Wednesday, 11 March 2015


अभिव्यक्ती क्षमता : पुढे जाण्याची गुरुकिल्ली



एखाद्या क्षेत्रात जेव्हा करिअर करायचे आपण निश्चित करतो, तेव्हा त्यासंबंधीची शैक्षणिक अर्हता आपण संपादन करतो. त्या क्षेत्रासंबंधीचे शक्य तितके ज्ञान प्राप्त करून आपण प्रयत्नपूर्वक क्षमता-बांधणी करतो. मात्र कुठल्याही करिअरमध्ये आगेकूच करण्यासाठी याच्या बरोबरीनं आवश्यक ठरते ती 'अभिव्यक्ती क्षमता'! म्हणजेच जी माहिती आपल्याकडे आहे, तिची सुसूत्र मांडणी करून ती दुसऱ्याला समजेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीने सहजपणे व्यक्त करण्याची हातोटी.
उत्तम अभिव्यक्तीची आवश्यकता
परीक्षेच्या वेळी अनेकदा आपला अभ्यास चांगला झालेला असतो. प्रश्नपत्रिका हाती आल्यावर ती सोपी वाटलेली असते. पण पेपर प्रत्यक्ष लिहिताना जाणवतं की आपल्याला जेवढे चांगलं येत होतं, तेवढं आपल्याला उत्तरांतून व्यक्त होता आलेलं नाही. नोकरीसाठी मुलाखत द्यायला आपण उत्साहानं जातो. मात्र, ऐनवेळेस अवघडलेपण आणि भीती वाटल्याने मुलाखतीत आपली अपेक्षेएवढी चांगली छाप पडत नाही. प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनची प्रत्येक गोष्ट आपल्याला तोंडपाठ असते. पण कार्यालयातील वरिष्ठांना केवळ पाचच मिनिटे वेळ असतो. मग नेमून दिलेल्या वेळेत मनाजोगं सांगता येत नाही. आपल्याकडची माहिती, ज्ञान, मजकूर उत्तम असूनही असं का घडतं? तर कितीही कमी जास्त वेळ मिळाला तरी आपली अभिव्यक्ती उत्तम कशी होईल, यासाठीचा पुरेसा विचार आपण केलेला नसतो. त्यामुळे नेमक्या वेळी ज्ञानाच्या सादरीकरणात आपण कमी पडतो.
प्रांजळ अभिव्यक्ती
आपल्यातील चांगलं जगापुढे मांडण्यासाठी अनेकांना वैयक्तिक पातळीवर अडचणी असतात. स्वत:ला अभिव्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत, दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही लोक थोडंसं येत असले तरी ब्रह्मज्ञानी असल्यासारख्या फुशारक्या मारतात. काहींना मनातल्या संकोचामुळे स्वत:बद्दल बोलणं जड जातं. काही जण आपल्या विषयात निष्णात होण्यापेक्षा वरिष्ठांची, संबंधितांची खुशामत करून वर चढण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात घ्यायला हवं, की फुशारकी, संकोच किंवा खुशामत यापकी कुठल्याच पद्धतीमध्ये अत्मसन्मान नसतो. या सर्वापेक्षा वेगळा असा 'प्रांजळ अभिव्यक्ती' हा आणखी एक पर्याय उपलब्ध असतो. आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल, ज्ञानाबद्दल संबंधितांपर्यंत वस्तुनिष्ठ डाटा पोहोचवता आला तर समोरच्या व्यक्ती अथवा समूहाला प्रामाणिक माहिती मिळून निर्णय घेणे सोपे होते.
उत्तम अभिव्यक्तीसाठी..
चांगली अभिव्यक्ती हा विषय सर्वस्पर्शी आहे. कुठलेही काम करताना त्याच्या मांडणीविषयी सविस्तर विचार करायला हवा. आपल्या शिक्षण पद्धतीत केवळ घोकंपट्टी करून चांगले मार्क मिळवता येतात, हे विद्यार्थ्यांच्या मनात कुठे तरी पक्कं बसलेलं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा दिलेलं उत्तर पाठ करून तसंच्या तसं लिहून बरे मार्क मिळवण्याकडे असतो. अशा रेडिमेड मांडणीमुळे स्वत:चा विचार करण्याची, उत्तराची स्वतंत्र मांडणी करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता विकसित होत नाही. उत्तराचा विचार, आपल्या शब्दांत उत्तर देण्याची तयारी आणि विचाराची नेमक्या शब्दांतली मांडणी या सरावापासून बहुसंख्य विद्यार्थी कोसभर दूर राहतात. अभिव्यक्तीची क्षमता आपल्यात किती व कशी आहे, ती कशी विकसित करता येईल, याचे भान येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
अभिव्यक्ती क्षमता सुधारण्यासाठी..
ज्या व्यक्ती/समूहासाठी आपल्याला सादरीकरण करायचं आहे, त्यांची 'मानसिकता जाणून घेण्यामुळे', विद्यार्थी, व्यावसायिक, कलाकार अशा कुठल्याही भूमिकेतील अभिव्यक्तींच्या पातळीत खूप फरक पडतो. त्यांच्या नेमक्या गरजांपर्यंत आपण पोहोचलो आहोत हा विश्वास समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून हवा असतो. त्यांची गरज कळल्यानंतर आपल्याला त्यांच्यापर्यंत काय पोहोचवायला हवं आहे हे स्पष्ट होतं. अभिव्यक्ती क्षमता टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी समोरच्या व्यक्ती अथवा समूहाची मानसिकता जाणून घेणं, त्यांच्या नेमक्या गरजांच्या उत्तरांवर लक्ष केंद्रित करणं आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे हे स्पष्ट होणं असा प्राधान्यक्रम निश्चित
करायला हवा.
ज्याला सांगायचं आहे, त्याला कळणाऱ्या भाषेत, कळणाऱ्या पद्धतीनं ते येणं, नेमक्या शब्दांत ते व्यक्त करणं, त्यामागचा उद्देश समोरच्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणं, या गोष्टी जमणं म्हणजेच आपल्या क्षमतेला विकसित अभिव्यक्तीची
जोड मिळणं.
अभिव्यक्तीची पूर्वतयारी कशी कराल?
समोरची व्यक्ती, समूह, कंपनी.. अशा ज्यांच्यापुढे आपल्याला आपलं काम मांडायचं आहे, त्यांची नेमकी गरज काय आहे, त्यांची पाश्र्वभूमी (शिक्षण, भाषा, वयोगट इत्यादी) काय आहे, माहितीच्या सादरीकरणामागचा माझा उद्देश नेमका कोणता, मला त्यातून काय संपादन करायचे आहे.. या सगळ्याची उत्तरे परस्परांशी खूप जोडलेली आहेत. या सगळ्याचा स्वतंत्र आणि एकत्रित विचार जी स्पष्टता देतो, ती स्पष्टता विद्यार्थी, व्यावसायिक, कलाकार या सर्वासाठी आवश्यक असते. विद्यार्थ्यांपासून, मार्केटिंग व्यावसायिकांपर्यंत आणि स्वत:चा बायोडेटा लिहिण्यापासून आपल्या कलेच्या, उत्पादनाच्या सादरीकरणापर्यंत सर्व ठिकाणी, मुद्दय़ांची नेमकी निवड आणि सादरीकरणाची सुसूत्र मांडणी करण्यास या स्पष्टतेची मदत होते.
अभिव्यक्ती क्षमतेचा विकास
प्रत्येक विषयातील अभ्यासाचा किंवा विषय समजण्याचा प्राथमिक टप्पा पार झाल्यानंतर, 'दुसऱ्यांना ते समजेल आणि त्यांना ते ऐकावंसं, पाहावंसं, वाचावंसं वाटेल, यासाठी मी ते कसं मांडू?' याचा विचार व्हायला हवा. केवळ ज्ञान असून चालत नाही तर ते नेमकेपणानं सादर करता यायला हवं, हा विचार/सवय खरं तर शालेय वयापासूनच रुजायला हवी. शाळा-महाविद्यालयांतील विविध प्रसंगी तसेच कौटुंबिक स्नेहमेळाव्यांमध्ये व्यासपीठावरून बोलण्याचा सराव करावा.

