Saturday 6 June 2015

करिअर निवडा डोळसपणानं (डॉ. श्रीराम गीत)

करिअर निवडा डोळसपणानं (डॉ. श्रीराम गीत)
- डॉ. श्रीराम गीत
रविवार, 7 जून 2015 - 02:30 AM IST

जून आणि जुलै हे महिने परीक्षांच्या निकालांचे. दहावी-बारावीनंतर करिअरच्या नव्या वाटा सुरू होतात. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, यासाठी नेमका विचार झाला पाहिजे. आपली आवड कशात आहे आणि आपल्याला काय जमू शकेल, यशाचा टप्पा आपण कसा गाठायचा, याचं नियोजन आणि त्यासाठी योग्य पद्धतीनं कष्ट घ्यायची तयारी हवी. करिअर निवडताना डोळसपणा हवा. इतरांच्या मतांनुसार किंवा जिकडं गर्दी आहे, त्या अभ्यासक्रमाची निवड करायची, असं होता कामा नये. आयुष्यातला हा महत्त्वाचा निर्णय कसा घ्यायचा, त्यासाठी कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याबद्दलचं मार्गदर्शन. 

पंचवीस वर्षांनी एक पिढी बदलते असं मानलं जातं. माझ्या नजरेसमोर आज तीन पिढ्यांतील असंख्य व्यक्ती तरळून जातात. निमित्त आहे ते करिअर निवडीचं आणि करिअरमध्ये यश मिळविण्याचं. पहिली पिढी आज मागं वळून पाहताना दोन गोष्टींमध्ये आत्मपरीक्षण करताना दिसते. काही जण वडिलांच्या (आईच्या नव्हे) दडपणाखाली घ्याव्या लागलेल्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर काढतात; पण तोच निर्णय करिअरमध्ये यशाकडं कसा घेऊन गेला हेही ओघातच सांगतात. याच्या अगदी उलट, नाइलाजानं इंजिनिअर किंवा डॉक्‍टर झालो, पैसे मिळाले, यश मिळालं मात्र आनंदाला मुकलो याची स्पष्ट रुखरुख त्यांच्या सततच्या बोलण्यात येत राहते. कारण हेच दोन पर्याय उत्तम असे त्या वेळचे मत होते.

यानंतरच्या पिढीत म्हणजे ज्यांची मुले आज पदवीधर आहेत किंवा शिकत आहेत त्यांनी काही वेगळ्या वाटा चोखाळल्या असं जाणवतं. त्यांचा वडिलांशी संघर्ष होता, पण त्याचं स्वरूप नाराजीचं होतं, तीव्र विरोधाचं नव्हतं. पत्रकारिता, जाहिरात, टीव्ही, सिनेमा, हॉटेल मॅनेजमेंट, टूरिझम, ट्रेडिंग, शेअरबाजार यामध्ये अनेकांनी छान बस्तान बसवलं. बहुतेक जण आनंदी आणि यशस्वीदेखील झाले. काहींना आईचा पाठिंबाही मिळाला हे त्यातलं नोंद घेण्याजोगं.

सध्याची शिकणारी किंवा यंदा दहावी व बारावी झालेली पिढी मात्र या दोनापेक्षा फारच वेगळी आहे. त्याला किंवा तिला हवं ते करू देत, या वाक्‍यानंच आई-वडिलांची सुरवात होते. मुलं- मुली नक्कीच सुखावतात, मात्र स्वतः घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचे परिणाम दुसऱ्यावर ढकलून दिलं जाण्याचं प्रमाण धोकादायकरीत्या वाढत चाललं आहे हे मला तीव्रतेनं जाणवतं. निर्णयाची जबाबदारी घेऊन, जाणीवपूर्वक वाटचाल करणारे जे कोणी अल्पसंख्य विद्यार्थी आहेत त्यांची आनंदी, यशस्वी, उत्तम करिअरची वाटचाल सुरू होते, यंदाचे बारावीचे निकाल असोत किंवा या वर्षातल्या कॅंपस निवडीच्या बातम्या दोन्ही नीट समजून घेतल्या, तर निर्णयाची जबाबदारी याचा अर्थ अनेक विद्यार्थी व पालकांना सहज उलगडत जाईल.

मग हा निवडीचा निर्णय कसा घ्यायचा? त्याची जबाबदारी घ्यायची म्हणजे काय करायचं? ती पार कशी पाडायची याबद्दल अगदी साध्या शब्दात, फार शास्त्रीय अवडंबर न माजवता काय करणं शक्‍य असतं ते पाहूयात.

