Monday 16 March 2015

स्थापत्य कलेची अद्‌भुत कृती : ओरेसुंड पूल

स्थापत्य कलेची अद्‌भुत कृती : ओरेसुंड पूल
- अनिरुद्ध पावसकर

स्वीडन व डेन्मार्क या देशांना जोडणारा आठ किलोमीटर लांबीचा पूल हा स्थापत्यशास्त्रातील एक अद्‌भुत नमुना. नागरिकांना नुकताच खुला करण्यात आलेल्या या पुलाचा एक व्हिडिओ व्हॉट्‌सऍपवर सगळीकडे फिरतो आहे. सगळ्यांना अचंबित करतो आहे. सदरचा पूल एक अचाट रचना आहे यात वादच नाही; परंतु तो नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे ही बाब तितकीशी बरोबर नाही. काही वर्षांपूर्वी स्वीडनला अभ्यास दौऱ्यावर गेलो असताना मला व माझ्या इतर सहकाऱ्यांना येथून प्रवास करायची संधी मिळाली व तंत्रज्ञानामुळे किती अजब बाबी साध्य होऊ शकतात, हे बघून आम्ही सर्वजण अत्यंत प्रभावित झालो होतो.

ओरेसुंड समुद्रधुनी पार करून स्वीडन देशाच्या दक्षिणेस असणाऱ्या स्कॅनिया व डेन्मार्कदरम्यान असणाऱ्या या डबल ट्रॅक रेल्वे व हायवे पुलाला ओरेसुंड पूल असेच नाव देण्यात आले आहे. एकूण आठ किलोमीटर लांबीपैकी समुद्रधुनी पार करताना चार किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे, ज्याला पेबेरहोल्म असे संबोधण्यात येते. असे असले तरी बोगद्यासहित संपूर्ण आठ किलोमीटर लांबीला ओरेसुंड पूल असेच संबोधण्यात येते. युरोप खंडामध्ये सर्वांत अधिक लांबीचा एकत्रित रस्ता व रेल्वेचा पूल अशी ओळख असलेला हा पूल स्वीडनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर माल्मो व डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन यांना जोडतो. इंटरनेटद्वारे सर्व माहितीचे प्रसारण फिनलॅंड या देशाला करण्याच्या दृष्टीने डेटा केबल पुरविण्याचे कामदेखील हा पूल करतो. या पुलाचे एकूण वजन अंदाजे 82,000 टन इतके अफाट असून, पुलाच्या संपूर्ण लांबीसाठी एक गर्डर टाकण्यात आलेला आहे. दर 140 मीटरवर या गर्डरला कॉंक्रिट पिलर्सचा आधार देण्यात आला आहे. हा तीन केबल-स्टेड पूल असून, केबल-स्टेचा मुख्य स्पॅन 491 मीटर लांबीचा आहे, तर सपोर्टिंग टॉवर 204 मीटर उंचीचे आहेत. चार लेनच्या रस्त्यांच्या खाली दोन रेल्वे ट्रॅक उपलब्ध करण्याची किमया साध्य करण्यात आली आहे. अंदाजे चार किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी 3.5 किलोमीटरचा बोगदा हा "ट्यूब टनेल‘ समुद्राच्या खालून आहे व बोगद्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 270 मीटर लांबीचे प्रवेश बोगदे आहेत. हा ट्यूब टनेल 20 प्री-फॅब्रिकेटेड आरसीसी भागांपासून साध्य करण्यात आलेला आहे. प्रत्येक भागाचे वजन तब्बल 55,000 टन आहे. बोगद्यामधून दोन ट्यूब्स रेल्वे ट्रॅक दोन रस्त्यांसाठी, तर एक आपत्कालीन परिस्थितीकरिता पुरविण्यात आलेले आहेत.
रेल्वेकरिता स्टॅंडर्ड गेज वापरण्यात आलेले असून, 200 किलोमीटरच्या वेगाने रेल्वे धावू शकतात. डेन्मार्क व स्वीडन या देशांमधील रेल्वे पद्धतीमध्ये इलेक्‍ट्रिफिकेशन व सिग्नल प्रणाली भिन्न असण्याचे एक आव्हान होते. पुलाच्या लांबीपर्यंत स्वीडिश प्रणाली अंतर्भूत करण्यात आली असून, पेबेरहोल्म व संपूर्ण बोगद्यासाठी डेन्मार्कची प्रणाली वापरण्यात आली आहे.

स्वीडनची रेल्वे डावीकडून, तर डेन्मार्कची रेल्वे उजवीकडून धावते. दर वीस मिनिटांनी एक ट्रेन दिवसा धावते, तर रात्री दर तासाला एक. या संपूर्ण पुलावर प्रवास करण्यासाठी 400 स्वीडिश क्रोनर म्हणजे अंदाजे 46 युरो इतका महागडा टोल भरायला लागतो.

स्वीडन व डेन्मार्क यांना जोडणारा पूल बांधण्याची संकल्पना सर्वप्रथम 1936 मध्ये पुढे आली; परंतु त्याचे प्रत्यक्ष बांधकाम 1995 मध्ये सुरू करण्यात आले. या पुलाची रचना (डिझाईन) कोवी या डेन्मार्कच्या अभियांत्रिकी संस्थेने केलेली असून, हॉकटिफ, स्कान्स्का, होगार्ड व शुल्टझ आणि मॉनबर्ग व थॉरसन या त्रयींनी काम जॉइंट व्हेंचरच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 1999 मध्ये पूर्ण केले. त्याच दिवशी डेन्मार्कचा राजपुत्र फ्रेडरिक व स्वीडनची राजकन्या व्हिक्‍टोरिया यांनी पूल व बोगद्याच्या मध्याला भेटून त्याचे उद्‌घाटन केले, तर तारीख 1 जुलै 2000 रोजी राणी मार्गारेट व राजे गुस्ताफ यांनी हा पूल नागरिकांच्या वापरासाठी खुला केला.

गंमत म्हणजे पुलाचे बांधकाम करतेवेळी समुद्रतळाशी दुसऱ्या महायुद्धामधील न फुटलेले 16 बॉंब आढळून आले. त्यामुळे एकच धांदल उडाली. कामात काही दिवसांचा व्यत्यय आला. काम पुन्हा सुरू झाल्यावर काही महिन्यांनी असे निदर्शनास आले, की पुलाची उभारणी तिरक्‍या रेषेत होत आहे. त्यामुळे पुन्हा कामात खंड पडला. विचारविनिमय करण्यात आला. शेवटी काम सध्याच्याच रेषेत पुढे चालू ठेवायचे ठरले. त्यामुळे पुलाची अलाइनमेंट सुरवातीला निश्‍चित केल्यापेक्षा थोडी तिरकी आहे. परंतु दोनदा कामामध्ये खंड पडूनसुद्धा मूळ मुदतीपेक्षा काम तब्बल तीन महिने आधी पूर्ण झाले. पर्यटकांना प्रवास करताना अत्यंत सुखद अनुभव देणारा हा ओरेसुंड पूल स्थापत्य अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला भाग पाडणारा आहे. दोन देशांमधील मैत्रीचे प्रतीक असणारा हा पूल युरोपमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्व भारतीयांनी अवश्‍य डोळे भरून पाहावा व अनुभवावा असा आहे एवढे मात्र निश्‍चित.

(लेखक: कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका)

0 comments:

Post a Comment