Thursday 21 May 2015

संपादकीय

लीकडच्या काळात विविध देशांतील उठाव, आंदोलने; तसेच निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित झाले. या घटना वा इतर घडामोडींशिवाय दैनंदिन जीवनात सोशल मीडियाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होणारे नवतरुण हा पालकांच्या चिंतेचा विषय आहे. परंतु, याबाबत नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून काही दिलासादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. 

दहा वर्षांपूर्वी किशोरवयात असणारी पिढी जितकी आनंदी होती, त्यापेक्षा आजची ‘फेसबुक जनरेशन’ अधिक खूष आहे. कुमारावस्था हा प्रौढत्वाचा पाया घालणारा महत्त्वाचा टप्पा असतो. ‘युरोपीयन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ने नुकतेच काही निष्कर्ष ऑनलाइन प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये अकरा ते पंधरा वयोगटातील पिढीला ‘फेसबुक जनरेशन’ असे संबोधण्यात आले असून, या पिढीचा या विशिष्ट वयात अपप्रवृत्तीकडे वळण्याचा कल तुलनेने कमी झाला आहे, असे निरीक्षण त्यात नोंदविले आहे. 
एका दशकापूर्वी मद्य, अमली पदार्थांचे सेवन, धूम्रपान याकडे आकर्षित होणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या तुलनेत सध्याच्या ‘फेसबुक’च्या प्रभावाखालील पिढीमध्ये या
व्यसनांकडे वळणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे पौगंडावस्थेतील मानसिक बदलांमुळे येणारी दादागिरी करण्याची प्रवृत्ती या पिढीमध्ये कमी होत असल्याचे दिसून आले आहे. स्कॉटलंडमधील सेंट अँड्य्रूज विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले. संशोधन समन्वयक प्रा. कॅंडेस कुरी म्हणाल्या, ‘‘गुंडगिरी, दादागिरी करणे, मद्यपान असे प्रकार या वयोगटामध्ये कमी झाल्याचे दिसून आले आहे. तंबाखू, गांजा अशा व्यसनांपासून दूर राहणाऱ्यांची संख्याही समाधानकारक प्रमाणात वाढली आहे.’’

गेल्या दहा वर्षांत किशोरवयीन मुलांमध्ये फळे, भाज्या यांबाबतची जागरूकता वाढली आहे; तसेच आरोग्यदायी खाण्याला ते प्राधान्य देत आहेत. शारीरिक चपळाई, स्वच्छता राखणे, तसेच महत्त्वाच्या गोष्टींबाबत पालकांशी चर्चा करणे या सकारात्मक नोंदीही या संशोधनातून समोर आल्या आहेत. फॅशन, वर्तणुकीबद्दलचे संकेत आणि सामाजिक मूल्ये यांतील बदल यांचाही सकारात्मक परिणाम नवयुवकांवर होत असल्याचे या संशोधनातून सूचित होते. दरम्यान, हे निष्कर्ष दिलासा देणारे असले, तरी ‘फेसबुक जनरेशन’मधील सर्व बदल सकारात्मक आहेत, असे म्हणता येणार नाही.

या संशोधनातून प्रकर्षाने दिसून आलेली एक बाब म्हणजे, पूर्वीची व आताचीही किशोरवयीन मुले विशेष वैयक्तिक-सामाजिक संवाद साधत नाहीत. याशिवाय हे टीन-एजर्स आपल्या खोलीतच अधिक काळ राहून स्मार्टफोनसारख्या गॅजेट्‌सशी खेळत राहतात.
वस्तुतः घराबाहेर पडून मित्रांमध्ये मिसळण्याचे, समाजशील होण्याचे हे वय आहे. त्यामुळे या नव्या मीडियामुळे ‘फेसबुक जनरेशन’ कितपत ‘सोशल’ आणि किती ‘सेल्फ-सेंटर्ड’ होते आहे, याचाही विचार व्हायला हवा.


प्रथम संगणक, नंतर इंटरनेट, विविध संकेतस्थळे आणि नंतर सोशल मीडिया अशा विविध टप्प्यांवर सार्वजनिक पातळीवर मानवी वर्तनात होणारे बदल हा नेहमी औत्सुक्‍याचा विषय बनला. केवळ औत्सुक्‍य नव्हे, तर तंत्रज्ञानापासून ते मानसशास्त्रापर्यंत हरेक क्षेत्राला स्पर्श करीत नेटिझन्सच्या वैयक्तिक; तसेच सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला सोशल मीडिया हा संशोधनासाठीचा महत्त्वपूर्ण विषय आहे.

0 comments:

Post a Comment