करिअरची निवड करताना "मॉब मेंटॅलिटी‘ वर किंवा कौन्सेलरने सांगितले म्हणून करिअरची निवड करू नये. करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत, अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे; मात्र, करिअरची निवड करताना "आपली आवड‘ हा महत्त्वाचा मुद्दा विसरू नये.
अनंता पाचवीपासून माझा मित्र होता. आम्ही दोघे एकदमच मॅट्रिक झालो. आम्हा दोघांनाही चांगले मार्क पडले. फर्स्ट क्लास मिळाला. अनंताला तर माझ्यापेक्षा चांगले मार्क मिळाले. त्या वेळी सर्वसाधारणपणे मुलांचा ओढा इंजिनिअरिंगकडे जास्त होता. मी इंजिनिअरिंगला जायचे ठरवले. अनंताने पण तेच ठरवले. त्याचे हस्ताक्षर सुंदर होते. भाषा विषयात त्याला जास्त रुची होती. अंकगणित त्याला आवडत होते. त्यामुळे त्याने इंजिनिअरिंगला न येता आर्ट किंवा कॉमर्स साईडला जावे, असे मी त्याला सुचवून पाहिले. त्याला हे अर्थातच पसंत पडले नाही. त्या वेळी इंजिनिअरिंगचे दोनच मार्ग उपलब्ध होते. एकतर मॅट्रिकनंतर इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला जायचे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई व्हायचे. मी डिप्लोमाचा मार्ग स्वीकारला तर अनंताने बीईच्या मार्गाने जायचे ठरवले. बीईसाठी कॉलेजची पीडी (प्री डिग्री) व इंटर (इंटर सायन्स) अशी दोन वर्षे करावी लागत. ज्यांना इंटरला प्रथम वर्ग मिळे, त्यांनाच बीईला ऍडमिशन मिळे. अनंताने पीडीला ऍडमिशन घेतली. फर्स्ट क्लास मिळावा म्हणून इंटरला एक वर्ष ड्रॉप घेतला व इंटरची परीक्षा पास झाला; पण, त्याला काही प्रथम वर्ग मिळाला नाही व त्यामुळे बीईला ऍडमिशन मिळाली नाही. म्हणून त्याने इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला ऍडमिशन घेतली व तीन वर्षांचा डिप्लोमा पाच वर्षांत पूर्ण केला. अशा रीतीने त्याने इंजिनिअर होण्यासाठी मॅट्रिकनंतर आठ वर्षे घेतली. (म्हणजे परत पहिली ते आठवी एवढी वर्षे घेतली.) इंजिनिअर झाल्यावर तो एखाद्या कारखान्यात नोकरीला लागेल अशी अपेक्षा होती; पण त्याऐवजी तो एका बॅंकेत कॅशिअर म्हणून नोकरीला लागला, हे ऐकून मी उडालोच. पुढे तो त्याच बॅंकेत स्थिर झाला. मग त्याने बॅंकेची प्रमोशन्स मिळावी म्हणून बीए इकॉनॉमिक्स केले व 25 वर्षे बॅंकेत नोकरी करून मॅनेजर म्हणून निवृत्त झाला. पण, इंजिनिअर होण्याच्या हव्यासापायी त्याने तरुणपणातील उमेदीची आठ वर्षे वाया घालवली, ती काही परत येणार नाहीत. त्याला मुळात इंजिनिअरिंगची आवड नव्हती. पण, इतर सगळे इंजिनिअरिंगकडे जातात या "भेड चालीत‘ त्याने चुकीच्या करिअरची निवड केली. ज्यासाठी त्याने आठ वर्षे वाया घालवली व त्याचा त्याला पुढील आयुष्यात काहीही उपयोग झाला नाही. "करिअर‘ या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. पण, याचा व्यावहारिक अर्थ एकच आहे- तो म्हणजे "भविष्य काळात योग्य पद्धतीने भरपूर पैसे मिळवून देणारा मार्ग.‘ प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला भरपूर पैसे मिळावेत, आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, आर्थिक समृद्धी यावी. अर्थात यात चुकीचे किंवा वावगे असे काहीच नाही. हा एक सर्वसाधारण मनुष्यधर्म आहे. त्यामुळे करिअरची निवड करताना अनेक जण त्या करिअरच्या "मार्केट व्हॅल्यू‘चा आधी विचार करतात. आज करिअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. भरपूर "चॉइसेस‘ आहेत. त्यामुळे भरपूर "कन्फ्युजन्स‘ पण आहेत. जेवढा चॉईस जास्त, तेवढे कन्फ्यूजन जास्त, असे सरळ सूत्र आहे. करिअर निवडताना "आपली आवड काय आहे‘ याला महत्त्व देऊन करिअरची निवड केल्यास त्याचा पुष्कळ फायदा होतो. लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. म्हणून त्यांनी संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला व आजची उत्तुंग झेप घेतली. त्यांनी जर डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचा निर्णय घेतला असता, श्रीमती आशा भोसले यांनी गायिका होण्याऐवजी "स्पोर्ट वुमन‘ होण्याचा निर्णय घेतला असता किंवा सचिन तेंडुलकरने क्रिकेटिअर होण्याऐवजी कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचे "करिअर‘ निवडले असते, तर त्यांना आत्तासारखी करिअरमध्ये उत्तुंग झेप घेता आली असती की नाही, याविषयी शंकाच येते. आवड म्हणजे पॅशन. आपल्याला आवडीच्या क्षेत्रात काम करायला आवडते. माणूस आपले आवडते काम मनापासून- मन लावून करतो हा एक साधा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक माणसाला स्वतःची आवड ही असतेच. फक्त बऱ्याच जणांना आपली नक्की आवड काय आहे, हेच माहीत नसते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला नक्की काय आवडते, हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करिअरची निवड करताना इतरांनी सांगितले म्हणून, आई-वडिलांनी सांगितले म्हणून, अमुक-अमुक करिअरमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतात म्हणून, सगळे जण तिकडे चालले आहेत म्हणून मी पण चाललो, अशा "मॉब मेंटॅलिटी‘ वर किंवा कौन्सेलरने सांगितले म्हणून करिअरची निवड करू नये. अशा प्रकारे केलेली निवड घातक ठरू शकते. दहावी-बारावीचे निकाल लागले आहेत. जेईटी, सीईटी यांसारख्या परीक्षांचेसुद्धा निकाल लागलेले आहेत. आता सर्वत्र कॉलेज प्रवेशाची झुंबड उडाली आहे. करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत, अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आपण कोणते करिअर करावे या संभ्रमात अनेक जण आहेत. त्यामुळे करिअरची निवड करताना "आपली आवड‘ हा महत्त्वाचा मुद्दा विसरू नये. शेवटी कोणते करिअर करायचे याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, नाही का? |
Saturday, 6 June 2015
Home »
Education News
» आवडीचे करिअर, सर्वश्रेष्ठ करिअर !
0 comments:
Post a Comment