Thursday, 21 May 2015

शिक्षणव्यवस्थेमागचा उद्देश काय? (डॉ. नवले) - डॉ. संजय नवले


गेली वीस वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एका प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही. या क्षेत्रात आल्या दिवसापासून सतत वाटत आहे, की जगामध्ये कुणाच्या डोक्‍यामध्ये कल्पना किंवा विचार आला असेल, की "शाळा‘ असली पाहिजे. शिक्षक, फळा, खडू यांचा शोध कोणी लावला असेल. या विश्‍वातला पहिला शिक्षक कोण असेल. जगातली पहिली शाळा कशी असेल. या सगळ्या प्रक्रियेपाठीमागचा त्या वेळेस कोणता उद्देश असेल हे आज तपासून पाहणे गरजेचे आहे. सुरवातीस प्राथमिक शिक्षण, नंतर माध्यमिक शिक्षण, त्यानंतर उच्चशिक्षण अशी रचना शिक्षण व्यवस्थेत केलेली दिसून येते. या संपूर्ण यात्रेचा उद्देश समजून घेणे महत्त्वाचे आहे.

शिक्षणाचा अर्थच मुळात संस्कार आहे. संस्कारातून माणूस प्राणी "माणूस‘ ही रास्त अपेक्षा असावी. जगामध्ये ज्या-ज्या ठिकाणी शिक्षण नाही, म्हणजेच शाळा नाही, त्या-त्या ठिकाणी जंगल आहे. म्हणजेच प्राण्यांना माणूस बनविण्याचे काम शाळा व त्यातून देण्यात येणारे शिक्षण यातून घडत असते. याचा अर्थ असा होतो, की माणसांमध्ये जंगल निर्माण होऊ द्यायचे नसेल तर शिक्षण आवश्‍यक आहे, हे निश्‍चित होते आहे. जगामध्ये जेवढे चांगले बदल झाले किंवा सुंदर नवनिर्मिती झाली, ती शिक्षणाच्या माध्यमातूनच झाली हे निश्‍चित आहे. विचारवंतांची निर्मिती ही शिक्षणातून झालेली दिसून येते. त्यामुळे इतिहासाचे अध्याय तपासून पाहिले तर असे दिसून येईल, की बदल घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. परिवर्तनाची ताकद शिक्षणातूनच मिळते. शिक्षण घेण्यासाठी व देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती झाली. शिकलेले ज्ञानी लोक आपले अनुभव लिहून काढू लागले. शहाणपण व्यक्त करू लागले. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानातून चांगलं-वाईट सांगू लागले. हे सगळं पुढची पिढी वाचून शहाणी बनू लागली. त्यामुळे माणसासाठी शहाणपण हे शिक्षणातून मिळतं हे निश्‍चित होते आहे. अर्थात संस्कार, शहाणपण, संस्कृती या सगळ्यांचा शिक्षणासाठी खूप महत्त्वाचा संबंध आहे. या सगळ्यांसाठीच शाळा, शिक्षक या मूल्यांची निर्मिती झाली असावी. यातून अक्षरं, पुस्तक विचार, संस्कार, परिवर्तन, माणूसपण, शहाणपण या गोष्टी जोडून येतात. यातूनच माणसासाठी जग सुंदर बनत जाते अशी एकमेकांत सांगड घातलेली मोठी प्रक्रिया आहे.
प्राथमिक शिक्षणातून अक्षर ओळख व्हावी. शब्दसंस्कृतीविषयी गोडी निर्माण व्हावी. त्याला अक्षराविषयी लळा लागावा. "ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा‘ अशी परिस्थिती त्याच्या प्रारंभिक जीवनामध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा असते. स्पर्धा, परीक्षा अशा गोष्टी या काळामध्ये महत्त्वाच्या नसाव्यात. या बालवयात पुस्तकातून त्यांना काय द्यावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, हे आज तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. मुळात शिक्षणाचा संबंध उद्योगाशी जोडला गेला, त्याच वेळी मूल्य बाजूला पडण्यास सुरुवात झाली. लहानपणी अक्षर संस्कृतीच्या माध्यमातून स्पर्धा, नोकरी, पैसा, गाडी-बंगला या गोष्टी सांगत असू, तर पहिली शाळा व शिक्षक निर्मितीच्या वेळीचा उद्देश खूप मागे राहतो आहे असे वाटते.

