Monday, 16 March 2015

बीईनंतरचा ‘गेट’वे


 
 

बीईनंतरचा ‘गेट’वे

 
 
डॉ. श्रीराम गीत

बीईनंतर नेमकं काय करावं, एमई करावं, की 'गेट' द्यावी? का सरळ नोकरीच धरावी, असे प्रश्न अनेक विद्यार्थी-पालकांच्या मनात असतात. बीईनंतर फक्त 'काहीतरी' शिकणं महत्त्वाचं नाही, तर 'नेमकेपणाने' शिकण्याला महत्त्व आहे.

इंजिनीअरिंग शिक्षणाचे तीन ठळक टप्पे गेल्या ४० वर्षांत दिसून येतात. पहिला टप्पा म्हणजे हा अभ्यासक्रम तीनवरून चार वर्षांचा केल्यापासून १९८५ पर्यंतचा. नंतरचा सन २००५ पर्यंतचा खासगी कॉलेजांच्या संतुलित विस्ताराचा आणि शेवटचा म्हणजे गेल्या दहा वर्षांतील आयटी क्षेत्राच्या वाढीमुळे व अवास्तव वाढवलेल्या जागांमुळे निर्माण झालेला. या जागांवर प्रवेश घेऊन पास होणाऱ्या अनेकांपुढे नोकरीच्या अवास्तव कल्पनांमुळे विचित्र प्रश्न उभे राहत आहेत. त्याबद्दलचं वास्तव येथे सविस्तर मांडावेसे वाटते.

पहिल्या टप्प्यात आपल्या शाखेतील नोकरी, त्यात प्रशिक्षण, प्रगती हा स्वाभाविक मार्ग होता; तसेच परदेशी मास्टर्स करणे हे पालकांच्या सहज आवाक्यात नव्हते. वेगळ्या तुलनेत सांगायचे, तर मुला/मुलीच्या एमएससाठीच्या खर्चात त्या काळात २ बीएचकेचा फ्लॅट सहज येत होता. आयटी हा शब्दच नव्हता. सर्वांनाच काय; पण मोठ्या आस्थापनांतसुद्धा मॅनेजमेंट केलेले एमबीए सरसकट गरजेचे वाटत नव्हते. तो कोर्सही मोजक्याच ठिकाणी होता.

दुसऱ्या टप्प्यात खासगी कॉलेजं वाढली. त‌थिे मिळणारे शिक्षण पुरेसे होते. त्यांचा खर्च पालकांच्या चांगल्या उत्पन्नालासुद्धा सहज परवडणारा नव्हता. वर्षाची सरसकट फी दहा हजार ते चाळीस हजार रुपयांदरम्यान वाढत गेली; पण कोअर इंजिनीअरिंगमधे नोकऱ्या होत्या. आयटीमध्ये वेगाने वाढ होऊन परदेशगमन परवडू लागले होते. इंजिनीअर बनून एमबीए केलेल्यांना अन्य अतांत्रिक क्षेत्रात मागणी येत होती, पगारपण आकर्षक होते.

तिसऱ्या टप्प्याने मात्र, अनेक मूलभूत प्रश्न अनेकांसमोर उभे केले आहेत. बीई पदवी घेतलेल्यांची अफाट संख्या, आयटीमध्ये केवळ त्यातील हुशारांनाच मिळणाऱ्या नोकऱ्या आणि त्यांचे पगाराचे आकडे ऐकूण होणारी सततची तुलना यातून एक वेगळेच दृश्य सध्या मुले व पालक यांचेपुढे उभे राहत आहे. बीई पदवी अपुरी आहे. ते शिक्षण परिपूर्ण नाही. नंतर काहीतरी शिकायलाच हवे; पण काय ते कळत नाही, असा हा गेल्या दशकाचा कालखंड आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठीचा राजमार्ग म्हणजे आयआयटीतील एमटेकचा; पण त्यासाठी लागणारी तयारी किमान दोन वर्षे गरजेची असते. सेमिस्टर पद्धत, स्वतः न बनवलेले प्रोजेक्ट, शिक्षणाच्या शेवटच्या दोन वर्षांत स्वतःच्या शाखेतील अॅप्लिकेशन व नवीन काय, याबद्दलचे पूर्ण अज्ञान यामुळे एमटेकची प्रवेश परीक्षा म्हणजेच 'गेट' फार कठीण वाटू लागते; पण आजपर्यंत ज्या मुलांनी प्रत्यक्ष काम करताना 'गेट'ची तयार केली आहे, त्यांना 'आयआयटी'त पाहिजे तेथे प्रवेश मिळविण्यात यश आले आहे. निव्वळ 'गेट'चा अभ्यास करतो, यातून फारतर अन्य ठिकाणी 'एमई'ला प्रवेश नक्की मिळू शकतो; पण करिअरच्या दृष्टीने त्याचा मोठा फायदा कधीच मिळत नाही. साध्या शब्दांत सांगायचे, तर पदवीधर हा तंत्रज्ञ असतो, तर आयआयटी एमटेक हा तंत्रसल्लागार सहज बनू शकतो. रोजचा तासभराचा; पण नियमित केलेला अभ्यास हा त्यासाठी पुरेसा ठरू शकतो. मात्र, निव्वळ हुशारी वा निव्वळ फर्स्ट क्लास आहे, म्हणून 'गेट'मध्ये यश कधीच मिळत नाही, हेही पक्के लक्षात ठेवायला हवे. ज्याप्रमाणे संकल्पना स्पष्ट असल्या, तरच 'जेईई-अॅडव्हान्स्ड'मध्ये यश मिळते, तशीच ही परीक्षा आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या संकल्पना स्पष्ट करून शिकणारे व शिकवणारे अशा दोघांचीही संख्या सध्याच्या परीक्षा पद्धतीने रोडावत गेली आहे. त्याचा परिणाम म्हणजे उत्तम मार्क अथवा डिस्टिंक्शन असलेली मुले/मुलीसुद्धा 'गेट'ला जेमतेम एखाद्या वेळी बसतात. त्यात मिळालेले जेमतेम मार्क पाहून व त्या अभ्यासक्रमाची भीती घेऊन तो रस्ताच सोडून देतात. त्यातील बरेचसे एमबीएला प्रवेश मिळवतात; पण त्यातील बहुसंख्य इंजिनीअरिंगशी काहीही संबंध नसलेली कामे नंतर करत राहतात. त्याला कोणाचीच हरकत असायचे कारण नाही; पण बँका, फायनान्स, कॉस्मेटिक वा व्हाइट गुड्स मार्केटिंग अशा कामात सारेच सहज रमू शकत नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे.