Related Posts:

  • सोपी सीईटी खोटा कॉन्फिडन्स प्रा. डॉ. सुनील कुटे ,चेअरमन, बोर्ड ऑफ स्टडीज्, सिनेट मेंबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे  ( शब्दांकन -प्रतिनिधी) -   बारावीनंतर बीए-बीकॉम करायचं असेल तर द्याव्या लागतात का प्रवेश परीक्षा? मग इंजिनिअरिंगच… Read More
  • उच्चशिक्षण सुधारणांतील गुंते, चकवे.. उच्चशिक्षण सुधारणांतील गुंते, चकवे.. -          नीरज हातेकर, राजन पडवळ विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात 'क्रेडिट बेस्ड' सहामाही- सेमिस्टर परीक्षा पद्धती कशी का हो… Read More
  • Happiness Is Homemade Happiness Is Homemade Regardless of whether we live in the US, India or anywhere else, family is the building block of any society, and our greatest fulfillment lies there. Of course, one needs to give due … Read More
  • Its Time to Quit Smoking Its Time to Quit Smoking "I am going to quit smoking tomorrow..." How many times have you said this and how many more times have you heard it? Smokers, like alcoholics, make this pledge many times in their … Read More
  • अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच्या थेट प्रवेशासाठी आता सीईटी! अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच्या थेट प्रवेशासाठी आता सीईटी! संदीप आचार्य, मुंबई  Dainik Loksatta Published: Sunday, February 22, 2015 अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला … Read More

0 comments:

Post a Comment