Monday 6 April 2015

पुस्तके ‘ऐकवण्या’चा प्रवास!

पुस्तके ‘ऐकवण्या’चा प्रवास!



सोनाली जोशी, 
न्यू जर्सी, अमेरिका
 
इंटरनेटचा वापर 2000-2010 या कालावधीमध्ये झपाट्याने वाढत गेला. मराठी संकेतस्थळे आणि  ब्लॉग प्रामुख्याने बहरले. ब्लॉग व संकेतस्थळांमुळे व्यक्त होण्याची संधी  अनेकांना मिळाली. महाराष्ट्राबाहेरच्या सर्वांसाठी मराठी लेखन आणि वाचनाची गरज या पर्यायी माध्यमाने जवळजवळ विनामूल्य पूर्ण केली. 
पुस्तकांना पर्याय म्हणून ईबुक्स आली, तसेच ऑडिओ बुक्ससुद्धा. ब्लॉगवर पॉडकास्ट आले. 
माध्यमाचे व तंत्रज्ञानाचे हे सर्व बदल प्रमुख इंग्रजी प्रकाशक, ब्लॉग व संकेतस्थळांप्रमाणेच मराठीने आपलेसे केले.
गेल्या तीन वर्षांत भारतात आणि जगभरात सोशल नेटिवर्किंग आणि व्हॉट्स अँपचा प्रभाव आणि व्याप्ती अतिशय वेगाने आणि कानाकोपर्‍यात पोहोचली. व या सर्व सोशल माध्यमांमध्ये मराठीतून व्यक्त होणे शक्य झाले. सोशल मीडिया व व्हॉट्स अँपचा प्रसार ही एकमेकांशी संवाद साधण्याची अधिक प्रभावी आणि लक्षवेधी अतिशय क्रांतिकारक आणि लक्षणीय बाब ठरली.
सोशल मीडिया आला म्हणून मराठी वाचन थांबले नाही, उलट वाचनाची माध्यमे मात्र नक्की बदलली.  अपेक्षा बदलल्या. 
संकेतस्थळे व ब्लॉगवर या माहितीच्या स्फोटाचा आणि कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम झाला.  त्यांच्यापुढील आव्हाने वाढली. ऑनलाइन लेखन आणि त्याची विश्‍वासार्हता वाढेल याची काळजी घेणे अधिक आवश्यक झाले. त्यांच्याकडून वेगळे आणि दर्जेदार असे दोन्ही मिळवण्याबाबत वाचकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या. 
इतर सर्व माध्यमांपेक्षा वेगळे असे काही या साइट्सवर आहे का ते शोधणेही अनेकांना आवडते. हे ध्यानात ठेवून अनेक संकेतस्थळे आणि ब्लॉग बदलत गेले. साहित्यसंस्कृती हे आमचे संकेतस्थळ या बदलाचा भाग असावे, असे प्रयत्न आम्ही सातत्याने केले.
ग्लोबल वाचक समोर ठेवून त्यानुसार साहित्य व माहितीसाठा तयार करणे हे एक वेब-पब्लिशर म्हणून आमचे ध्येय आहे. यात अनुभव आणि आशयाला प्राधान्य आहे. या प्रयोगांमध्ये ऑडिओ, व्हिडीओ या (मल्टीमीडियाचा) माध्यमांचा वापर अपरिहार्यच आहे. तसेच त्यांची उपयुक्त आणि हाताळायला सोपी अशी मोबाइल अँप्लिकेशन्सही करायला हवी.
ऑडिओ बुक्स
साहित्यसंस्कृती डॉट कॉमने समकालीन लेखकांच्या निवडक मराठी लेखनाची ऑडिओबुक्स तयार केली. आकाशवाणी व इंटरनेट रेडिओद्वारेही त्याचे प्रसारण केले. 
भारतात व भारताबाहेर इतर काही संस्थांनी श्राव्य स्वरूपात निवडक मराठी पुस्तके आणि कादंबर्‍या लोकांना उपलब्ध करून दिल्या. दुकानांमध्ये व ऑनलाइन विक्र ीकरता सीडी उपलब्ध झाल्या. आकाशवाणीवर नाट्यवाचन आणि श्रुतिका आधीही होत असत. महाराष्ट्र राज्य शासनाने एका उपक्रमामध्ये आणखी काही मराठी ऑडिओ बुक्स तयार केली आणि ती विनामूल्य  ऑनलाइन उपलब्ध करून दिली. 
हे सर्व होत असूनही प्रकाशित झालेले प्रत्येक पुस्तक हे ईबुक झाले तरी ऑडिओ रूपात येईल अशी भक्कम व्यवस्था मात्र अजूनही मराठीत नाही. पायरसीचा जास्तीत जास्त बंदोबस्त करता येईल अशी व्यवस्था असलेली ऑडिओ बुक्स मराठीत उपलब्ध आहेत. त्यांची संख्या हळूहळू वाढेल. पण त्यांचा प्रसार व स्वीकार हा गरजेवरच अवलंबून राहील.
