Monday, 6 April 2015

‘हंबरणाऱ्या गाई’चा धनी... (उत्तम कांबळे)

‘हंबरणाऱ्या गाई’चा धनी... (उत्तम कांबळे)

एखादं गाणं, एखादं लोकगीत, एखादी कविता मनात दीर्घकाळ रुंजी घालत राहते... वेगवेगळ्या वळणांवर अनामिकपणे भेटत राहते...अस्वस्थ करत राहते. त्या रचनेच्या कर्त्याचा शोध घ्यावा, असं वाटू लागतं. मात्र, खूप शोध घेऊनही हाती फारसं काही लागत नाही. कधी कधी असंही घडतं, की दरम्यानच्या काळात रचनाकार काळाच्या पडद्याआडही गेलेला असतो...पण त्याच्या रचना काही शोध घेणाऱ्याची पाठ सोडत नाहीत... आणि मग पुढं कधीतरी हा शोध अकल्पितपणे पूर्ण होतो. एकाहून एक सरस कविता लिहिणाऱ्या अशाच एका प्रसिद्धिपराङ्‌मुख कवीच्या आणि त्याच्या कवितांच्या शोधाचा हा प्रवास...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. निवडून येणारा प्रत्येक अध्यक्ष आपापल्या परीनं वर्षभरासाठी काहीतरी कार्यक्रम निश्‍चित करतो. अर्थात, ठरवलेला कार्यक्रम स्वतःचीच यंत्रणा निर्माण करून पार पाडायचा असतो; पण तसं काही घडत नाही. शक्‍यही असत नाही. मी माझ्यापुरता एक छोटासा निर्धार केला होता. जे साहित्यिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, त्यांना आरोग्यसेवा घेता यावी, यासाठी काही निधी उभारण्याचा हा संकल्प होता. उपचाराविना, औषधाविना अनेक गरीब लेखक मरण पावल्याचं मी पाहिलं होतं. आपल्यामुळं एखाद्या लेखकाचे दोन-चार श्वास वाढले, तरी धन्य पावता येईल, अशी धारणा होती. प्रत्यक्षात निधी फार जमला नाही. ४०-५० हजारांच्या पुढं गेला नाही. जो जमला त्यापैकी काही निधी पुणे, नागपूर, बेळगाव इथल्या लेखकांना दिला. फार काही करता आलं नाही. गरीब लेखक, कलावंत, विचारवंत यांना जगवण्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न काही सुटला नाही. कधी सुटंल माहीत नाही. असो. याच काळात ‘हंबरूनी वासराला चाटते जेव्हा गाय’ हे गाणं बनलेली आणि महाराष्ट्रभर पसरलेली कविता मला अनेकदा ऐकायला मिळाली. विशेषतः रूपाताई साळवे यांच्या वसतिगृहातल्या खेड्यापाड्यांतल्या विद्यार्थिनी ही कविता खूप सुंदर गातात. ‘आई’वर मराठीत ज्या काही प्रसिद्ध कविता आहेत, त्यांपैकी ही एक कविता. एखादी कलाकृती इतकी गाजते, की तिचा निर्माता लोक विसरतात. अशी कविता लोकगीत बनते. लोकसाहित्यातल्या गीतांचं अनेकदा असं होतं. ‘चांदोबा-चांदोबा भागलास का?’ किंवा ‘हुशार कावळा,’ याचे कर्ते कोण, हे सहसा सांगता येत नाही. निर्माते कालबाह्य झालेले असतात आणि त्यांची कलाकृती मात्र काळाबरोबर चालत असते. ‘हंबरूनी...’ या कवितेचं असंच झालं आणि जेव्हा जेव्हा डोळे ओले व्हायला पाहिजेत, असं वाटायचं, तेव्हा ही कविता आठवायचो... तीमधल्या बहुतेक ओळी जणू काही डोळे ओले करण्याचं निमंत्रण घेऊन उभ्या असायच्या. तर ही कविता शाळेत गेली, सांस्कृतिक कार्यक्रमांत गेली. एवढंच काय टीव्हीवरही गेली. काहींनी तिच्यातून कमाईही केली; पण कविता जन्माला घातली कुणी, हे कळायला काही मार्ग नव्हता... माणसं हुशार असतात. कुणी कुणी तर कुणाकुणाच्या नावानं ही कविता चालवायला सुरवात केली. अलीकडंच आर. आर. आबांच्या निधनानंतर सांगलीच्या एका कवयित्रीनं लिहिलेली आणि व्हॉट्‌सॲपवर टाकलेली कविता काही क्षणातच एक मैत्रिणीच्या नावानं झळकू लागली. मूळ कवयित्री बिचारी खूप अस्वस्थ झाली; पण करणार काय आणि लाल दिव्याशी कोण टक्कर देणार ? बरं, ज्याच्या नावावर कविता पडली, त्यानं आयुष्यात कधी कविता लिहिलेली नसावी...काव्यचौर्याविषयी लिहिणं हा काही इथं उद्देश नाही, तर टीव्हीवर झालेल्या कार्यक्रमात ‘हंबरणारी गाय ही कविता नारायण सुर्वे यांची आहे,’ असं एकानं जाहीर केलं. सुर्वे तेव्हा हयात होते. त्यांनी ‘ही कविता आपली नाही, आपली आई गिरणी-कामगार आहे,’ असं सांगितलं. मात्र, प्रश्न इथंच संपला नाही. तो सुरूच राहिला. 

