Tuesday, 19 May 2015

अ‍ॅप'ल्यातील सुटी



उन्हाळी सुट्टीत करण्यासारखे तसे बरेच उद्योग असतात. अगदी उन्हाळी शिबिरांपासून ते मामाच्या गावापर्यंत. पण काही दिवसांनी याचाही कंटाळा येतो आणि मुलं टॅबलेट किंवा मोबाइलमध्ये रमू लागतात. त्यातील कॅण्डी क्रश, टेम्पल रनसारखे खेळ ते खेळतात. यापेक्षा त्यांना मोबाइलमध्येच मज्जाही करता येईल आणि त्यातून त्यांचा अभ्यासही होईल असे काही अ‍ॅप्स डाऊनलोड करून दिले तर. असे बरेचसे अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील काही अ‍ॅप्सविषयी..
डुओलिंगो
तुमच्या मुलाला जर भाषेची आवड असेल तर त्याला हे अ‍ॅप डाऊनलोड करून द्या. या अ‍ॅपमध्ये नवीन भाषा त्याही मोफत शिकण्याची उत्तम संधी यामध्ये मिळते. या अ‍ॅपमध्ये स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज, लॅटिन, आयरीश, डच, डूनिश आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आहे. यामध्ये भाषा शिकण्यासाठी प्राथमिक, प्रगत, वाक्प्रचार, प्राण्यांची नावे, फळांची नावे आदी पायऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पायरीमध्ये काही प्रकरणं देण्यात आली आहेत. त्या प्रकरणांचा अभ्यास करून मुलं त्यात दिलेल्या छोटय़ा प्रश्नांची उत्तरे दिली की त्यांची अभ्यासातली प्रगतीही पाहू शकतात. या अ‍ॅपची रचना आणि त्यातील रंगसंगती मुलांना भावणारी आहे.
अ‍ॅप कुठे उपलब्ध- अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, आयओएस

लिंडा
मुलांना समोर उभे राहून व्याख्यान देणाऱ्यापेक्षा व्याख्यात्याने काही तरी प्रात्यक्षिक करत शिकवलेले चांगले वाटते. आता प्रत्येक मुलाला ही सुविधा मिळेलच असे नाही. पण हे अ‍ॅप तुमची ही गरज भागवू शकते. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला जे काही शिकायचे आहे त्याचा व्हिडीओ पाहावयास मिळतो आणि तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते शिकू शकता. यात विविध तंत्रज्ञानांपासून ते कल्पक आणि व्यावसायिक कौशल्यांपर्यंतचा समावेश आहे. याचबरोबर छायाचित्रण, ग्राफिक डिझाइन, वेब डिझायनिंग, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, ऑडिओ यांसारखे अनेक व्हिडीओज पाहावयास मिळतात. यामुळे मुलांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम घरबसल्या शिकता येणार आहे. यासाठी कोणताही क्लास लावण्याची किंवा शुल्काची गरज नाही.
अ‍ॅप कुठे उपलब्ध - अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, आयओएस

ग्रुप मी
सोशल नेटवर्किंग साइटवर जाऊन गप्पा मारण्यात वेळ घालविण्यापेक्षा तुमच्या मुलाने त्याच्या मित्रांसोबत एखादा प्रकल्प पूर्ण केला तर ते त्याच्या फायद्याचे ठरू शकते. विद्यार्थ्यांची ही गरज या अ‍ॅपच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे. या अ‍ॅपमध्ये मुलांनी एक ग्रुप तयार करून त्यांच्यामध्ये एखादा प्रकल्प ठरवून तो पूर्ण करू शकतात. या ग्रुपमध्ये फोन नंबर आणि ई-मेल अ‍ॅड्रेसच्या मदतीने मित्रांना अ‍ॅड केले जाऊ शकते. यात तुम्ही माहिती आणि विविध यूआरएल शेअर करू शकतात. तसेच ग्रुपमधील सर्वाच्या भेटीगाठीही कॅलेंडरच्या मदतीने ठरवू शकता. यामुळे तुम्ही कुठेही बसून कोणत्याही प्रकल्पावर काम करू शकता.
अ‍ॅप कुठे उपलब्ध- अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, आयओएस

कोबो बुक्स
जर कुणाला वाचायची आवड असेल तर कोबो अ‍ॅप तुम्ही डाऊनलोड करून देऊ शकतात. यामध्ये लाखो मोफत आणि स्वस्त पुस्तकांचा साठा आहे. यात लहान मुलांसाठी वेगळा विभाग असून त्यात चित्रकथांच्या पुस्तकांबरोबरच विविध त्यांच्या विश्वातील पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर या अ‍ॅपमधील पुस्तकांचे वाचन तुम्ही मोबाइलबरोबरच त्याच्यासोबत जोडलेल्या अर्थात सिंक केलेल्या उपकरणांमधून करू शकता. यामुळे कोणत्याही उपकरणावर तुम्ही अ‍ॅपच्या माध्यमातून लॉगइन करून पुस्तक वाचू शकता. यात अनेक परदेशी भाषांची पुस्तकेही आहेत.
अ‍ॅप कुठे उपलब्ध- अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, आयओएस

वॉलफार्म अल्फा
उन्हाळी सुट्टीत शाळेतून काही घरचा अभ्यास दिला नसेल तर तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून बराचसा अभ्यास करू शकता. या अ‍ॅपमध्ये गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास अशा शेकडो विषयांचा समावेश आहे. या अ‍ॅपमध्ये अभ्यासाबरोबरच काही गमतीही करू शकता. यामुळे हे अ‍ॅप अनेक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
अ‍ॅप कुठे उपलब्ध - अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, आयओएस
- नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com

0 comments:

Post a Comment