प्रासंगिक : फिरते ग्रंथालय नव्हे, 'ग्रंथयान'!
तेजल शृंगारपुरे - response.lokprabha@expressindia.comमराठी साहित्य म्हटलं की अनेक अभिजात साहित्यिकांची नावे तरुणांच्या डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक जण मराठी साहित्याचा वारसा सांगायला तत्पर असतो. पण हीच तरुणाई मराठी पुस्तक वाचताना मात्र फारशी दिसत नाही. काय कारण असावं?
आजकाल तरुण मंडळी मराठी पुस्तकं वाचत नाहीत की मराठी पुस्तकं तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत?
हा एक खरंतर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण फक्त चर्चा करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही बाजूने विचार केला तरी तरुणाईच्या हातात मराठी पुस्तक दिसत नाही हेच सत्य आहे.
तरुणाईला आणि एकंदरच मराठी वाङ्मयापासून लांब गेलेल्या समाजाला मराठी वाचनाची गोडी पुन्हा लागावी यासाठी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाने एक अभिनव योजना राबवली आहे. 'मराठी ग्रंथयान' या नावाने ग्रंथसंग्रहालयाने चक्क शहरभर फिरणारी लायब्ररी सुरू केली आहे. या लायब्ररीला 'यान' म्हणण्यामागे एक कारण आहे, असं ग्रंथसंग्रहालयाचे सचिव विद्याधर वालावलकर म्हणतात. यान हे आधुनिकतेचं प्रतीक आहे आणि तरुणाईला या नवीन तंत्रज्ञानाचे खूप आकर्षण आहे. म्हणूनच या फिरत्या लायब्ररीला 'ग्रंथयान' अशी उपमा दिली आहे. तरुणाईशी कनेक्ट होण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. हे ग्रंथयान सध्या आठवडय़ातील सहा दिवस दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाणे शहरातील जवळजवळ पंचवीस जागांवर प्रत्येकी एक ते दीड तास थांबतं. सहा महिन्यांपासून सुरू असल्याने या उपक्रमाने ग्रंथसंग्रहालयाला ७०० नवीन मेंबर्स मिळवून दिले आहेत. फोटोंमधून तुम्हाला कळलंच असेल हे ग्रंथयान म्हणजे चक्क एक बस आहे. आणि त्यात १००-२०० नाही तर आठ ते दहा हजार पुस्तकं ठेवलेली आहेत! ऐकून चकित झालात ना? आपल्या घराखालीसुद्धा अशीच लायब्ररी येऊन उभी राहिली तर किती बरं होईल असाच विचार करत असाल ना? वालावलकरांचेसुद्धा हेच स्वप्न आहे. ही लायब्ररी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी असाच प्रयत्न भविष्यात त्यांचा असणार आहे. वालावलकर म्हणतात, ''लोक आपल्याकडे येत नसतील तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. प्रत्येक ग्रंथसंग्रहालयाने ग्रंथयानसारखे उपक्रम राबवण्याची नितांत गरज आहे.''
पण हे ग्रंथयान चालवणे काही सोप्पी गोष्ट नाही. अनेक प्रयत्नांनंतर हे ग्रंथयान तयार झाले आहे. निधी गोळा करणं, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं आणि अशा बऱ्याच कामांची यादी वालावलकरांसमोर होती. साहित्य संमेलनाच्या निधीबद्दल विचारलं असता ते म्हणतात, ''तो निधी ग्रंथसंग्रहालयाच्या मेंटेनन्सवर खर्च होतो. जो निधी ग्रंथयानसाठी लागणार होता तो खूप मोठा होता.'' शिवाय क्लाऊड कॉम्प्युटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचासुद्धा ते वापर करत आहेत. पण लोकांना हे ग्रंथयान आवडले आहे. आणि म्हणूनच ग्रंथयान यशस्वी होणार याबद्दल वालावलकरांना खात्री वाटते.