कविता कुणाची, हा प्रश्‍न सतावतच राहिला. मध्यंतरी नागपुरात गेलो... जळगावात गेलो. ‘सकाळ’च्या माझ्या सहकाऱ्यांनी आपापल्या भागांत कवितेचा धनी शोधण्याचा प्रयत्न केला. शेकडो लेखक/कवींशी संपर्क साधला; पण नाव काही कळत नव्हतं. शेवटी नागपूरमधल्या सहकाऱ्यांनी हा शोध लावला. बुलडाणा जिल्ह्यातलं नांदुरा तालुक्‍यातलं निमगाव हे त्या कवीचं मूळ गाव. त्यांचा जन्म मात्र जळगाव जामोद तालुक्‍यातल्या टाकळी पारसकार या गावचा. या कवीच्या पत्नी नांदुऱ्यात राहतात, असं कळलं. बरेच दिवस प्रयत्न केल्यानंतर त्यांचा फोननंबर मिळाला. बोलणं झालं. ‘तुम्ही कविता जमा करा, आम्ही पुस्तक काढतो,’ असं आश्‍वासन त्यांना दिलं. अध्यक्षपदावर राहून एक चांगलं काम करावं, त्याचा आनंद घ्यावा, असं माझंही स्वप्न होतं; पण काहीतरी घडलं आणि हे स्वप्न काही पूर्ण झालं नाही. मात्र, हा विषय काही डोक्‍यातून जात नव्हता. कुणीतरी सांगितलं, की १९८७ मध्ये औरंगाबादच्या प्रकाशनानं प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला होता; त्यात ही कविता आहे. सुवर्णलता मारवाडे संपादक होत्या; पण हा कवितासंग्रहही हाती लागला नाही. दरम्यानच्या काळात अनेकांशी चर्चा होत गेली. काही प्रकाशकांशीही होत होती. कुणी प्रकाशक पुढं आला नाही, तर नेहमीप्रमाणे आपणच काहीतरी करावं आणि काढावा कवितासंग्रह, असा विचार मनात येत होता; पण कविता काही मिळत नव्हत्या. डॉ. श्रीपाद जोशी आणि आणखी कुणाकुणाशी चर्चा होत होती. मध्येच बुलडाण्याला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा बी. जी. वाघ तिथले जिल्हाधिकारी होते. त्यांच्याशीही चर्चा झाली. तिथंच मराठीतले एक जोरदार कवी नरेंद्र लांजेवार भेटले. त्यांनी अतिशय आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे, ते स्वतःच या कवितांचं संपादन करून या कवीच्या मरणोत्तर हा संग्रह काढणार आहेत. कविता जमा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं. लांजेवारांनी लक्ष घातलं म्हणजे काम होणारच, याची खात्री होती. खूप बरं वाटलं ऐकून... मग मी अनेकांना ‘हंबरणाऱ्या गाई’च्या धन्याचं नाव सांगत सुटलो. ‘कवितासंग्रह येणार आहे’, हेही ठिकठिकाणी सांगू लागलो. कवितासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच मी या काव्यसंग्रहाचा ब्रॅंड ॲम्बॅसिडरही झालो. अशा काही कलाकृतींना जीव लावणं खूप छान असतं...

