Monday, 8 June 2015

क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडा..

शब्दांकन - रेश्मा शिवडेकर, रोहन टिल्लू
Published: Monday, June 8, 2015



दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने 'लोकसत्ता मार्ग यशाचा' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत..

अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करण्याचं योग्य वय म्हणजे १४-१५ या वयोगटातील मुलं. म्हणजेच विद्यार्थी नववी-दहावीत जातो ते वय. कारण तोपर्यंत मुलाच्या विविध क्षमतांचा विकास सुरू असतो.
अभ्यासक्रम निवडताना कल, आवड आणि क्षमता या त्रयींचा विचार करावा लागतो. अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमुळे आपल्या क्षमता जाणून घेता येतात आणि ज्या क्षमता विकसित झालेल्या नाहीत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करता येतात.
गुणांच्या टक्केवारीवर विद्यार्थी अभ्यासक्रम निवडतात. पण अभ्यासक्रम निवडताना केवळ हा एकमेव निकष मानू नये. त्या विषयाची आवड, गती आणि आपल्याला तो अभ्यासक्रम पुढे कितपत झेपेल याचाही विचार व्हायला हवा. अभ्यासक्रम निवडताना मुलांनी पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या अथवा नातेवाईकांच्या अपेक्षांचे ओझे बाळगू नये आणि पालकांनीही मुलांना हे ओझे अजिबात येणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी मुले आणि पालकांमध्ये सुसंवाद असायला हवा. या सुसंवादातून दहावी-बारावीच्या वर्षांत अभ्यासाचा, परीक्षेच्या निकालाचा आणि नंतर अभ्यासक्रम निवडीचा जो अवाजवी ताण निर्माण झालेला असतो तो निवळण्यास मदत होते. मूल पुढे काय शिकू इच्छिते हे पालकांनी समजून घ्यायला हवे आणि मूल निवडू इच्छिणाऱ्या अभ्यासक्रमाबाबतची वास्तव परिस्थिती पालकांनी जाणून घ्यायला हवी. म्हणजे तो अभ्यासक्रम त्याला झेपेल का, अभ्यासक्रमाची फी, घरची आर्थिक परिस्थिती वगैरे.. हे सारे केवळ मुलं आणि पालक यांच्या सुसंवादातूनच शक्य होते.
टीनएजमध्ये मुलांवर मित्रमैत्रिणींचा प्रभाव अधिक असतो. मात्र, मित्रमैत्रिणींनी निवडला, म्हणून तोच अभ्यासक्रम तुम्ही निवडू नका. तुम्हाला जे रुचतं, पेलतं ते करा. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याची माहिती आतापासूनच करून घ्या. त्या क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधल्यास खूप माहिती मिळते. फावल्या वेळात त्या क्षेत्रांविषयी वाचा तसेच सुटीच्या दिवसांत त्या क्षेत्रात कामाचा अनुभव मिळाला तर अवश्य घ्या. असा कामाचा अनुभव तुम्हाला पुढे नक्की उपयोगी पडतो.
ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्या क्षेत्रातील उपशाखांची, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची माहिती याची माहिती करून घेणे केव्हाही चांगले.
अभ्यासक्रम निवडताना आपला स्वभावधर्म काय आहे ते समजून उमजून निवडा. काहींना जखमा, रक्त पाहिल्यानंतर भीती वाटते. त्यांनी जर वैद्यकीय क्षेत्र निवडले तर त्यांना त्रास होऊ शकतो. अर्थात ही भीती घालविण्याचेही अनेक पर्याय असतात. अत्यंत भावनाप्रधान असणारी व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञ झाल्यास काम करताना त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. करिअर निवडताना तो आपल्या व्यक्तिमत्त्वाशी मिळताजुळता हवा. एखादा अभ्यासक्रम निवडताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणाऱ्या क्षमता आपल्यात आहेत का, याकडे लक्ष द्या. जर एखाद्या विद्यार्थ्यांला अभियांत्रिकी शाखेत जायचे असेल तर त्यासाठी आवश्यक ठरणारे तांत्रिक गोष्टी शिकण्याची आवड आणि कल आपल्यात आहे का याचा विचार व्हायला हवा.