लहानपणापासून नवीन वस्तू, नवीन खेळणं, नवीन चॉकलेट पाहिलं, की ते हवेसं वाटणं ही सर्वांचीच स्वाभाविक प्रवृत्ती असते. याला करिअर कशी अपवाद असेल? मग कानावर पडलेले काही आकर्षक शब्द, नवीन वाटा, पेपरमधील बातम्या यातून हे आकर्षण सुरू होतं, वाढत जातं. मात्र त्यातच करिअर करायचं असं वाटणं, तसं बोलणं व त्याला आईवडिलांनी सतत खतपाणी घालणं यातून करिअर क्वचितच बनते. कोणत्याही नाजूक रोपट्याला खतपाण्याची गरज नसते तर मशागतीची, योग्य मातीची, निगराणीची गरज असते. मशागत म्हणजेच तुला वाटत असलेल्या करिअर करणाऱ्यांची नेमकी वाटचाल आपण विचारूयात. त्यांची माहिती काढूयात. योग्य माती म्हणजे याची वाटचाल कोणच्या शाखेतून, कोणत्या विषयातून सुरू होते, किती वर्षे शिकून संपते याची चौकशी करूयात. अर्थातच शेवटचा टप्पा असतो निगराणीचा. म्हणजेच रोपट्याच्या वाढीच्या काळातील त्याला पुरेसे संरक्षण देण्याचा. याला लागणारा खर्च, त्याचा अंदाज, त्याची तरतूद, वेळप्रसंगी कोसळता पाऊस व कडक उन्हापासून संरक्षण देणंही गरजेचं असतं.

गेल्या दशकात नवीन चॉकलेट, खेळणी, भरपूर आहेत, पण याला फक्त खतपाणी घालणारे अनेकदा तोंडघशी पडत आहेत. मात्र योग्य मशागत, माती व निगराणीचा विचार केलेली विद्यार्थी व पालक करिअरच्या यशाकडं झेपावू लागलेली आहेत. मग या आकर्षक अशा चॉकलेटांची छोटी यादीच आपण बनवूयात ः एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, कारडिझाईन मध्येच जायचे आहे. याला आपल्या देशात मागणी आहे का? बायोटेक, नॅनोटेक, बायोइन्फरमॅटिक्‍स, ॲस्ट्रोफिजिक्‍स, ॲस्ट्रानॉमी जेनेटिक्‍स करायचे आहे. बारावीनंतर पंधरा वर्षे चिकाटीने अभ्यास करत शिकायची तयारी आहे का? कॉम्प्युटर इंजिनियर बनून आयटीमध्येच जायचे आहे. कारण एकच त्याला ना तो खूप आवडतो आणि त्यात तो काय काय करत असतो. (इतिपालक) उत्तम पदवी, उत्तम कॉलेजातून घेतलेल्या कॉम्प्युटर इंजिनियरला आयटी कंपनी वर्षभर पोसते आणि शिकवते, नंतर त्याला कामात काहीतरी कळू लागते. उत्तम पदवी व उत्तम कॉलेजसाठी लागतात ते बारावीचे ऐंशी टक्के आणि जेईईचे किमान शंभर मार्क! अशी मुले गेल्या पंधरा दिवसांत पुण्यात शोधावी लागतात, ही वस्तुस्थिती थोडीशी समजून घेतली तर? दोनच वर्षांपूर्वी याच बॅचची पुण्यात ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मार्क मिळविलेली एकूण सहा सात हजार मुले मुली होतीच ना? अशीची काहीशी गोष्ट मेडिकल (म्हणजे सरकारी एम बीबी एस साठीची आहे) व सीएची आहे. हुशार पुण्यातून दरवर्षी फारतर सत्तर ऐंशी डॉक्‍टर व तेवढेच सीए बाहेर पडत आहेत, जे पुण्यातच जन्मले, शिकले असे.