‘माय’ या गाजलेल्या कवितेचे रचनाकार. 

नरेंद्रशी बोलणं होऊनही बराच काळ लोटला. मध्यंतरी एकदा फोनवर बोलणं झालं. ‘काम अंतिम टप्प्यात आलं आहे’, हे उत्तर ऐकून आनंद वाटला. ‘पाहिजे ती मदत माग’, असं आश्‍वासन मी त्याला दिलं होतं; पण त्यानं शेवटपर्यंत काही मदत मागितली नाही. स्वतःच्या ताकदीवरच तो हे काम हाणून नेत होता. ‘जेव्हा या कविता माझ्यापर्यंत पोचतील, तेव्हा त्यांच्यावर लिहिण्याचा आनंद तरी मला घेऊ दे,’ हेही मी त्याला सांगून ठेवलं होतं. ‘हो सर’ म्हणत त्यानं हा शब्द पाळला. आश्‍चर्य म्हणजे, १८ मार्च २०१५ ला हा काव्यसंग्रह कवीच्या फोटोसह माझ्या लॅपटॉपवर झळकला. संग्रहाची प्रिंट काढली. ‘मला काव्यसंग्रह मिळाला आहे,’ ही बातमी अनेकांना सांगितली. नरेंद्रलाही धन्यवाद दिले. या काव्यसंग्रहात सर्वांत अगोदर मला ‘माय’ ही कविता शोधायची होती.
मात्र, नरेंद्रनं शोधण्यासाठी कष्ट घेण्याची गरजच ठेवली नव्हती. कवीच्या हस्ताक्षरातच ही कविता मुखपृष्ठावर झळकली होती. या काव्यसंग्रहाचा संपादक नरेंद्र लांजेवार (९४२२१८०४५१) आणि प्रकाशक आहेत सचिन उपाध्याय (९८८१७०००९९). काव्यसंग्रह या महिन्यात, म्हणजे एप्रिलमध्ये, प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रह सर्वांनाच घेता यावा, यासाठी त्याची किंमतही नाममात्र म्हणजे १२० रुपये आहे. ‘माय’शिवाय आणखी ४३ कविता या संग्रहात आहेत. मी मात्र ‘माय’वरच सर्वप्रथम केंद्रित झालो.

तीन-तीन ओळींची नऊ कडवी आहेत. भाषा अतिशय गोड, साधी आणि ऋतू कोणताही असला तरी काळजाला सहज पाझर फोडणारी आहे.
माय
हंबरून वासराले चाटते जव्हा गाय
तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय...

आयाबाया सांगतात की मी होतो जव्हा तान्हा
दुकायाच्या साली मायचा आटला होता पान्हा
पीठामंदी पाणी घालून मले पाजत जाय...

फनकाट्या येचायले माय जाये रानी
पायात नसे वहान साधी, हिंडे अनवानी
इचू-काट्यालेबी तिचा मोजत नव्हता पाय...

दारू पिऊन रोज मायले मारे माहा बाप
थरथर कापे माय तव्हा लागे तिले धाप
कसायाच्या दावनीले बांधली जसी गाय...

सुट्टीमंदी जव्हा मी येत होतो घरी
उसनंपासनं आणून खाऊ घाले नानापरी
करू नको घाई म्हणे पोटभर खाय...

