Monday 8 June 2015

करिअर निवडताना झापडबंद विचार करू नका!


करिअर निवडताना झापडबंद विचार करू नका!




दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने 'लोकसत्ता मार्ग यशाचा' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत..

प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारी एक 'खिडकी' कधी तरी उघडावी लागते. आमच्या वेळेस करिअर निवडीमागे असा काही विचार नव्हता. अमुक इतके गुण मिळाले की अमुक शाखेला प्रवेश घ्यायचा असे ठरलेले असायचे. मला अमुक करायला आवडते, म्हणून मी ते करीन असा विचारच तेव्हा केला जात नसे. मुळात पालकांना जे करायला मिळालेले नसते ते अपेक्षांचे ओझे मुलांच्या माथी मारले जाते, त्यामुळे मुले जास्त पिचतात. 'तुझ्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करतो.. तरीही तू हे का करीत नाहीस?' असे संभाषण घराघरांत ऐकू येते. पण, मुळात त्याला ते करण्याची आवड आहे का, हे बघणे महत्त्वाचे असते. त्यामुळे, करिअर समुपदेशन करायचे झाले तर त्यासाठी आधी पालकांना बोलावले पाहिजे. मुलांशी संवाद कसा साधायचा ते त्यांना सांगायला हवे. म्हणजे आपल्या अपेक्षांचे ओझे ते मुलांच्या माथी मारणार नाहीत. पण आता परिस्थिती बदलत आहे. विद्यार्थी-पालक करिअर कुठल्या निकषांवर निवडावं, याबाबत जागरूक होत आहेत. अलीकडची पिढी तंत्रज्ञान अवगत करण्यात अत्यंत प्रगत आहेत.
दहावी-बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे का? म्हटले तर आहे, म्हटले तर नाही. कारण, आता कुठल्याही एका शाखेला चिकटून राहण्याची गरज नाही. अमुकतमुक शाखेत प्रवेश घेतला म्हणजे आयुष्यभर त्यातच आपले करिअर शोधत राहण्याचीही गरज नाही. अर्थात त्यासाठी अभ्यासक्रम करताना एखादे कौशल्यही आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण, आता वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची अभ्यासपद्धती येऊ घातली आहे. यामुळे अभ्यासाविषयीचा संकुचित दृष्टिकोन दूर होईल. या अभ्यासपद्धतीत एका प्रश्नाचे उत्तर एकच असेल का, तर नाही! एकाच प्रश्नाचे उत्तर एकाच नव्हे तर दहा वेगवेगळ्या पद्धतीने देता येऊ शकते. कारण, एका प्रश्नाला एकच उत्तर ही मानसिकता झापडबंद विचारांना जन्म देते, म्हणूनच शिक्षणाद्वारे विविध दृष्टिकोन विकसित करता यायला हवे.
माझ्या मते, यशस्वी होण्याचे काही फंडे असतात. त्यापैकी एक म्हणजे तुझ्या आणि माझ्यात शहाणा कोण हे ठरविण्याची वेळ आली तर तो शहाणा मीच, असा आत्मविश्वास आपल्याला हवा. दुसरे म्हणजे 'अंथरूण पाहून पाय पसरा'या संकुचित मराठी म्हणीचा जप करण्याऐवजी 'आधी पाय पसरा आणि नंतर तितके अंथरूण जमवा.' ही म्हण तयार करायला हवी. तिसरी गोष्ट म्हणजे नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची सवय अंगी बाणवा. 'जहाँ दुनिया की सोच खतम होती है, वहीं से मेरी शुरू होती है' असा आपला दृष्टिकोन असायला हवा.
शिक्षण क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा आपला विचार आहे. त्यापैकी पहिली म्हणजे कुठला अभ्यासक्रम किंवा क्षेत्र निवडायचे याबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला गोंधळ वेळीच दूर होण्यासाठी दहावीच्या निकालपत्राबरोबरच त्यांचा करिअरविषयक कल स्पष्ट करणारे 'अहवालपत्र' (करिअर कौन्सिलिंग रिपोर्ट) देण्याची योजना पुढील शैक्षणिक वर्षांपासून राबविण्यात येणार आहे. दहावीच्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन शालेय स्तरावरच सरकारच्या पुढाकाराने उपलब्ध करून देणे ही खरे तर कठीण बाब आहे. परंतु, दहावीच्या वर्षांतच विद्यार्थ्यांची करिअरविषयक विचारप्रक्रिया सुरू होते. त्यामुळे, याबाबत आम्ही लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहोत.
राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील वर्षीपासून जेईईऐवजी राज्याचीच सीईटी घेण्यात येणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या तीनही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच एकत्रितपणे 'सामाईक प्रवेश परीक्षा' (सीईटी) घेण्यात येईल.
आपल्या देशात राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इतर शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते. त्यात राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडतात, अशी सर्वसाधारण भावना असते. त्यामुळे, राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम 'केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा'प्रमाणे बदलण्यात येत आहे.
मुलांनी अभ्यास करताना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहू नये. आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत तिथे कुठली कौशल्ये आवश्यक ठरतात, हे लक्षात घेऊन आपली कौशल्ये वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या काळात वेगवेगळ्या कामात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाला भारतातच नव्हे तर परदेशातही खूप मागणी आहे. त्यासाठी आपली संकुचित अभ्यासपद्धतीही बदलण्याची गरज आहे. त्यासाठी पदवी स्तरावर इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, यासाठी तरतूद करण्यात येईल.
वेगवेगळ्या क्षेत्रांत कौशल्यप्राप्त व्यक्तींची वानवा आहे. याचे कारण कित्येक विषय आपल्याकडे शिकवलेच जात नाहीत. व्हेटरनरी डॉक्टर आपण ऐकला आहे, पण
नर्स ऐकली आहे का? कारण, व्हेटरनरी नर्सिग असा विषयच आपल्याकडे नाही. आपल्याकडे एक एक कोटींचे घोडे रेसमध्ये धावतात, पण घोडय़ांच्या पायाला नाल ठोकण्यासाठीचे व्यावसायिक सापडत नाहीत. अशी विविध कौशल्ये
संपादन केल्यास नोकरी मिळणे सोपे जाते. परंतु, यासाठी जी जोखीम पत्करायला हवी, ती घेण्याची हिंमत विद्यार्थी-पालकांनी दाखवायला हवी. म्हणूनच करिअर निवडीबाबत झापडबंद विचार सोडून वेगळा विचार करण्याची तयारी तरुण पिढीने दाखविली पाहिजे.

विनोद तावडे
मंत्री, शालेय, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय विभाग.

0 comments:

Post a Comment