कुणी शिक्षा देता का शिक्षा...? (उत्तम कांबळे)
| |
- उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
|
खूप खूप वर्षांपूर्वी बीए फायनल पास झालेला एक विद्यार्थी मला भेटला होता. त्याचा निकाल लागला होता. त्याला ज्या विषयात आपण नापास होऊ, असं वाटत होतं, त्याच विषयात त्याला सगळ्यात अधिक मार्क मिळाले होते. इंग्लिशच्या पेपरात फक्त इंग्लिश लिपी वापरून त्यानं काय वाटेल ते लिहिलं होतं...स्वाभाविकच निकाल काय लागणार, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नव्हती... पण तो पास झाला... हे असं का घडलं असंल, कुणी घडवलं असंल, याविषयी शेवटपर्यंत पत्ता लागलेला नव्हता...
विषय डोक्यातून गेलेला नव्हता...एकसारखा विचार सुरू होता... कुणी काही काही तर्क लढवत होते. तर्क ः १) ज्या विषयाला विद्यार्थी खूप कमी होत आहेत आणि जे विभागच बंद होणार आहेत, अशा विषयांच्या विद्यार्थ्यांना सहसा नापास केलं जात नाही आणि नापास केलं, तरी पुढं विद्यार्थी मिळत नाहीत. २) मृत्युपंथाला लागलेले विषय शिकवणारे शिक्षकच विद्यार्थी शोधून काढतात. प्रवेश घेण्यापूर्वीच त्यांना पास करण्याची हमी देतात.
३) एखाद्या विषयात विद्यार्थी नापास झाला, तर त्याला वाममार्गानं पास करण्याची एक गुप्त व्यवस्था आहे. अशी प्रकरणं अनेकदा वेगवेगळ्या विद्यापीठांत उघडकीस येत असतात. त्यांचं पुढं काय होतं, हे विद्यापीठालाच ठाऊक...
खरंतर बीए फायनलवाल्याचं ते प्रकरण शेवटचं ठरावं, असं मला वाटत होतं; पण घडलं मात्र तसं नाही. या महिन्याच्या नऊ तारखेला अशाच एका तरुणाचा ई-मेल आला. हा तरुण एका मोठ्या म्हणजे खूपच मोठ्या कंपनीत सध्या नोकरीला आहे. खूप मोठा पगार, खूप मोठी प्रतिष्ठा आहे; पण यातलं काहीच तो एन्जॉय करू शकत नाही. कारण भूतकाळातली एक घटना त्याला रोज क्षणाक्षणाला कुरतडत राहते. डंख मारत राहते. रक्ताच्या चिळकांड्या उडतील एवढ्या जखमा करते. भूतकाळ उलटतो तेव्हा खूपच कठीण असतं. एक तर तो आंधळा असतो आणि कुठं कसा उलटतो, कुठं जखमा करतो, हे कळतच नाही. भूतकाळ हातात हात घालून चालतो, तोपर्यंत सारं काही ठीक असतं.
...तर त्याचं असं झालंय : हा तरुण ग्रामीण भागातल्या एका गरीब कुटुंबातून पुढं आलेला. अभियंता होण्याचं स्वप्न त्याच्या मनात पेरलेलं. हे स्वप्न घेऊनच मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला. सारं काही ठीक चाललं होतं... पहिल्या वर्षाची परीक्षा झाली; पण याचा गणित हा विषय राहिला...म्हणजे त्यात तो नापास झाला. तो सुटल्याशिवाय त्याला वरच्या वर्गात प्रवेश मिळणार नव्हता. तसं घडलं असतं, तर तो त्याच्या स्वप्नासह कोलमडणार होता. एक भ्रष्ट यंत्रणा त्यानं हाताशी धरली. यंत्रणेचे हात पैसे ठेवून ओले केले आणि हा पुढं पास झाला. पदवीधर झाला. त्याला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये चांगली नोकरी मिळाली. भौतिकदृष्ट्या सारं काही चांगलं घडलं होतं; पण पैसे देऊन विषय सोडवून घेतल्याचं कृत्य त्याला धडका मारू लागलं. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास अस्वस्थता आणि अपराधीपणाची भावना घेऊन जन्माला येऊ लागला. मार्ग काय? गुन्ह्याचा कबुलीजबाब आणि त्यामुळं होणारी शिक्षा भोगणं हाच एक मार्ग होता, त्यानं तो स्वीकारायचं ठरवलं.