आणखी एक गोष्ट नमूद करावी वाटते ती अशी, की एकेकाळी विद्यार्थी आपल्या पायाने शाळेत जात होते. त्यांना शाळेत जावंसं वाटायचं, परंतु आता भौतिक साधनांच्या माध्यमातून शाळाच मुलाकडे जात आहे. त्यामुळे शिक्षणाची गरज मला नाही, शाळेला आहे, अशी मानसिकता तयार होताना दिसते. जोपर्यंत शिक्षणाचा उद्देश ज्ञान घेणे, जीवनाचे जगायचे भान येणे, मग ज्ञानी माणसाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून घेण्यासाठी, चांगलं काही तरी निर्माण करून घेण्यासाठी त्याला आमंत्रित केलं जायचं. त्याच्या त्या कष्टाबद्दल, कामाबद्दल मोबदला दिला जायचा. त्याला आपण दुसऱ्या भाषेत नोकरी म्हणतो. पैसे देऊन नोकरी घेणे हा प्रकारच असू शकत नाही. कारण नोकरीचा संबंध ज्ञान व कौशल्याशी आहे. ज्या वेळेस शिक्षण, ज्ञान, उद्योग व व्यापार हे शब्द एकत्र आणले गेले, त्या वेळेपासूनच सुरुवातीला ज्या उद्देशाने शाळा निघाली, शिक्षक निर्माण झाला, ते उद्देश दूर पळून गेले. यामुळेच सध्या परिस्थितीमध्ये परिवर्तन वगैरे गोष्टी दिसून येत नाहीत. ज्ञान विकत घेतले की तो हिशोब करूनच पुढे ज्ञान विकत देतो. त्यामुळे शिक्षणातून, संस्कारातून, संस्कृतीतून जे काही निर्माण करावयाचे आहे, ते लांबच राहात गेले व चाललेले दिसून येत आहे.
जगायचं तर पैसा हवाच, पैसा हवा असेल तर नोकरी हवीच, नोकरी हवी तर परीक्षेमध्ये गुण अधिक हवेत अशी अपेक्षा असते. मुळात हे समजून घेतले पाहिजे, की परीक्षा ही ज्ञानाची पातळी मोजण्याचे साधन आहे. आज आपण त्याला साध्य बनविले आहे. त्यामुळे आज सगळीकडे परीक्षा, परीक्षा, जास्त गुण, मग मार्ग कोणताही असो. आज सक्‍सेससाठी कुठल्याही वाटेने जाणारी एक संस्कृती बनत चालली आहे. आजच्या पर्याय शोधण्याच्या ज्या परीक्षा आहेत, त्याचा आणि ज्ञानाचा अधिकचा संबंध नाही. खरं तर पर्याय शोधण्याच्या परीक्षामध्ये बारकाईने अभ्यास करावा ही अपेक्षा असते, परंतु मूळ पुस्तक न वाचता सर्व पर्याय उपलब्ध करून देणारी सुंदर यंत्रणा प्रत्येक ठिकाणी विकसित केली आहे. त्यामुळे मूळ पुस्तक वाचणे खूप दूर राहिले गेले आहे. यातून ज्ञान वाढविणे, जोपासने या गोष्टी होताना दिसत नाहीत. ग्रंथ वाचून या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिढ्या घडल्या हे सत्य नाकारता येणार नाही. अक्षरांच्या गर्भातील विचाराने माणसं खूप-खूप मोठी झाली. त्यांना वैश्‍विक पातळीवर मान्यता मिळाली. त्यामुळे जगामध्ये प्रत्येक महान विचारवंताने शिक्षण, ग्रंथांना खूप मोठे महत्त्व दिल्याचे दिसून येते. साहित्याचा आदित्य अंधार संपवत असतो हे विसरत चाललो आहोत काय हे पाहिले पाहिजे. पर्यायी परीक्षा व्यवस्थेने जगण्याचे पण पर्याय निर्माण केले आहेत. गुणांकनाने मानांकन मिळायला लागल्यामुळे खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली. अंकाच्या गुणामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. यातून संस्कार, संस्कृती, सदाचार, सद्विचार, सहयोग, सद्‌भावना हे शब्द भविष्यात कोठे असतील याचा विचार व्हायला हवा असे वाटते. या महत्त्वाच्या गोष्टी नसतील अन्‌ गुणांक खूप असेल तर त्याला माझ्या मते शून्य किंमत असावी. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांत अशा पद्धती वाढत चालल्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या वाढताना दिसते. कुठल्याही मार्गाने पैसा, प्रतिष्ठा मिळविणे ही वृत्ती वाढत चालली असल्यामुळे व शिक्षणाकडे व्यापारी वृत्तीने पाहिले जात असल्यामुळे उद्याचे भविष्य काय असेल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज भासणार नाही. एका जागतिक सर्वेक्षणामध्ये संदर्भ देऊन स्पष्ट केले आहे, की जगभरातल्या एका विशिष्ट गटातील वर्गाचा कल सध्या मंदिराकडे, ईश्‍वराकडे जात आहे. तो विशिष्ट वयोगट म्हणजे आजची युवा पिढी होय. या पिढीचा इथल्या व्यवस्थेवरचा विश्‍वास उडाला आहे. अशा शिक्षणाने काहीच मिळत नाही. आता आपल्याला ईश्‍वरच खरा मार्ग दाखवेल अशा आशेने हे लोक मंदिराकडे जात आहेत.
भारतामध्ये सुरवातीच्या काळामध्ये चार विद्यापीठांची स्थापना झाली. जगभरातल्या विद्यापीठांची स्थापना होताना देखील एका महत्त्वाच्या विशिष्ट वयोगटातील पिढीला नवी दृष्टी, दिशा, त्यांना वैभवाचं आकाश व जमीन मिळवून देणारे शिक्षण द्यावे. संशोधन व्हावे. या संशोधनातून मानवीय उत्कर्ष व्हावेत अशी कल्पना, संकल्पना असावी. फक्त पदवी देणारे नव्हे, तर जीवनाचे भान देणारे शिक्षण द्यावे, घ्यावे ही अपेक्षा असते. ऋषी, मुनीसारखा ध्यानस्थ चिंतन करणारा माणूस बनावा, पैशांचा नव्हे तर मांगल्याचा विचार करणारा कर्णधार समाज, राष्ट्राला मिळावा. विद्यापीठामध्ये इमारती किती मोठ्या आहेत यापेक्षा विचाराने प्रगल्भ, अर्थात मोठ्या विचारांची पिढी निर्माण होणे आवश्‍यक आहे. विद्यापीठातून चांगला माणूस, चांगला विचारवंत, चांगला कलाकार, चांगला खेळाडू, चांगला लेखक निर्माण व्हावा म्हणजे समाजाला दिशा मिळत असते. एका विचारवंताने स्पष्ट लिहून ठेवले आहे, की आजच्या विद्यापीठातून चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकला नाही ही मोठी शोकांतिका आहे. चांगलं काही निर्माण होत नसेल व फक्त स्थावर मालमत्ता विद्यापीठाची वाढत असेल तर त्याला अर्थ नसतो. या संस्था सत्ताकेंद्राऐवजी "सत्य‘ केंद्र बनाव्यात ही रास्त अपेक्षा आहे. माणसाच्या जाती आम्ही निर्माण केल्या, देव वाटून घेतले, जमीन वाटून घेतली, आता पाण्याच्या जाती निर्माण केल्या. त्यातून अफाट पैसा कमवला जात आहे. सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आम्ही शिक्षणाच्या जाती निर्माण केल्या आहेत. पैसा असणाऱ्याचे एक शिक्षण व पैसा नसणाऱ्यांसाठी दुसरे शिक्षण. भविष्यात कृष्ण व सुदामा एकाच ठिकाणी शिकतील अशी रास्त अपेक्षा करूयात.
(लेखक : प्रोफेसर, हिंदी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.)

0 comments:

Post a Comment