बाप माहा रोज लावे मायच्या मागं टुमनं
बस झालं शिक्‍शन याचं घेउ दे हाती रुमनं
शिकूनशानी कुठं मोठा सायेब होनार हाय...?

माय म्हने तुम्हाले माय गयाची हाये आन
भलतंसलतं सांगून त्याचे भरू नका कान
भरून येत डोयात तिच्या तापी-पूर्नामाय...

बोलता बोलता एकदा तिच्या डोयात आलं पानी
म्हने कव्हा दिसन सांग मले राजा तुही रानी ?
या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय...

म्हणून वाटते मले तुही भरावं सुखान ओटी
पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी
अन्‌ ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय...

                  
(वऱ्हाडी भाषेतल्या या कवितेमधल्या काही शब्दांचे अर्थ - दुकायाच्या ः दुष्काळाच्या, फनकाट्या ः जळण, इचू ः विंचू, रुमनं ः शेतीचं अवजार, आन ः शपथ, डोयात ः डोळ्यात, तापी, पूर्नामाय ः नद्यांची नावं, तुही ः तुझी, तुहे ः तुझे)

‘आई’ नावाची आणखी एक कविता याच संग्रहात आहे. तीही अशीच चटका लावणारी आहे. आईनं मरणाच्या गावात जाऊ नये म्हणून तिची केलेली ही आळवणी आहे.

जाऊ नकोस आई
सोडून पाखराला
नाही तुझ्या विना गं
आधार या घराला
पिकले फळ कधी कां
झाडास भार होते!
तैसे ऋणानुबंधी
आहे जपून नाते


साधा, स्वच्छ आणि सच्चेपणाचं जीवन जगणारा हा कवी आणखी एका कवितेत म्हणतो ः

चोरून सूर नेले सतारीस भान नाही
सांगू कसा तुला गं मी बेइमान नाही
तारू फुटून गेले उद्‌ध्वस्त किनारा झाला
आता रडायचेही मज अवसान नाही


या संग्रहाचा कॉपीराइट हेमा पाचपोळ (८८५७८३३०५८) यांच्याकडं आहे. हेमा ह्या या कवीच्या कन्या, तर कमलताई पत्नी आहेत. त्यांनी पतीच्या कवितांना जीव लावून त्या जपून ठेवल्या. कवीचा जन्म १४ सप्टेंबर १९५० चा, तर पोटाच्या विकारानं मृत्यू झाला १९ जून २००५ ला. याचा अर्थ मरणानंतर जवळपास दहा वर्षांनी कवितासंग्रह येतोय. साखरखेर्डा इथल्या एस. ई. एल. कनिष्ठ महाविद्यालयात मराठी आणि समाजशास्त्र शिकवणारा हा कवी आयुष्यभर निःस्वार्थी जीवन जगला. प्रसिद्धीच्या गावात स्वतः कधी गेला नाही. सबब कविताही झगमगटात फिरली नाही. आता मात्र ती फिरेल आणि मराठी माणसांना आणि साऱ्या आयांना जिंकेल, यात शंका नाही. कवीचं नाव आठवत नाही, असंही कुणी म्हणणार नाही. केवळ ५५ वर्षांचं आयुष्य संपवून गेलेला हा कवी. निधन होऊनही कवितांच्या रूपानं अनेकांच्या हृदयात वास करणाऱ्या या कवीचं नाव आहे ः समाधान गणपत पाचपोळ म्हणजेच स. ग. पाचपोळ.

(‘मृत्यूची सावली दिसते तेव्हा...’ या गेल्या आठवड्यातल्या ‘फिरस्ती’त ‘...डॉ. कऱ्हाड यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो’ असा उल्लेख आहे. तसा उल्लेख अनवधानानं झाला असून, वस्तुतः ते वाक्‍य ‘एम. जे हॉस्पिटलमधल्या डॉ. ईश्वर राठोड यांच्याकडं गेलो,’ असं हवं होतं.)

0 comments:

Post a Comment