मग हा तरुण... आपण आता सोयीसाठी त्याला राजू म्हणू. तर हा राजू विद्यापीठाच्या परीक्षा विभागात थडकला. अधिकाऱ्यांसमोर त्यानं आपला गुन्हा कबूल केला. ‘मला शिक्षा द्या... गणिताचा पेपर नव्यानं लिहिण्याची संधी द्या. नव्यानं पदवीपत्र द्या,’ असं म्हणाला. अधिकाऱ्यांनी त्याला वेड्यात काढलं. ‘तू म्हणतोस तसं काही आमच्या विद्यापीठात घडलेलं नाही. घडत नाही. तूच तुझं डोकं तपासून घे,’ असं सांगून त्यांनी त्याला परत पाठवलं. पण राजू जिद्दीचा होता. तो कुलगुरूंना भेटला. त्यांनी शांतपणे ऐकलं. अधिकाऱ्यांप्रमाणेच उत्तर दिलं. शिवाय, ‘तू काही आता आमचा विद्यार्थी नाहीस,’ असंही सांगितलं. राजू मागं फिरला.
राजूच्या लक्षात एक येत नव्हतं, की विद्यापीठानं हे मान्य करणं म्हणजे आपणच स्वतःहून गुन्हा केल्याचं मान्य करण्यासारखं होतं. आम्ही भ्रष्ट आहोत, गुन्हेगार आहोत, असं कुणी मान्य करणार नाही आणि तुरुंगात जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, आपला गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडं दुसरा पुरावाच नाही...
राजू पुनःपुन्हा ओरडून सांगत होता ः ‘मी गुन्हा केलाय...’ मात्र, विद्यापीठ ते मान्य करणं शक्य नव्हतं. या प्रकरणात दोन गुन्हेगार ठरणार होते. पहिलं विद्यापीठ आणि दुसरा राजू...कारकुनापासून कुलगुरूंपर्यंत अनेकांकडं संशयाची सुई गेली असती. कोणती शहाणी संस्था हे मान्य करणार आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार? राजूची पिंजऱ्यात उभं राहण्याची तयारी आहे; पण त्याला ही संधी विद्यापीठानं गुन्हा मान्य केल्यावरच मिळणार आहे. मात्र, तसं घडण्याची शक्यता नाही. एक भली मोठी, खालपासून वरपर्यंतची व्यवस्था गुन्हा मान्य करण्याची शक्यताच नाही. राजूला हे कोण सांगणार?
राजूनं गुन्हा केला आणि त्यानं तो लेखी, तोंडी मान्य केलाच आहे. राहिला प्रश्न शिक्षेचा. असं नाही, की प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा असतेच. काही वेळा गुन्हेगाराला सुधारण्याची संधीही दिली जाते. काही वेळेला काही गुन्ह्यांत कोर्ट उठेपर्यंत शिक्षा असते. काही वेळेला ताकीद देऊन सुटका केली जाते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पश्चात्ताप करून घेणं ही सर्वांत मोठी शिक्षा असते... राजूनं गुन्हा केला आहे, हे मान्य करायला व्यवस्था तयार नाही. खरी गोची इथंच आहे.
