारा आणि जेईई फार अवघड आहे, असं म्हणणारा मुलगा या सार्‍या कसोट्यांवर खरा उतरेल का? एक साधं उदाहरण सांगतो. अलिकडेच मी दोन मुलांना एका कॅनॉलचं डिझाइन करायला सांगितलं. एक जेईईवाला, दुसरा जनरल सीईटीवाला. दोघांना सांगितलं की, हातानं तर डिझाइन तयार कराच; पण कॉम्प्युटरवर करा. कॉम्प्युटरवर जे सॉफ्टवेअर असतात त्यांना योग्य आणि तार्किक माहिती दिली, तर ते उत्तम डिझाइन्स तयार करून देतात; मात्र माहिती काय द्यायची हा विवेक आणि तारतम्य तर असायला हवं.
सीईटी देऊन इंजिनिअर व्हायला निघालेल्या त्या तरुणानं डिझाइन आणलं त्यात त्यानं डिझाइन केलेला कॅनॉल ४ किलोमीटर खोलीचा होता. ४ किलोमीटर खोलीचा कॅनॉल ही गोष्ट तर्काला तरी पटते का, याचा विचारही त्यानं केला नाही! अशी जर परिस्थिती असेल, तर इंजिनिअर झाल्यावर ही मुलं काय प्रकारचे डिझाइन्स बनवतील? आणि कुठल्या आपत्तींना आमंत्रण देतील?
आपल्या देशात पायाभूत सुविधांमध्ये मोठं काम होणं अपेक्षित आहे. वाहतूक, कारखाने, पाणीपुरवठा, रस्ते या सार्‍यात बांधकामाच्या रचना बदलत आहेत. पण, त्यानुसार काम करता येईल अशी माणसंच नाही. मुंबईतल्या पुरानंतर मीठी नदीचं फ्लड मॉडेलिंग करायचं ठरलं, तर कुणाला ते करता येईना कारण नकाशेच उपलब्ध नाहीत. तसा कधीकुणी विचारच केला नाही. 
असं विचाराच्या कक्षेतच नसलेलं आणखी एक क्षेत्र म्हणजे आउटसोर्स होऊन इंजिनिअर्सकडे येणारं विदेशी काम. त्या देशात जायची गरज नाही, त्यांना आवश्यक इमारती, रस्ते, उड्डाणपुलं सगळं भारतात बसून डिझाइन करून द्यायचं, कारण त्या लोकांना भारतीय मनुष्यबळ तुलनेनं स्वस्तात उपलब्ध असतं. मात्र, या कामाचा दर्जा उत्तम राखायचा तर इंजिनिअरिंग पक्कं पाहिजे. उत्तम गुणवत्ता, ज्ञान आणि क्षमता पाहिजे आणि त्यासाठी इंजिनिअरिंग म्हणजे काय हे तर समजलं पाहिजे?
मात्र, ‘आडातच नाही ते पोहर्‍यात कुठून येणार’ अशी अवस्था असेल, तर ही नव्या जगातली कामं तरी कशी मिळावीत? हातात म्हणायला डिग्री आहे. पण,  इंजिनिअरिंग येत नाही अशी गत आजच अनेक इंजिनिअरची आहेच.
गणित, तार्किक क्षमता, आकलन क्षमता, विशिष्ट बुद्धिमत्ता असं काहीही नसताना मग केवळ प्रवेश परीक्षा सोप्या करून घेत मिळेल त्या कॉलेजात प्रवेश घेणं म्हणजे विद्यार्थी स्वत:चंच नुकसान करून घेत आहेत. हे प्रवेश परीक्षा सोपं करणं म्हणजे स्वत:लाच एक पायरी खाली उतरवून घेणं आहे. डॉक्टरनं कम्पाउण्डरचं काम करावंच तसंच! जेमतेम इंजिनिअर झालेला मग केवळ सुपरव्हायझरचं काम करतो, सुपरव्हायझर बिगार्‍याचं काम करतो. म्हणायला डिग्री पण, कौशल्य आणि क्षमताच नसल्यानं इंजिनिअर झालेले एकतर उद्धट होतात नाहीतर सरळ कार्यक्षेत्राच्या बाहेर फेकले जातात आणि हे बाहेर फेकलं जाणं या मुलांसाठी अत्यंत निराशादायक असतं. 
त्यामुळे मुलांनी आणि पालकांनी हा भ्रम डोक्यातून काढून टाकावा की, आपल्या भल्यासाठी शासन जेईई रद्द करत, सोप्या सीईटीचा पर्याय आणत आहेत. हे मान्यच आहे की, जेईईमुळे क्लासचालकांचं उखळ पांढरं होत होतं, पालकांची लाखावारी लुबाडणूक होत होती; पण याचा अर्थ सोपी सीईटी झाल्यानं उत्तम इंजिनिअर होता येईल असा नाही. सर्दी झाली तर कुणी नाक कापत नसतं! गावोगाव-शहरोशहरी उघडलेल्या आणि ओस पडू लागलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची दुकानदारी चालावी म्हणून प्रवेश परीक्षा सोप्या होतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा कॉलेजात प्रवेश घेतलाच तर ते कॉलेज तुम्हाला इंजिनिअर करेल, पदवी प्रमाणपत्रंही देईल, पण त्यातून ज्ञान आणि कौशल्य मिळणार नाही!
हे सारं लक्षात घेऊन मग ठरवावं की, आपल्याला इंजिनिअर का व्हायचंय? इंजिनिअर होण्याची आणि व्यावसायिक स्पर्धेत गुणवत्तेनं काम करण्याची क्षमता माझ्यात आहे का?
आणि ती नसेल तर, लाखो रुपये आणि मौल्यवान वर्षे खचरून तुम्ही काय मिळवाल? सोपी सीईटी मग काय कामाची?

0 comments:

Post a Comment