वर्ग वेळेवर सुरू होण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय
पुणे- राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन वर्ग वेळेवर सुरू व्हावेत, म्हणून यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाच्या दोनच फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम अचूकपणे भरावे लागतील. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्याही दोनच प्रवेश फेऱ्या करण्याचा संचालनालयाचा विचार आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी तीन फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी झाली होती. मात्र, या फेऱ्यांच्या अधिक संख्येमुळे महाविद्यालये वेळेवर सुरू होत नाहीत. त्यामुळे यावर्षी केवळ दोन फेऱ्या घेण्यात येणार आहेत. समुपदेशनाची तिसरी फेरी मात्र दरवर्षीप्रमाणे घेतली जाईल. दहावीचा निकाल लागल्यानंतर जुलै महिन्यात सर्व तीन फेऱ्या पूर्ण करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयांचे पहिले सत्र सुरू करण्याचा संचालनालयाचा विचार आहे. प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यानंतर सत्र परीक्षा आणि पुढील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो. अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचे नियोजन करता येत नसल्याने प्रवेश प्रक्रिया शक्य तेवढी लवकर पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेशाच्या दोनच फेऱ्या केल्या असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संचालनालयाचे विभागीय सहसंचालक व्ही. जी. तांबे म्हणाले, ""प्रवेशाचे माहितीपत्रक प्राप्त झाले असून, त्यानुसार प्रवेशाच्या मुख्य दोनच फेऱ्या असतील. तिसरी फेरी समुपदेशनाची असेल. गेल्यावर्षी समुपदेशनासह चार फेऱ्या झाल्या होत्या. शैक्षणिक हिताच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतला आहे.‘‘ काळजीपूर्वक भरा पसंतीक्रम प्रवेश प्रक्रियेच्या दोनच फेऱ्या झाल्याने विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावे लागतील. पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, तर त्याला पुढे केवळ एकाच फेरीची संधी असेल. त्यानंतर त्याला उर्वरित जागांवर समुपदेशन फेरीद्वारे प्रवेश घ्यावा लागेल. पसंतीक्रम भरताना त्रुटी राहिल्या तर दूरवरचे महाविद्यालय मिळू शकते. तेथे प्रवेश घेतल्यानंतर तो रद्द करणे अडचणीचे ठरेल वा पूर्ण शुल्क भरावे लागेल. |
Friday, 22 May 2015
Home »
Education News
» अभियांत्रिकी प्रवेशाच्या राज्यात यंदा दोनच फेऱ्या
0 comments:
Post a Comment