|
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी 'जेईई-मेन'मध्ये मिळालेल्या गुणांच्या पर्सेंटाइलला ५० टक्के आणि बारावीत 'पीसीएम'मध्ये मिळालेल्या गुणांच्या पर्सेंटाइलला ५० टक्के वेटेज असणार आहे. या दोन्ही परीक्षांतील प्राप्त पर्सेंटाइलनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. इंजिनीअरिंग कॉलेजांतील राज्य स्तरावरील जागांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एचएससी) विद्यार्थ्यांच्या जोडीने 'सीबीएसई' आणि 'आयसीएसई' बोर्डाचे विद्यार्थीही प्रवेशास इच्छुक असतात. आता प्रवेशासाठी 'जेईई-मेन'च्या गुणांच्या जोडीने बोर्डाच्या गुणांनाही ५० टक्के वेटेज असल्याने वेगवेगळ्या बोर्डांतील विद्यार्थ्यांच्या गुणांचे समानीकरण करणे गरजेचे होते. त्यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) कोलकाताच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सहकार्य घेतले.
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने सुचवलेल्या सूत्रानुसार, कम्पोझिट पर्सेंटाइल स्कोअरवर गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. 'जेईई-मेन'च्या गुणांचे पर्सेंटाइल आणि बारावीच्या 'पीसीएम'च्या गुणांचे पर्सेंटाइल काढून दोन्ही परीक्षांतील प्राप्त पर्सेंटाइलनुसार गुणवत्ता यादी तयार होणार आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१२ मध्ये काढलेल्या शासन निर्णयात 'जेईई-मेन'च्या गुणांना ५० टक्के आणि बारावीच्या 'पीसीएम'मधील गुणांना ५० टक्के वेटेज असे नमूद करण्यात आले होते. आता गुणांऐवजी पर्सेंटाइलचा विचार केला जाणार आहे. पर्सेंटाइल काढताना विविध बोर्डांतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांना बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विचारात घेऊन ८ डेसिमलपर्यंत पर्सेंटाइल काढण्यात येणार आहेत. हा शासन निर्णय www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
कसा असेल फॉर्म्युला?
'जेईई-मेन'च्या गुणांचे पर्सेंटाइल खालीलप्रमाणे काढता येईल.
जेईई पर्सेंटाइल (पी०) = विद्यार्थ्याचा जो 'जेईई-मेन'चा स्कोअर असेल, त्या स्कोअरपेक्षा कमी स्कोअर असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या/जेईई-मेनला बसलेले एकूण विद्यार्थी x १००
बोर्ड पर्सेंटाइल (पी) = विद्यार्थ्याचे 'पीसीएम'चे जे गुण असतील, त्यापेक्षा कमी गुण मिळवलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या/'पीसीएम'ला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या x १००
एकत्रित पर्सेंटाइल स्कोअर = (जेईई पर्सेंटाइल + बोर्ड पर्सेंटाइल)/२
'डीटीई'ने याबाबत दिलेले एक काल्पनिक उदाहरण पुढीलप्रमाणे,
एखाद्या विद्यार्थ्याला 'जेईई-मेन'मध्ये ५० गुण आहेत, तर त्याचे जेईई पर्सेंटाइल पुढीलप्रमाणे असेल.
जेईई-मेनला बसलेले एकूण विद्यार्थी = १२,७८,५८०
जेईई-मेनमध्ये ५० गुणांपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी = ८,२१,००७
जेईई पर्सेंटाइल = (८,२१,००७/१२,७८,५८०)x१०० = ६४.२१२४०७५१
याच विद्यार्थ्याला पीसीएममध्ये २८२ गुण असतील, तर त्याचे बोर्ड पर्सेंटाइल पुढीलप्रमाणे असेल.
पीसीएममध्ये २८२ गुणांपेक्षा कमी गुण मिळवलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या = ३,२२,९६९
'पीसीएम'ला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या = ३,२३,२२७
बोर्ड पर्सेंटाइल = (३,२२,९६९/३,२३,२२७)x१०० = ९९.९२०१७९९४
म्हणजेच या विद्यार्थ्याचा कम्पोझिट स्कोअर पुढीलप्रमाणे असेल,
(६४.२१२४०७५१ + ९९.९२०१७९९४)/२ = ८२.०६६२९३७३
(विद्यार्थ्याच्या हाच स्कोअर गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरला जाईल.)
राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फायदा?
पर्सेंटाइल विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याने राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 'राज्य बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर बोर्डांच्या तुलनेत मोठी आहे. त्यामुळे 'पीसीएम'मध्ये साधारण ७५ टक्क्यांच्या वर गुण मिळविणाऱ्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल इतर बोर्डांच्या तुलनेत चांगले येईल, असा अंदाज आहे,' असे एका शिक्षकाने सांगितले.
0 comments:
Post a Comment