ग्रंथयान शहरातील विविध वयोगटातील वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे. वालावलकर सांगतात, आमचा फोकस नक्कीच तरुणाईवर राहणार आहे, पण सध्या मध्यमवयीन आणि लहान मुलं हा वाचकगटसुद्धा वाढला आहे आणि वाचकगटाप्रमाणे आम्ही पुस्तकांमध्ये भर केली आहे. पुढच्या पिढीला वाचनाची आवड आतापासूनच लागली तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही.पण या ग्रंथयानाचे कार्य तेव्हा सफल होईल जेव्हा ते जास्तीतजास्त तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना मराठी वाङ्मयाकडे आणेल. तरुण पिढी मराठी साहित्यापासून लांब का गेलीय, असे विचारले असता, वालावलकर काही ठोस मुद्दे मांडतात, ''आजकाल तरुण पिढी इन्फर्मेशन (माहिती) देणारी पुस्तके अधिक वाचते. जगाबरोबर वेगाने पुढे जाण्यासाठी त्यांनी अपडेट राहणं महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांचा कल अशा पुस्तकांकडे असतो.'' वालावलकर सगळा दोष तरुणांना देत नाहीत. मराठी साहित्यात आज पूर्वीसारखे क्लासिक लेखक आहेत का, ज्यांचे साहित्य तरुणांना आवडेल, भुरळ घालेल? असा त्यांना प्रश्न पडतो.
फक्त लेखकच नाही, तर प्रकाशकसुद्धा तरुणाईचा विचार करताना फारसे दिसत नाहीत. इंग्रजी आणि मराठी साहित्याच्या प्रकाशनातला फरक वालावलकर समजावून सांगतात. इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशक हल्ली पुस्तक फक्त बाजारात आणत नाही तर तो ऑनलाइनसुद्धा प्रकाशित करतो. म्हणजे सतत ऑनलाइन असणाऱ्या तरुण पिढीला इंग्रजी पुस्तकं सहज उपलब्ध होतात. पण मराठी प्रकाशक मात्र तसे करताना दिसत नाहीत. जे काही कारण असेल, पण मराठी प्रकाशक पुस्तक ऑनलाइन सहजासहजी आणत नाहीत. इंग्रजी पुस्तकांप्रमाणे मराठी प्रकाशकांनी आणि लेखकांनी एकत्र येऊन त्यांची पुस्तकं ऑनलाइन उपलब्ध केली तर ते जास्तीतजास्त तरुणांपर्यंत पोहोचू शकतात.
ही झाली मोठय़ा प्रकाशकांची गोष्ट. पण छोटय़ा प्रकाशकांचं काय? महाराष्ट्रातल्या गावागावात असे अनेक छोटे प्रकाशक आहेत, ज्यांच्याकडे चांगले साहित्य असूनसुद्धा त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळत नाहीय. अशाच छोटय़ा प्रकाशकांसाठी ग्रंथसंग्रहालयाने अजून एक उपक्रम राबवला असून ग्रंथसंग्रहालयातील तळमजल्यावरील जागा छोटय़ा प्रकाशकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. १५०० रुपये भाडे भरून प्रकाशक आपली पुस्तकं तिथे मांडू शकतात. राज्यातील सगळ्या छोटय़ा प्रकाशकांना ग्रंथसंग्रहालयाने आवाहन केले आहे व हा उपक्रम एक एप्रिलपासून राबवण्यात येणार आहे. शिवाय या प्रकाशकांच्या पुस्तकांची विक्री होण्यास जमेल तितकी मदत ग्रंथसंग्रहालय करणार असल्याचे वालावलकर सांगतात.
मराठी ग्रंथसंग्रहालयाने तरुणांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग अवलंबत एक पाऊल पुढे टाकले आहे. आता ही आपली तरुण वर्गाची जबाबदारी आहे की आपण या प्रयत्नांची दाखल घ्यावी आणि मराठी साहित्य, मराठी वाङ्मय जाणून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी सज्ज व्हावे. तरुणांना मराठी साहित्याची ओढ राहिली नाही, ही अनेकांच्या मनातील प्रतिमा खोडून काढत आपणही एक पाऊल पुढे टाकू या, असा संकल्प या नवीन वर्षांत करायला काय हरकत आहे!
तेजल शृंगारपुरे
0 comments:
Post a Comment