ग्राहकांच्या बळाच्या जोरावर, प्रकाशक, प्रायोजक, ऑनलाइन पॉडकास्ट्स, वाचनालये आणि सरकारच्या मदतीमुळे अमेरिकेत व इतर देशांत इंग्रजी ऑडिओ बुक्स तयार झाली आणि टिकून आहेत. 
पुस्तक वाचणे. आणि ऐकणे!
रेडिओ हे ऑडिओ माध्यम वाचनासाठीही महत्त्वाचे आहे. यामध्ये गाणी वा मुलाखतींशिवाय ऑडिओ बुक्स आणि सर्व प्रकारचे पॉडकास्ट असतात.
पाळणाघरापासून शाळा ते युनिव्हर्सिटीमध्ये पुस्तके वाचता/ऐकता येतील अशा सोयी अमेरिकेत आहेत. मुद्रित पुस्तके, ईबुक्स, अँप्स आणि ऑडिओ बुक्स यामुळे पुस्तके प्रवासात, घरी वा जिथे हवी तिथे वाचता येतात. मुद्रित स्वरूपाबरोबर आता डिजिटल (इलेक्ट्रॉनिक) व ऑनलाइन स्वरूपात पुस्तक येईल हे गृहीत धरलेले असते. त्याकरता लागणारी गुंतवणूक प्रकाशक व संबंधित संस्था करतात. 
शाळा-कॉलेजात पुस्तके विकत घेण्याची सवय लागते तसेच वाचनालयाचा वापर करण्याचीही.  नावाजलेली आणि लहान मोठी प्रकाशने विविध फिक्शन आणि नॉन फिक्शन सकट जवळजवळ सर्व पुस्तकांची इथे ऑडिओ बुक्स करतात.  
शाळा-कॉलेज तसेच सरकारी वाचनालये यामध्ये ऑडिओ बुक्स मोठय़ा संख्येने असतात. 
ऑडिओ बुक्स ही फक्त करमणूक नाही तर गरज आहे. वेबसाइट्सचे वर्गणीदार होऊन वा वाचनालयाने दिलेल्या सोयीमुळे ही ऑडिओ बुक्स ऐकतात. मोठय़ांनी पुस्तके ऐकण्याकरता त्याची श्रुतिका करावी लागते अशी संकल्पना प्रगत देशांमध्ये-विशेषत: अमेरिकेत तरी नाही. 
पुस्तक ‘ऐकण्या’तल्या भारतीय अडचणी!
ऐकणे आणि वाचणे हे दोन्ही पुस्तकाचे वाचन आहे ही संकल्पना रुजायला भारतात वेळ लागेल. त्याला काही कारणेही आहेत. आपल्याकडे मोबाइल आणि इंटरनेटचे जाळे तयार झाले आहे. तरी प्रमुख शहरांव्यतिरिक्त इतर ठिकाणी अजूनही अडचणी आहेत. मोबाइल नेटवर्क सुविधा, वाय फाय सहज व कमी खर्चात उपलब्ध होईल तेव्हा ऑनलाइन ऐकण्याचा जास्त प्रसार होईल. महाविद्यालये, वाचनालये अशा ठिकाणी प्रथम या सुविधा मिळाव्यात.  मराठी ऐकणारा वाचक तयार करण्याकरता उपयुक्ततता हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. उपयुक्त असेल तर मराठी वाचक ते वाचतो. फक्त करमणुकीला अनेक पर्याय आहेत. मराठी वाचकाची लाइफस्टाइल आणि ऑडिओ बुक्स यांची सांगड घालणे हाही कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. तांत्रिक सुविधांबरोबर याला प्राधान्य द्यायला हवे. वाचता आले की त्यावर बोलणे आपण आत्मसात केले आहे. तसे ऐकणे हे एक वाचन आहे, हेसुद्धा शाळेपासून शिकवायला हवे. प्रकाशकांची, पालकांची,  शिक्षकांची व संबंधित सर्वांची जबाबदारी ही शिकवणे आणि वाचकांना पर्याय उपलब्ध करून देणे अशी दुहेरी आहे. 
वाचकाला खर्च कमी पण उपयुक्तता जास्त अशी ऑडिओ बुक्स वा पॉडकास्ट उपलब्ध करून देणे हा मार्ग  साहित्यसंस्कृतीने सध्या अवलंबला आहे.
 
 
(व्यवसायाने आयटी इंजिनिअर असलेल्या लेखिका ‘साहित्य संस्कृती’ या मराठी संस्थळाच्या संस्थापक, संचालक आणि समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

0 comments:

Post a Comment