राजू अस्वस्थ होऊन बऱ्याच लोकांशी बोलतोय. तेव्हा त्याला शहाणं म्हणणारं कुणी भेटत नाहीत. या अस्वस्थतेपोटी त्यानं पहिल्या दोन नोकऱ्या सोडल्या आहेत. आपण कुणाची तरी नोकरी हिरावतोय, अशी त्याची भावना होतेय. तिसरी नोकरीही सोडून त्याला कृषीवर आधारित काही व्यवसाय सुरू करायचा आहे. आई-वडिलांना सुखी ठेवायचं आहे. कुटुंबातल्या सर्वांना आधार द्यायचा आहे; पण हे तेव्हाच शक्य होणार आहे, जेव्हा त्याची ही मानसिक कोंडी संपेल. राजूला झोप लागत नाही. स्वास्थ्य मिळत नाही. त्याचा स्वभाव चिडचिडा होतोय. स्वतःवरच सूड घेण्याची इच्छा होतेय. अकारणच त्याचे डोळे लालबुंद होतात आणि मग शेवटची अवस्था आत्महत्येच्या विचाराकडं नेऊ लागते. भल्या मोठ्या ई-मेलमध्ये त्यानं हे सारं लिहून काढलंय. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यानं कुलगुरूंचे प्रमुख असणाऱ्या कुलपतींना म्हणजे राज्यपालांनाच पत्र पाठवलं. राज्यपालांकडून पत्राची पोचही मिळालीय; पण राज्यपाल तरी काय करणार? ‘आम्ही असं कुणाला पासच करत नाही,’ असं विद्यापीठाचं म्हणणं. तर ‘होय, पास केलं जातं,’ असा राजूचा दावा. हा दावा सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडं शब्दांशिवाय दुसरं काहीच नाही आणि मोकळ्या शब्दांना न्यायव्यवस्थेत काही अर्थ असत नाही. शब्दांच्या मुठीत भरपूर पुरावा असावा लागतो. तो सिद्ध करावा लागतो. राजू यापैकी काहीही करू शकत नाही. सभ्यतेच्या जोरावर तो सारं काही करू पाहतोय... तुम्ही न्यायाच्या जगात जेव्हा पुराव्याशिवाय उभे राहता तेव्हा सभ्यता, शब्द दुबळे ठरतात. अपंग होतात. शब्दांच्या जोरावर कुणीही काहीही करू शकतो; पण म्हणून प्रत्येक शब्द काही पुरावा होऊ शकत नाही.
मानसोपचारतज्ज्ञांकडं जाण्याचा सल्ला राजूला बऱ्याच लोकांनी दिला. त्यानं तो मान्य केला. ‘जे काही घडलं ते विसरून जा’, असंच सारे जण सांगतात. डॉक्टर झोप येण्याच्या गोळ्या देतो; पण आता असं करायला तोही तयार नाहीय. गोळ्यांमुळं साइड इफेक्ट होईल, असं तो म्हणतोय. इतिहास विसरायचा कसा आणि स्वतःला शुद्ध कसं करायचं, कोणती परीक्षा द्यायची... आणि तिचे पेपर फुटणार नाहीत कशावरून?
मी राजूचा फोन नंबर मागून घेतला. त्यानं तो दिला; पण ‘सायंकाळी साडेसहानंतर फोन करा’, असं म्हणाला. न्यायक्षेत्रात जगभर एक तत्त्व मान्य केलं जातं. ‘अनजाने पापों के लिए भगवान क्षमा कर देता है।’, असं ते तत्त्व. पश्चात्ताप करून घेणं ही सर्वांत मोठी शिक्षा असते. राजूला पश्चात्ताप तर खूप झालाय....भ्रष्ट मार्गानं कुणी खालून वर जाणार नाही; आपल्यासारखं करण्याची अन्य कुणाला इच्छा होणार नाही, असं काहीतरी आता राजूनं करावं. या गोष्टीलाच यापुढं त्यानं पश्चात्ताप समजावं; शिक्षा समजावी. काही काही शिक्षा आणि काही काही पश्चात्तापही आनंददायी असतात. काही काही वेळेला ‘दाग अच्छे लगते है।’ असंही सांगितलं जातं. अर्थात, हे करण्यासाठी जिवंत राहावं लागेल.
असेच काही काही विचार मी करत होतो... त्याच्याशी बोलणार होतो... ठाऊक नाहीय, की मी जे सांगणार आहे, ते योग्य की अयोग्य...! ऊठसूठ सोशल ऑडिटर बनणारे काय म्हणतील...व्यवस्था काय म्हणेल आणि शेवटी तो काय म्हणेल..?
ता. क. ः राजूशी बोलणं झालं. ‘उच्च न्यायालयात जायचं,’ असं तो म्हणतोय. पश्चात्ताप वगैरे गोष्टी त्याला पटत नाहीत. ‘मला शिक्षा हवीच’, असं तो म्हणतोय. बोला आता!
0 comments:
Post a Comment