भारतीय बाजारात कोणतेही तंत्रज्ञान झपाटय़ाने लोकप्रिय होत असले तरी यातील बहुतांश हिस्सा अथवा मोठा प्रभाव स्मार्टफोनचाच आहे. त्यामुळे दर आठवडय़ाला या बाजारात दहाच्या पटीने नवनवीन स्मार्टफोनची 'एन्ट्री' होत असते. त्या मानाने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर किंवा अन्य गॅझेट्सची लोकप्रियता कमीच आहे. भारतीयांच्या 'स्मार्टफोन'प्रेमामुळेच मोठमोठय़ा कंपन्या खास भारतीयांसाठीचे स्मार्टफोन तयार करू लागल्या आहेत. अशा भाऊगर्दीत गुगलने दोन 'क्रोमबुक' भारतात दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारपासून ईकॉमर्स संकेतस्थळांवरून विक्री होणारे हे 'क्रोमबुक' लॅपटॉपला स्वस्त पर्याय ठरू शकतील का, हा प्रश्न आहे. मात्र, नवीन क्रोमबुकच्या माध्यमातून भारतातील शिक्षण क्षेत्र आणि कॉपरेरेट जगत यांत वर्चस्व निर्माण करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.
गुगलने २०१३मध्ये भारतात पहिले क्रोमबुक आणले. संपूर्णपणे 'क्रोम'च्या इंटरनेटवर आधारित कार्यप्रणालीवर (ऑपरेटिंग सिस्टीम) चालणाऱ्या क्रोमबुकसाठी वेगवान इंटरनेट ही सर्वात महत्त्वाची गरज असते. 'क्रोमबुक'ची कार्यक्षमता एखाद्या लॅपटॉपइतकी असली तरी केवळ इंटरनेटवर काम करीत असल्याने त्यातील सर्व अॅप्लिकेशन्स इंटरनेटच्या 'क्लाऊड'मधून काम करीत असतात. दोन वर्षांपूर्वी 'क्रोमबुक' भारतात दाखल झाले तेव्हा इंटरनेटची सद्दी नुकतीच सुरू झाली होती. आता मात्र, इंटरनेट हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊ लागला असून अतिवेगवान फोर जी, वाय फाय भारतात रुजू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर गुगलने नव्याने 'क्रोमबुक'ची भारतात 'एन्ट्री' केली आहे.
नवी दिल्लीत गेल्या आठवडय़ात झालेल्या एका कार्यक्रमात झोलो आणि स्पाइस या कंपन्यांनी तयार केलेले 'क्रोमबुक' भारतात आणण्याची घोषणा गुगलने केली आहे. येत्या शुक्रवारपासून हे दोन्ही क्रोमबुक ईकॉमर्स संकेतस्थळांवरून विक्रीस उपलब्ध होतील. यापैकी 'झोलो' क्रोमबुक 'स्नॅपडील'वर तर स्पाइसचा ब्रॅण्ड असलेला 'नेक्सिअन'चे 'एअर क्रोमबुक' अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मिळेल. या दोन्ही क्रोमबुकची किंमत सुमारे १२९९९ रुपयांच्या दरम्यान असणार आहे.
वैशिष्टय़ांच्या पातळीवरही या दोन्ही 'क्रोमबुक'मध्ये फारशी तफावत नसेल. दोन्हींमध्ये ११.६ इंच आकाराचा टीएफटी डिस्प्ले आहे. दोन्हींचे रेझोल्युशन १३६६ बाय ७६८ पिक्सेल इतके आहे. दोन्हींमध्ये कॉर्टेक्स ए१७ रॉकचिपचा १.८ गिगाहार्ट्झ क्षमतेचा क्वाड कोअर प्रोसेसर असून रॅमही दोन जीबी डीडीआर इतके असतील. या क्रोमबुकची अंतर्गत 'स्टोअरेज' क्षमता १६ जीबी असून मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येते. दोन्हीमध्ये दोन यूएसबी २.० पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट, ब्लूटुथ ४.० असणार आहे. याशिवाय दोन्हींमध्ये एक मेगापिक्सेलचा वेबकॅम पुरवण्यात आला आहे. या क्रोमबुक्सची बॅटरी ४२०० एमएएच इतकी असून एकदा चार्ज केल्यानंतर ती सलग आठ तास काम करू शकेल, असा गुगलचा दावा आहे.