चॉकलेट सोडून आता आपण खऱ्या टिकाऊ, आनंद देणाऱ्या असंख्यांपैकी मोजक्‍या पण यशाकडं नेणाऱ्या काही गुडदाण्यांकडं वळूयात. गुडदाणी म्हणजे काय, हा शब्द कुठला, असे अनेक विद्यार्थीच काय पण पालकदेखील विचारतील. अगदी हिमालयात शिखरांवर चढाई करणाऱ्या प्रत्येकाच्या सॅकमध्ये ही गुडदाणी आवर्जून असते. दोन वड्या चघळून, चावून खाल्ल्या तर त्याने ताकद येते, बळ मिळते, ऊर्जा प्राप्त होते. याची थोडक्‍यात यादी अशी ः डिफेन्स, बॅंकिंग, इन्शुअरन्स, मार्केटिंग, जरनॅलिझम, मास मीडिया, टॅक्‍स सल्लागार, स्पर्धा परीक्षा, एमबीए. साधी गंमतीची गोष्ट म्हणजे या साऱ्यांसाठी लागते ती फक्त एक कोणतीही पदवी. तिचा मन लावून केलेला अभ्यास. त्या दरम्यान ज्या क्षेत्रात जायचंय त्याची करून घेतलेली तोंडओळख. नंतर त्या विषयातील मिळविलेले प्रावीण्य. म्हणजेच पुन्हा आपण येतो ते मशागत, माती व निगराणीकडेच.

हे सारे नको आहे, मला हटके असेच काही करायचे आहे अशी जिद्दी, हट्टी, पण चिकाटी असलेली अनेक जण असतातच ना? त्यांच्या हट्टाला विरोध न करता, पण त्यांच्या चिकाटीला दाद देत, प्रोत्साहन देत अशा विविध करिअरची पायवाट चोखाळता येते. या आधीच्या होत्या त्या मोठ्या वाटा किंवा राजरस्ते किंवा हमरस्ते. पायवाटांवर थोडेफार काटेकुटे, दगडधोंडे, खाचखळगे, चढउतार असणारच. मग यांची यादी अशी ः रेडिओ जॉकी, डिस्को जॉकी, साऊंड इंजिनियर, व्हिडिओग्राफर, वाइल्ड फोटोग्राफी, ट्रेकिंग लीडर, ट्रॅव्हल अँड टूर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, केटरिंग, मॉडेलिंग, संवाद लेखक, नाटककार, ॲक्‍टर, गायक, वादक इ. इ. इ. इ.
मात्र कवी, लेखक आणि काऊन्सेलर या तीन अत्यंत खडतर अशा पायवाटा आहेत हे कृपया अधोरेखित करत आहे.
हे स्वानुभवाचे बोलच समजा ना!
आता या साऱ्या यादीनंतर सुद्धा काही प्रश्‍न, काही नव्हे तर अनेक पालकांच्या समोर उभे ठाकतातच. मुलगा वा मुलगी काही सांगतच नाही, बोलतच नाही, त्याला आणि आम्हाला काही कळतच नाही. अशांना सुद्धा एक साधासा उपाय आहे. आवडत्या विषयातून, जास्त मार्क असतील त्यातून सुरवात इतिहास, भूगोलात सर्वांत जास्त मार्क आहेत, मराठी खूप आवडते, चित्रकलेच्या परीक्षादेखील झाल्या आहेत, इंग्रजी वाचन चांगले आहे. सायन्स खूप आवडते, कळते, मात्र मार्क मिळत नाहीत, अशा साऱ्यांसाठीची यादी अशी ः इतिहासातून सुरवात मग उत्खनन, मानववंशशास्त्र, म्युझियम्सची देखभाल, ग्रंथपाल, यातील अभ्यासक्रम. भूगोलातून पदवी, मग जिओमॅपिंग, हवामान, भूकंप, समुद्री अभ्यास याकडं वळणं शक्‍य. मराठीतून पदवी आणि लेखनाची आवड व तशी क्षमता असेल तर जिंगल्स, कॉपी रायटिंग, जाहिरात क्षेत्रातील अनुभव आणि कोर्स करणे. इंग्रजी खूप आवडत असेल तर भाषांतरकार. सायन्स आवडते, पण मार्क पडत नाहीत; तर हार्डवेअर नेटवर्किंगचे कोर्स व नंतर त्यातील सर्टिफिकेशन हे रस्ते उलगडतातच. चित्रकला आवडत असेल तर डिझाईन, इंटिरियर, वेब डिझाईन, ॲनिमेशन, जीडी आर्टस्‌चे रस्ते उघडतातच.