पदव्युत्तर शिक्षणाचा एमईचा रस्ता सध्या अनेक संस्थांत उपलब्ध आहे. मात्र, त्यानंतर मिळणाऱ्या पगारात (पॅकेजमध्ये) तीन वर्षे शिकल्याचे, खर्च केल्याचे दृश्य रुपांतर क्वचितच दिसते. ही एक कठोर वस्तुस्थिती विशेषतः पालकांनी नीट समजून घ्यावी. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ज्या वेळी हे विद्यार्थी इंडस्ट्रीत नोकरीला जातात, तेव्हा त्यांचे बरोबरचेच अनुभवी, कामाला लागलेले पदवीधर हे जास्त पगार मिळवत असतात. ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात जायचे आहे, सरकारी नोकऱ्यात जायचे आहे, 'डीआरडीओ'सारख्या संस्थांत जायचे आहे त्यांच्यासाठी मात्र हा राजरस्ता आहे, हेही नमूद करतो.

शेवटचा उल्लेख गरजेचा आहे. 'एमएस'चा रस्ता सरळ साधा आहे. 'जीआरई'चा क्लास लावून अभ्यास करायचा. बरा, चांगला किंवा उत्तम स्कोअर असेल, त्याप्रमाणे तिकडचे विद्यापीठ मिळते. सहसा प्रवेश मिळाला नाही, असे घडत नाही. मात्र, व्हिसा मिळाला नाही असे मात्र घडू शकते. त्याची कारणे कधीच कळत नाहीत. ज्या पालकांना २५ ते ४५ लाख रुपये उभे करता येतात, त्यांची साऱ्यांची मुले-मुली मास्टर्स पूर्ण करून तेथे व तिकडेच नोकरीचा शोध घेऊ शकतात. ज्यांना खऱ्या अर्थाने रिसर्च, डेव्हलपमेंट, क्वालिटी या क्षेत्रात रस असेल, तंत्र सल्लागार व्हायचे असेल, आंतरशाखीय विषयांत प्रगती करायची असेल, तर 'गेट'ला पर्याय नाही हे पक्के लक्षात ठेवावे. 'गेट' कठीण नाही, तर तिचा अभ्यास हे एक आव्हान आहे. जरी ती स्पर्धात्मक परीक्षा असली, तरी तुमची मॅच्युरिटी व सातत्य तेथे यश मिळवून देऊ शकते, यावर विश्वास हवा.

बीईनंतर काहीतरी शिकणे फार महत्त्वाचे नाही, तर नेमकेपणे शिकणे यालाच महत्त्व आहे. बीईनंतर अनुभवातून, कामातून शिकणारेच आज आपल्या इंडस्ट्रीचा कणा सांभाळत आहेत, हे वास्तव जाणून घ्या.

Related Posts:

  • उत्तम अभिव्यक्तीसाठी उत्तम अभिव्यक्तीसाठी..*> चांगली अभिव्यक्ती हा विषय सर्वस्पर्शी आहे. कुठलेही काम करताना त्याच्या> मांडणीविषयी सविस्तर विचार करायला हवा. आपल्या शिक्षण पद्धतीत केवळ घोकंपट्टी> करून चांगले मार्क मिळवता येतात, हे विद्यार… Read More
  • वाचनकौशल्य जोपासा  गायत्री गाडगीळ  gayatri.gadgil@gmail.com वाचन ही नुसती आवड नसून कामाच्या ठिकाणी अतिशय आवश्यक असे कौशल्य आहे. कार्यक्षम वाचक दिवसभरात समोर येणारी अनेक ई-मेल्स, अहवाल व पत्रव्यवहार पटकन समज… Read More
  • DIGITAL GENDER ATLAS FOR GIRLS’ EDUCATION IN INDIA LAUNCHED DIGITAL GENDER ATLAS FOR GIRLS’ EDUCATION IN INDIA LAUNCHED The Ministry of Human Resource Development, Department of School Education and Literacy, presented the Digital Gender Atlas for advancing girls' education in In… Read More
  • अभिव्यक्ती क्षमता : पुढे जाण्याची गुरुकिल्ली नीलिमा किराणे एखाद्या क्षेत्रात जेव्हा करिअर करायचे आपण निश्चित करतो, तेव्हा त्यासंबंधीची शैक्षणिक अर्हता आपण संपादन करतो. त्या क्षेत्रासंबंधीचे शक्य तितके ज्ञा… Read More
  • Indian students spending big on foreign education Indian students spending big on foreign education New Delhi: Indian students are spending between $6-7 billion annually on foreign universities due to dearth of quality higher education institutions in the country, a sur… Read More

0 comments:

Post a Comment