क्रोमबुकची वैशिष्टय़े पाहता १२९९९ रुपयांच्या किमतीमध्ये चांगले प्रोडक्ट ग्राहकांच्या हातात मिळेल, अशी आशा वाटते. हे क्रोमबुक 'लिनक्स'वर आधारित 'क्रोम' कार्यप्रणालीवर चालतात. मात्र, यातील एकूण अॅप्स आणि कार्यपद्धती बहुतांशी अॅण्ड्रॉइड फोनसारखीच असल्याने वापरकर्त्यांना बुचकळय़ात पडल्यासारखे वाटणार नाही. या दोन्ही क्रोमबुकचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, गुगलने हे क्रोमबुक शैक्षणिक क्षेत्राला डोळय़ांसमोर ठेवून तयार केले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अॅप्सचा भरणा असलेल्या या क्रोमबुकमध्ये एका वेळी हजार क्रोमबुकना एकाच कॉम्प्युटर वा फोनशी जोडून काम करता येणार आहे.
झोलो आणि नेक्सिअन एअर 'क्रोमबुक'च्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात शिरकाव करतानाच उद्योग क्षेत्रासाठीही गुगलने पावले उचलली आहे. खास उद्योगजगतासाठी अॅसूसचे क्रोमबुक आणण्याचे गुगलने जाहीर केले असून या महिन्याच्या अखेपर्यंत ते क्रोमबुक सुमारे ९० हजारांच्या किमतीत उपलब्ध होतील. अर्थात त्यांची वैशिष्टय़े अद्याप कंपनीने उघड केलेली नाहीत.
'क्रोमबुक'का हवा?
किंमत : लॅपटॉपप्रमाणेच काम करू शकणाऱ्या क्रोमबुकची किंमत १२९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत विंडोजच्या कमी किंमत श्रेणीतील लॅपटॉपपेक्षाही कमी आहे. शिवाय किमतीच्या तुलनेत त्याची वैशिष्टय़े विंडोज लॅपटॉपपेक्षा अधिक उजवी आहेत.
सिंक्रोनायजेशन : 'क्रोम ओएस'वर चालणाऱ्या क्रोमबुकचा संपूर्ण कारभार ऑनलाइन म्हणजेच 'क्लाउड'च्या माध्यमातून चालतो. त्यामुळे तुम्ही केलेले एखादे काम क्लाउड स्टोअरेजच्या माध्यमातून दुसऱ्या क्रोमबुकवरूनही सहज पाहता, हाताळता येते.
सहज हाताळणी : गुगलने आणलेल्या दोन्ही 'क्रोमबुक'मध्ये एचडी डिस्प्ले वा स्वतंत्र ऑडिओ कार्ड दिलेले नाहीत. त्यामुळे 'क्रोमबुक' वजनाने हलके आणि सहज हाताळता येणारे आहेत.
ब्रॅण्ड 'गुगल': अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमने स्मार्टफोन क्षेत्रावर केलेली जादू आपल्यासमोरच आहे. प्रत्येक वेळी 'अपडेट'च्या माध्यमातून स्वत:च्या यंत्रणेत सुधारणा घडवून आणणाऱ्या अॅण्ड्रॉइडप्रमाणेच 'क्रोम' कार्यप्रणालीही गुगलची निर्मिती आहे. त्यामुळे त्यातील तांत्रिक उणिवा वेळोवेळी दूर होऊन वापरकर्त्यांला वेगवान आणि सुव्यवस्थित कार्यपद्धतीचा अनुभव येऊ शकेल.
'विंडोज'चे आव्हान मोडणार?
भारतच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये आजही 'विंडोज' ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा बोलबाला आहे. 'अॅपल'सारख्या कंपनीलाही अद्याप आपली 'आयओएस'वर आधारित उत्पादने भारतात पूर्णपणे रुजवणे जमलेले नाही. मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज' ऑपरेटिंग सिस्टीमवरील बहुतांश सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या परिचयाचे आहेत. उलट क्रोमबुकवरील बहुतांश अॅप्स हे नवीन आणि इंटरनेटवरच चालणारे आहेत. त्यामुळे वेगवान इंटरनेट कनेक्शन ही 'क्रोमबुक'ची सर्वात महत्त्वाची गरज आहे. अशा परिस्थितीत भारतीय ग्राहक 'क्रोमबुक'कडे वळतील का, हा मोठा प्रश्न गुगलला येत्या काळात सोडवावा लागणार आहे.
- आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com
0 comments:
Post a Comment