|
कोणत्याही गोष्टीसाठी 'नाही' हा शब्द बव्हंशी तरुणांना ऐकायलाच लागत नाही. उंची कपडे, अत्याधुनिक मोबाइल फोन्स, महागड्या गाड्या याचं अप्रूप तरुणाईला राहिलेलं नाही, असं सर्वसाधारण चित्र आहे. दिवसेंदिवस एका विशिष्ट 'लाईफ स्टाइल'ला फॉलो करण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसतो.
तुम्हाला आठवत असेल ना? माझ्या अगदी सुरुवातीच्या लेखात मी तुम्हाला या मेट्रोचं रात्री दिसणार रूप सांगितलं होतं. माझ्या घराच्या टेरेसमधून दिसणारी ती दिव्यांची आरास म्हणजे जमिनीवर चांदण्या पसरून ठेवल्यासारखं वाटतं; पण म्हणतात ना, 'दिव्याखाली अंधार'; तसंच काहीतरी वाटलं, गेल्या आठवड्यात वृत्तपत्र वाचताना. शहरातल्या कोण्या एका ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अनेक तरुण-तरुणींना पहाटे पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलं. इतक्यातल्या इतक्यात अशा अनेक घटना मन पटकन उद्विग्न करून गेल्या.
सरधोपटपणे अशा घटनांत सर्वच तरुण-तरुणी दोषी ठरवण्याची ना इच्छा ना तसा हेतू; पण मुलांशी संवाद साधायची वेळ आली आहे, हे नक्की.
अभ्यासकौशल्यांबरोबरच 'Life Skills' शिकण्यात, शिकवण्यात आपण कुठंतरी कमी तर पडत नाही ना, हा प्रश्न महत्त्वाचा. काहीतरी बनण्यासाठी इथं आलेल्या मुलांची स्वप्नं फक्त त्यांचीच नसतात. जवळजवळ सगळेच आई-वडील आपली अर्धवट स्वप्नं आपल्या मुलांमार्फत पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात. आपल्याला जे जे नाही मिळालं, ते सर्व आपल्या मुलांना मिळावं म्हणून जीवाचं रान करतात.
कोणत्याही गोष्टीसाठी 'नाही' हा शब्द बव्हंशी तरुणांना ऐकायलाच लागत नाही. उंची कपडे, अत्याधुनिक मोबाइल फोन्स, महागड्या गाड्या याचं अप्रूप तरुणाईला राहिलेलं नाही, असं सर्वसाधारण चित्र आहे. दिवसेंदिवस एका विशिष्ट 'लाईफ स्टाइल'ला फॉलो करण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसतो.
आता याचीच एक दुसरी बाजू पाहू. ही लाइफ स्टाइल अनुसरण्याची अपरिहार्यता तरुणांमध्ये वाढण्याचं कारण 'पीअर प्रेशर' होय. समवयस्क गटाचा दबाव प्रत्येकानंच अनुभवला असेल; परंतु, दिवसेंदिवस हा दबाव वाढतो आहे, हे नक्की.
ज्या ठिकाणी आपण शिकतो, राहतो, वावरतो तिथं 'फिट' बसण्याचा प्रयत्न करणं कदाचित स्वाभाविक आहे; पण त्यासाठी चांगलं काय आहे, तेच फक्त घ्यायचं आणि इतर ते नाकारायचं, हे करणं जमायला हवं.
'नाइट लाइफ' हा मेट्रोच्या 'लाइफ स्टाइल'चा कथित अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तुम्ही जर रोज रात्री घरात बसून आपल्या भावा-बहिणीबरोबर गप्पा मारत असाल, एखादं छान पुस्तक वाचत असाल किंवा टीव्ही पाहात असाल, तर तुम्ही अजिबात 'हॅपनिंग' नाही, असा गैरसमज तरुणांमध्ये निर्माण व्हायला वेळ लागत नाही. 'हॅपनिंग' किंवा 'कूल' बनण्यासाठी मग अनेक मुलं-मुली या अशा नाइट लाइफमध्ये रमायला लागतात. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर छान वेळ घालवायला हरकत नाही; पण तो कुठं आणि किती, हे मात्र नीट समजलं पाहिजे. मेट्रो जशा संधी देतं, तशी प्रलोभनंही दाखवतं; पण ही प्रलोभनं टाळून जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर जाता, तेव्हा या शहराचीही मान उंचावते.
कुठंही जाताना म्हणूनच त्या ठिकाणांबद्दल थोडी माहिती करून घ्यायला हवी. स्वतःला नवीन युगाचे म्हणवणाऱ्यांनी अधिकाअधिक सतर्क आणि जागरूक असायला हवं.
एका परदेशी व्यक्तीला घेऊन जेव्हा मी 'अॅडव्हेंचर स्पोर्टस'साठी गेलो होतो, तेव्हा तिथं त्यानं पहिली गोष्ट केली, ती म्हणजे तिथले खेळ सुरक्षित आणि प्रमाणित असल्याचा परवाना पडताळून पाहिला. आपणही अशी सतर्कता दाखवू शकतो.
आपल्याला अपघात होऊ नये म्हणून आपण खूप काळजी घेतो. वेगावर नियंत्रण ठेवतो, हेल्मेट घालतो; पण एखादी विचित्र घटना मनावर खोलवर जखम करू शकते, म्हणूनच कोणत्याही अनुचित गोष्टी होऊ नयेत, याचीही काळजी घ्यायलाच हवी. शरीरापेक्षा मनावर होणारे घाव खोलवर आणि दूरगामी परिणाम करतात.
समवयस्कांचा दबाव, व्यसनं या सगळ्यावर उपाय आहेत. आपली वाट चुकलीच, तर आपल्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करायला आपले आई-वडील, मित्र-मैत्रिणी आहेतच आणि काही सांगायचं, बोलायचं असेल, तर कौन्सेलरही आहेत. परतीच्या या सुंदर वाटेवर तुमचं स्वागत करायला हात पसरून उभं आहे, हे मॅजिकल मेट्रो!
(लेखक कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
0 comments:
Post a Comment