जर दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मनासारखे गुण मिळाले नाहीत तर त्यामुळे कोमेजून जाण्याचे कारण नाही. पालकांनीही अभ्यासाच्या पलीकडे आपल्या पाल्यात कुठल्या क्षमता आहेत, हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार ज्या क्षेत्रात त्याला गती आणि आवड असेल तिथे जाण्यासाठी मुलाला उत्तेजन द्यायला हवं.
अनेकदा या परीक्षांमध्ये मुलांना आलेल्या अपयशाचे कारण हे त्यांना या परीक्षांची वाटणारी भीती आणि त्यामुळे अभ्यासाचा आलेला तणाव हा असतो. अशा तणावाचा सामना मुलांना करायला लागू नये, यासाठी मुलांनी अभ्यासाचे नियोजन करायला हवे. त्याखेरीज दहावी-बारावीच्या वर्षांत तणाव निवळण्यासाठी नियमित व्यायाम, खेळ आणि छंदांचा मोठा उपयोग होतो. खेळ, व्यायाम, छंदाची जोपासना यामुळे ताजतवानं व्हायला मदत होते. त्यामुळे 'अभ्यास एके अभ्यास'चा अट्टहास मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी बाजूला ठेवायला हवा. मात्र, तरीही काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावामुळे घाबरेघुबरे होणे, काहीही न आठवणे अथवा वारंवार आजारी पडणे असे होते. अशा वेळी समुपदेशकाची अथवा वैद्यकतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी.
दहावीनंतरच्या पुढच्या अभ्यासात स्वयंअध्ययन महत्त्वाचे असते. त्यात विद्यार्थ्यांने पाठांतरापेक्षा विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घ्यायला हव्या. जर त्या विषयात रुची असेल तर स्वयंअध्ययनही उत्तम जमते. अन्यथा, स्वयंअध्ययनाअभावी विद्यार्थ्यांची फरफट होते आणि अभ्यासात मागे पडल्याने मुलांना नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव अशा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर घाला घालणाऱ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच विद्याशाखेची अथवा अभ्यासक्रमांची निवड विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
पूर्ण विचारांती एखादा अभ्यासक्रम निवडला तर त्यात यश मिळवणं हे केवळ विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. जिद्द आणि कठोर मेहनतीला पर्याय नाही. इंटरनेटचा आणि स्मार्टफोनचा अतिवापर प्रगतीच्या आड येतो, याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवायला हवे.
दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक अत्यंत व्यग्र आणि तणावपूर्ण असते. अभ्यासाचा ताण, थकवा दूर करण्यासाठी घरचा समतोल आहार आवश्यक असतो. अन्यथा, मुलांची चिडचिड, आरडाओरडा, थकवा असे प्रकार होतात.
प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता वेगळी असते, हे लक्षात घेत करिअरची निवड करायला हवी. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांना व्यावसायिक शिक्षणाद्वारे स्वावलंबी बनविण्याचा मार्ग उपलब्ध आहे. ज्या मुलांना अभियांत्रिकीसारख्या विद्याशाखेत जायचं आहे, त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, एकदा का प्रवेश मिळाला की काम फत्ते, असे नसते. कारण अभियांत्रिकीच्या प्रत्येक वर्षी निकालामध्ये सातत्य लागते. दरवर्षी गुणांचा आलेख प्रथम श्रेणीत असलात तरच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींचा लाभ घेता येईल.
क्रमिक अभ्यासासोबत व्यवहारज्ञान, इतरांच्या भावना समजून घेणे या भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला हव्या. माणसं ओळखण्याचे कसब मुलांना जमायला हवं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावभावनांचे व्यवस्थापन मुलांना करता यायला हवे.

नीलिमा आपटे
अभिक्षमता मापन विभाग प्रमुख, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणे

0 comments:

Post a Comment