थोडक्‍यात म्हणजे आकर्षक चॉकलेट समजून घ्यायला हवे. अनेक पर्यायांची सुरवात सामान्य वाटते, पण यशाचा रस्ता सुरू होतो. अनवट वाटेवरचा रस्ता खडतर असतो, त्या दरम्यान एखादी पदवी हातात असली, तर दुसरा रस्ता पकडणं शक्‍य होतं. मार्कांतूनसुद्धा आवड कळत जाते हे नक्की.
तज्ज्ञांपैकी अनेकांना शास्त्रीयदृष्ट्या हे सारे विवेचन फारच विचित्र वाटू शकते. पण बौद्धिक चाचण्या, कलचाचण्या, इंटरेस्टच्या चाचण्या, स्वभावचाचण्या या साऱ्या करून घेणारे एक टक्कासुद्धा विद्यार्थी महाराष्ट्रात नाहीत. अनेकांना तर हे माहितीही नाही. इथपर्यंत आपण पाहिली ती मशागत आणि मातीची माहिती. आता विचार करूयात निगराणीचा.

आनंदी, यशस्वी करिअरसाठी काही मापदंड आहेत. हे मापदंड गेल्या शतकापासून चालत आलेले आहेत. त्यात आजही फारसा बदल झालेला नाही. खूप साऱ्या नवीन करिअर आल्या तरी मापदंड तेच आहेत हे नीट लक्षात ठेवावे लागते. मात्र हे मापदंड पूर्णपणे विसरून प्रत्येक विद्यार्थी व त्यांचे पालक सध्या करिअरकडे पाहतात. ते कोणते?
क्षेत्र कोणतेही असो, शिक्षण कसलेही असो, हुशारी कितीही असो (अगदी सातत्याने पहिला असला तरीसुद्धा) कामाची सुरवात प्रशिक्षणानेच होते, ते कंटाळवाणे असू शकते, नको असलेले काम किंवा प्रशिक्षणसुद्धा जवळपास नव्वद टक्‍क्‍यांना स्वीकारावेच लागते. यानंतरच्या टप्प्यात मात्र मला हे जमते, हे करता येते, यात मला आवड आहे याची सुरवात होऊ शकते. कॉम्प्युटर व मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या अनेकांची निराशा इथंच होते, मग करिअरच कंटाळवाणे होऊ लागते, प्रगती यथातथाच होते.

दहावीच्या, बारावीच्या किंवा पदवीच्या टप्प्यांवर जे कोणी पॅकेज, परदेशी आणि कामातली पोझिशन यावर डोळा ठेवून चौकशी करतात, अपेक्षा धरतात त्यांना कदाचित तीनातील एक गोष्ट मिळू शकते. पण प्रगती मात्र होतेच असं नाही. मग यातील कठोर वस्तुस्थिती काय आहे? पॅकेज फारतर दोन टक्‍क्‍यांना मिळते. अन्य सारे पगार मिळवतात. मात्र पॅकेजची चौकशी न करता काम शिकणारे वेगाने प्रगती करतात. कदाचित पॅकेजवाल्यांना पाच वर्षांत मागेही टाकतात. परदेशातील कोर्स करून तिथेच स्थायिक व्हायचे असेल तर जरूर करावेत. अन्यथा, परदेशी कोर्सना भारताततल्या इंडस्ट्रीत फारसा वाव नाही. कित्येक लाखांचा चुराडा झाल्यावर भारतातील पगार ऐकून भ्रमनिरास झालेले काही हजारांत मोजता येतील एवढं सांगितलं तरी पुरे. पोझिशन ही मिळवावी लागते. दिली जात नसते. मला सीईओ व्हायचं आहे हे वाक्‍य पदवीधर इंजिनियर किंवा उत्तम संस्थेच्या एमबीए पदवीधरच्या तोंडी अनेकदा ऐकू येते. किमान वीस वर्षांनंतरच्या निवडक पदांबद्दल अशी स्वप्ने जरूर पाहावीत, पण वास्तवातील वाटचाल सुरू करावी हे जास्त बरं असतं. ही वाटचाल करताना जी मुले-मुली सर्जनशीलता वाढवतात, सर्वांगाने विचार करू शकतात, विविध पर्यायांकडं डोळसपणानं पाहतात त्यांनाच त्यात यश मिळते. खूप सारी क्रिएटिव्ह किंवा खूप विचार करणारी किंवा खूप सारे सामान्य ज्ञान असणारी अशी एकाच क्षेत्रातली मंडळी एका ठराविक पातळीपर्यंत पोचतात. मात्र सर्वोच्च किंवा त्यासारख्या पदांसाठी या साऱ्याची एकत्रित गरज असते. २०१५ मध्ये पहिली पायरी चढणाऱ्यांना २०२५ मध्ये उत्कृष्ट यश मिळावे व करिअरची पायाभरणी व्हावी यासाठीची ही शिदोरी पुरेशी ठरावी.

0 comments:

Post a Comment